क्षेपणभूमीपर्यंत वाहून नेला जाणारा कचरा कमी करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अंधेरी येथे सुका कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर चालवल्या जाणाऱ्या या केंद्रात दररोज १० दशलक्ष टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येईल. येत्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त (परिमंडळ-३) श्री. विश्वास मोटे यांच्या हस्ते या केंद्राचा काल (दिनांक १४ मे २०२५) शुभारंभ करण्यात आला. के (पूर्व) विभागाचे सहायक आयुक्त श्री. नितीन शुक्ला, हिंदुस्थान यूनिलिव्हर, झिंटीयो आणि दालमिया पॉलिप्रो लिमिटेडचे प्रतिनिधी यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मुंबईतील विविध भागांमधून संकलित कचरा विविध ठिकाणच्या क्षेपणभूमीवर योग्य प्रक्रिया करण्यासाठी दररोज वाहून नेला जातो. त्यामुळे, क्षेपणभूमीवर कचऱ्याचा भार हलका करण्याच्या उद्देशाने अंधेरी येथील महाकाली गुंफा मार्गावर सुका कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. हिंदुस्थान यूनिलिव्हर, झिंटीयो आणि दालमिया पॉलिप्रो लिमिटेड यांच्यासोबत मिळून सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी दररोज १० दशलक्ष टन कचऱ्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया करण्यात येईल., असे उपायुक्त विश्वास मोटे यांनी शुभारंभप्रसंगी सांगितले. उपायुक्त मोटे यांनी केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करून हरित पर्यावरणाचा संदेश दिला. तसेच, युवा स्वयंसेवक व उपस्थितांना कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.
0 टिप्पण्या