सर्व देशात जेंव्हा दांडगाईचे राज्य होते, कोणाचा कोणाला पायपोस नव्हता त्याकाळात सुरळीत चालणारे एकमेव राज्य म्हणजे अहिल्यादेवींचे राज्य. अहिल्यादेवी या दानशूर, कर्तृत्वत्वान, धर्मपारायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जात असल्या तरी त्यांची राज्यकारभारावर प्रशासकीय पकड घट्ट होती. अशा मराठा इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व आणि आदर्श राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आज मुंबई येथील आझाद मैदान येथे महाराणी अहिल्यादेवी प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शासनाचे उपसचिव तथा विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) क्रीडा व युवक कल्याण व अल्पसंख्यक विभाग मंत्रालय मुंबईचे संतोष गावडे, मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे , मुख्य अभियंता पांडुरंग बंडगर, माजी संचालक लक्ष्मण व्हटकर,महाराणी अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष एन व्ही मोटे, सचिव रंगनाथ चोरमले, खजिनदार शिवाजी यमगर, नगरविकास विभागाचे सहाय्यक सचिव तुकाराम दिघे,ॲड. अभिमान हाके पाटील, उत्तर मुंबई अध्यक्ष राजाराम काळे, राज बंडगर, आदी मान्यवर तसेच राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थित राहून अहिल्यादेवी यांच्या कार्याला अभिवादन केले. यावेळी महाराणी अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष एन व्ही मोटे, सचिव रंगनाथ चोरमले म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० जयंती येत्या ३१ मे २०२५ रोजी साजरी होत असून हा जयंती उत्सव संपूर्ण भारतात वर्षभर साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने महाराणी अहिल्यादेवी प्रतिष्ठानने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आझाद मैदान, मुंबई येथे भव्य स्मारक उभारणे, महाराणी अहिल्यादेवी प्रतिष्ठानतर्फे आझाद मैदान येथे चालविण्यात येत असलेल्या पाणपोईची दुरुस्ती आणि सुशोभीकरण करणे, अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रग्रंथाचा तसेच त्यांच्या फोटोची छपाई करून त्याचे सर्वदूर वाटप करणे, अहिल्यादेवींच्या नावाने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचे अहिल्यादेवींच्या नावे पुरस्कार देवून सत्कार करणे, विविध ठिकाणी परिसंवाद आणि मेळावे आयोजित करून समाजजागृती करणे, 'जय मल्हार' या वेबसाईटची निर्मिती करणे आदी बाबींचा समावेश असणार आहे अशी माहिती महाराणी अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष एन व्ही मोटे व सचिव रंगनाथ चोरमले यांनी दिली.अहिल्यादेवी सामान्य कुटुंबातील असल्यामुळे त्यांना प्रजेच्या अडीअडचणीची जाणीव होती. त्यांचे राहणे अतिशय साधे व सात्विक होते म्हणूनच त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नाव पडले. अहिल्यादेवींनी देशभर भ्रमंती केली. देशभ्रमण करताना तिर्थक्षेत्रांच्या जागी त्यांनी धर्मशाळा बांधल्या. . जवळपास २८ वर्ष त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालवला. आदर्श राज्यकारभार कसा करावा याचा वस्तुपाठच अहिल्यादेवींनी घालून दिला. - महाराणी अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष एन व्ही मोटे
,.....................
*अहिल्यादेवी होळकर यांची जयंती महानगरपालिकेत साजरी*
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनातील अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. (श्रीमती) संगीता हसनाळे यांनी आज (दिनांक ३१ मे २०२५) पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.महानगरपालिका उपसचिव नेहा पराडकर, ए विभागाचे कार्यकारी अभियंता (परिरक्षण) श्री. सुरेश कानोजा याप्रसंगी उपस्थित होते



0 टिप्पण्या