Top Post Ad

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

  ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या गावी माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दाम्पत्यापोटी  अहिल्यादेविंचा जन्म झाला. अतिशय छोट्या आणि सामान्य कुटूंबात जन्मलेल्या अहिल्यादेवी यांनी इतिहासात मानाचे स्थान प्राप्त केले आहे. ज्या काळात स्त्रियांना शिक्षणास बंदी होती, चूल आणि मूल हेच स्त्रियांचे जीवन होते, स्त्रियांनी घराचा उंबरठा ओलांडणे म्हणजे पाप समजले जात त्याकाळात त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहायला, वाचायला शिकवले. मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमी समजल्या जाणाऱ्या होळकर घराण्यातील सुभेदार खंडेराव होळकर  यांच्याशी वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. खंडेरावांपासून त्यांना मालेराव आणि मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली. पण वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्यांना वैधव्यास सामोरे जावे लागले. पती खंडेराव हे कुंभेरीच्या लढाईत धारातीर्थी पडल्यावर त्यावेळच्या सनातनी लोकांनी त्यांच्यावर सती जाण्यासाठी दबाव आणला पण सासरे सरदार मल्हारराव होळकर यांनी या अमानवी, सनातनी परंपरेला विरोध करून अहिल्यादेवींना सती जाण्यापासून परावृत्त केले. आपल्या सासऱ्यांच्या इच्छेनुसार त्यांनी सती जाण्याचा विचार सोडून दिला. 

  अहिल्यादेवींची राजकीय कारकीर्द तेंव्हापासूनच सुरू झाली. खंडेरावांची जागा अहील्यादेवींनी घेतली. मल्हारराव देशभर मोहिमांवर व्यस्त असत त्यावेळी मल्हारराव आणि अहिल्यादेवींमध्ये पत्रव्यवहार होत. सासरा - सुनेमधील पत्रव्यवहार हा अहिल्यादेवींच्या राजकीय विचारकतेचा उत्कृष्ट नमुना होय. मोहीमेवर असताना मल्हारराव  प्रजा  रक्षणाच्या सूचना अहिल्यादेवींना जसे देताना दिसतात तसेच अहिल्यादेवी आपल्या सासऱ्यांना देताना दिसतात. सासरा सुनेचे ऐकल असा तो काळ नव्हता....आता ही नाही...पण मल्हाररावांसारखा मुत्सद्दी अहिल्यादेवींचा सल्ला अंमलात आणत यावरुनच अहिल्यादेवींची योग्यता लक्षात येते. मल्हारराव मोहिमेवर असत  तेंव्हा स्वतः अहिल्यादेवी राज्याचा बंदोबस्त चोख राखीत. मल्हाररावांच्या सूचनेप्रमाणे त्या कारभार करीत. 

१७६६ साली मल्हाररावांचे वृद्धापकाळाने निधन झाले. दरम्यानच्या काळात अहिल्यादेवींनी स्त्रियांना लष्करी प्रशिक्षण देणारे महाविद्यालय सुरू केले. ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडायला बंदी होती त्याकाळात त्यांनी स्वतःची ५०० महिलांची पलटण उभी केली. अहिल्यादेवींचे प्रशासन ब्रिटिशांनाही आदर्शभूत ठरले. सर्व देशात जेंव्हा दांडगाईचे राज्य होते, कोणाचा कोणाला पायपोस नव्हता त्याकाळात सुरळीत चालणारे एकमेव राज्य म्हणजे अहिल्यादेवींचे राज्य. अहिल्यादेवी या दानशूर, कर्तृत्वत्वान, धर्मपारायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जात असल्या तरी त्यांची राज्यकारभारावर प्रशासकीय पकड घट्ट होती. त्यांच्या वडिलांनी लहानपणी दिलेल्या शिकवणुकीचा आणि सासरे मल्हारराव यांनी दिलेल्या राजकीय कारभाराच्या तालमीचा त्यांना उपयोग झाला. त्या सामान्य कुटुंबातील असल्यामुळे त्यांना प्रजेच्या अडीअडचणीची जाणीव होती.  त्यांचे राहणे अतिशय साधे व सात्विक होते म्हणूनच त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नाव पडले.   

अहिल्यादेवींनी देशभर भ्रमंती केली. देशभ्रमण करताना तिर्थक्षेत्रांच्या जागी त्यांनी धर्मशाळा बांधल्या. शेकडो मंदिरांचा जिर्णोद्धार केला. जवळपास २८  वर्ष त्यांनी राज्यकारभाराचा गाडा    सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालवला. कोणतेही कर्ज न काढता राज्याची तिजोरी भक्कम करून त्यांनी प्रजाहिताकडे लक्ष दिले.  आदर्श राज्यकारभार कसा करावा याचा वस्तुपाठच अहिल्यादेवींनी घालून दिला. अहिल्यादेवी होळकर हे नाव  इतिहासात अमर झाले. बाई काय राज्यकारभार करणार ही सनातनी अटकळ त्यांनी खोटी ठरवली. १३ ऑगस्ट १७९५ रोजी अहिल्यादेवींचे निधन झाले. प्रजाहितदक्ष, आदर्श राजकर्ती म्हणून इतिहासात अजरामर झालेल्या  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज ३०० वी  जयंतीदिनी विनम्र अभिवादन! 

  • श्याम ठाणेदार
  • दौंड जिल्हा पुणे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com