अनधिकृत बांधकामांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख बेकायदेशीर अनैतिक धंद्यांचे शहर म्हणून देखील आहे. याचा प्रत्यय आज माजी नगरसेवक आणि ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी प्रसार माध्यमांना पुराव्यासह दाखवून दिला. वर्तकनगर नाका परिसरातील म्हाडाच्या भुखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर या बांधकामांमधून जुगाराचे धंदे बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे चव्हाण यांनी प्रसार माध्यमांना दाखवले. खरे तर हा भूखंड म्हाडाने ठामपाला हस्तांतरीत केलेला असून त्यावर ठामापाने पीपीपी तत्वावर पुर्णबांधणीची योजना सरु केलेली आहे. ज्याद्वारे विविध प्रकल्पबाधीतांचे पुनर्वसन या ठिकाणी करण्यात येणार आहे. मात्र अनधिकृत बांधकामे आणि त्यात सुरु असणारे गैरकानुनी, अवैध धंदे यामुळे ही योजना सुरूच होत नाही. इतकेच नव्हे तर हे धंदे बंद होऊ नये म्हणून राजकीय नेते ठामपावर दबाव आणत आहेत.
वर्तकनगर नाका परिसरातील म्हाडाच्या या भुखंडावर लबडे नावाच्या व्यक्तिने जमिनाचा कब्जा करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केलेली असल्याची माहिती मिळत आहे. त्यातील काही बांधकामामध्ये पत्त्याचे रमी क्लब सुरु आहेत. सध्या विकी सावके व पापा सावके नावाचे दोन बंधू हा क्लब भाड्याने चालवतात. यांचे राजकीय सत्ताधाऱ्यांसोबत साटेलोटे असल्यानेच हे धंदे राजरोसपणे सुरु आहेत. स्थानिक पोलिस स्टेशनला वारंवार सांगुन सुद्धा हा क्लब बंद केला जात नाही. हे अवैध जुगाराचे अड्डे तात्काळ बंद करावे यासाठी ठामपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. यावर तात्काळ कारवाई न झाल्यास आपण धरणे आंदोलन करणार असल्याचे चव्हाण यांनी जाहिर केले.
0 टिप्पण्या