महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. तर उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी ना उमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करावे, असे आवाहन केले आहे. दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
दहावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५८ हजार ०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी ९४.१० अशी आहे...नऊ विभागीय मंडळांमधून एकूण ९,६७३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,५८५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यातील ८,८४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९२.२७ अशी उल्लेखनीय आहे. या विद्यार्थ्यांचेही श्री. भुसे यांनी अभिनंदन केले आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९६.१४ इतकी असून मुलांची टक्केवारी ९२.३१ इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ टक्क्यांनी जास्त आहे.
दहावीच्या एकूण २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर २३ हजार ४८९ शाळांपैकी ७९२४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ७४५ विद्यार्थी प्रविण्यासह प्रथम श्रेणीत तर ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण मंत्र्यांनी कौतुक केले आहे.
*विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी...*राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९८.८२ टक्के इतका असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९०.७८ टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात ९४.८१, छत्रपती संभाजीनगर विभागात ९२.८२, मुंबई विभागात ९५.८४, कोल्हापूर विभागात ९६.८७, अमरावती विभागात ९२.९५, नाशिक विभागात ९३.०४ आणि लातूर विभागात ९२.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे
मुबाई महानगरपालिकेच्या शाळांचा मागील तीन वर्षांचा निकाल पाहता मार्च २०२३ मध्ये ८४.७७ टक्के, मार्च २०२४ मध्ये ९१.५६ टक्के तर या वर्षी म्हणजेच मार्च २०२५ मध्ये ९२.९२ टक्के इतका निकाल लागला आहे. मागील वर्षी ७९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. तर, यावर्षी ८९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
मुबाई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा दहावीचा निकाल वृद्धीसाठी नियोजन करुन विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली. दहावी परीक्षेच्या धर्तीवर शालेय स्तरावर सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या.
मुबाई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत दहावी परीक्षा निकाल वृद्धीसाठी नियोजन करुन विद्यार्थ्यांची तयारी करुन घेण्यात आली. महानगरपालिकेने स्वतःची 'मिशन मेरिट' सराव पुस्तिकेची निर्मिती केली आहे. ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण प्राप्त होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांचा सराव होण्याकरिता शिक्षणमंडळाच्या धर्तीवर शालेय स्तरावर दहा सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात येतात. सर्व अधिकाऱयांना शाळा दत्तक देवून मार्गदर्शन करण्यात येते. दरमहा दत्तक अधिकारी व मुख्याध्यापकांच्या सभा घेण्यात येतात. निकालवृद्धीबाबत शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. शिक्षणमंडळाच्या नियमकांची व्याख्याने आयोजित केली जातात. विद्यार्थी, शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षणीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय साधून वेळोवेळी निकालवृद्धीसाठी सभा घेण्यात येतात.
*मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर सीबीएसई शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल ८२ टक्के निकाल*
मुबाई महानगरपालिकेमार्फत सन २०२०-२१ मध्ये के पूर्व विभागात मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर ही सीबीएसई मंडळाची शाळा सुरू करण्यात आली. सदर शाळेत सीबीएसई मंडळाच्या नियमावलीनुसार अभ्यासक्रम सुरू आहे. सन २०२४-२५ मध्ये सदर शाळेत नैसर्गिक वाढीने इयत्ता १० वी चा वर्ग होता. त्यामध्ये एकूण ३८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होते. त्यापैकी १३ विद्यार्थी ८० टक्क्यांहून अधिक श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मिशबाह फारुखी या विद्यार्थिनीने ९१ टक्के गुण प्राप्त केले आहेत
0 टिप्पण्या