Top Post Ad

नालेसफाईचा बोजवारा...तुंबलेली गटारे स्वच्छ करण्यासाठी शिवसैनिक सरसावले

नुकत्याच झालेल्या पहिल्याच पावसाने मुंबईसह दोन्ही उपनगरांना झोडपून काढलं.धुवंधार पडलेल्या पावसामुळे अवघी मुंबापुरी पाण्याखाली गेली.   पहिल्याच पावसाने मुंबई तुंबल्याने  सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये  तुफान  चिखलफेक झाली . एकमेकांना दूषणं देण्यात धन्यता मानणाऱ्या नेत्यांना याबाबत  पश्र्चाताप करण्याऐवजी एकमेकांना दूषणं देण्यात ही  मंडळी मश्गूल  असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले . ही खेदाची बाब आहे म्हणूनच  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य मानून  विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मधील शिवसैनिकांनी  स्वच्छता अभियान राबविले . अशी माहिती शिव आरोग्य सेनेचे समन्वयक  प्रकाश  वाणी यांनी दिली.

      मुसळधार पावसाने दिलेल्या तडाख्याने मुंबईची  तुंबई झाली होती.नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि आरोग्याचा दृष्टीकोन लक्षात घेऊन घाटकोपर मधील शिवसैनिकांनी राजावाडी रुग्णालय आणि परिसरातील गटारे स्वच्छ केल्याने नागरिकांना दिलासा   मिळाला आहे.यावेळी विधानसभा संघटक व शिक्षक -  शिक्षकेत्तर कर्मचारी सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे ,चंद्रकांत हळदणकर यांच्यासह असंख्य शिव सैनिक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी पालक कृती संघाचे अध्यक्ष नरेंद्र सावंत यांनी शिवसैनिकांचे कौतुक करत आभार मानले .

दरम्‍यान महानगरपालिकेने केलेल्या पावसाळी नियोजनानुसार, सखल भागातील पाणी उपसा करण्यासाठी नियुक्त केलेल्या लघु उदंचन केंद्र परिचालकांनी निविदेतील अटी व शर्तीप्रमाणे यंत्रणा न उभारल्याने तसेच पुरेशा क्षमतेने कार्यान्वित केली नाही, या कारणाने त्यांना प्रत्येकी १० लाख रूपयांचा दंड आकारण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्‍यानुसार, हिंदमाता, गांधी मार्केट, येलो गेट आणि चुनाभट्टी लघु उदंचन केंद्र परिचालकांकडून प्रत्‍येकी १० लाख रूपये म्‍हणजेच एकूण ४० लाख रूपये दंड ठोठावला आहे.  
नागरी भागात पावसाचे पाणी साचू नये, सखल भागांमध्ये साचणारे पावसाचे पाणी उपसून वाहून नेता यावे, पर्यायाने रस्‍ते वाहतूक सुरळीत राहावी तसेच पावसाळी पाण्‍याचा निचरा अधिक वेगाने व्‍हावा यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने विविध ठिकाणी १० ठिकाणी लघू उदंचन केंद्र (Mini Pumping Station) उभारली आहेत. या केंद्रांचे परिचालन कंत्राटदारामार्फत केले जाते. त्यासाठी निविदेमध्ये नमूद केल्याप्रमाणे अटी व शर्ती देखील ठरवून देण्यात आल्या आहेत. दिनांक २५ मे २०२५ पर्यंत संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मुंबई महानगरात सोमवार, दिनांक २६ मे २०२५ रोजी मे महिन्यातील विक्रमी पावसाची नोंद झाली. अवघ्या १३ तासांमध्ये २५० मिलीमीटर पावसाची नोंद अनेक ठिकाणी झाली. सततच्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर कार्यरत होती. तथापि, हिंदमाता, गांधी मार्केट, यलो गेट आणि चुनाभट्टी येथे अतिसखल भागात जोरदार पावसाने पाणी साचल्‍याचे निदर्शनास आले. पावसाळी पाण्‍याचा निचरा करण्‍यासाठी नेमलेली लघू उदंचन केंद्र यंत्रणा पुरेशा क्षमतेने व वेळेत कार्यान्वित झाली नाही, असे आढळून आले. याचा विपरित परिणाम म्हणून, हिंदमाता व गांधी मार्केट सारख्या परिसरात वाहतूक व जनजीवन बाधित झाले. तसेच, मस्जिद उपनगरीय रेल्वे स्थानक परिसरांमध्ये काही मिनिटे पाणी साचून उपनगरीय रेल्वेच्या संचालनात अडथळा उद्भवला. चुनाभट्टी येथे फारसा पाऊस झाला नसला तरी याठिकाणी पंप पूर्ण क्षमतेने कार्यरत नव्हते. याची दखल घेऊन परिचालकास दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने हिंदमाता, गांधी मार्केट, यलो गेट आणि चुनाभट्टी येथील लघु उदंचन केंद्र परिचालकांना निविदा अटी व शर्तीप्रमाणे यंत्रणा न उभारल्याचा, पुरेशा क्षमतेने व वेळेत यंत्रणा कार्यान्वित केली नाही, असा ठपका ठेवत दंडात्‍मक कारवाई करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यानुसार, प्रत्‍येकी १० लाख रूपये याप्रमाणे एकूण ४० लाख रूपयांचा दंड ठोठावण्‍यात आला आहे. 
पावसाळी नियोजनानुसार नेमून दिलेल्या कामकाजात, कार्यवाहीत कोणत्‍याही प्रकारचा हलगर्जीपणा, त्रुटी खपवून घेतली जाणार नाही. तसे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुन्हा एकदा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com