बनावट नकाशाचा आधार घेऊन मढ परिसरात अनधिकृतपणे करण्यात आलेल्या बांधकामांविरोधातील कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून अधिक तीव्र करण्यात आली आहे. पी (उत्तर) विभागातील मढ परिसरातील एरंगळ आणि वलनाई येथील १४ अनधिकृत बांधकामे आज (दिनांक १३ मे २०२५) निष्कासित करण्यात आली. मागील दोन आठवड्यात या कारवाई अंतर्गत एकूण २४ बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत.
बनावट नकाशाचा आधार घेऊन मागील वर्षभरात मढ भागात १०१ अनधिकृत बांधकामे उद्भवल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त (परिमंडळ-४) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे आणि सहायक आयुक्त (पी उत्तर) श्री. कुंदन वळवी यांच्या नेतृत्वात ही निष्कासन कारवाई हाती घेण्यात आली आहे. मागील आठवड्यात करण्यात आलेल्या दोन कारवाईत एक बंगला आणि अन्य ९ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. ही कारवाई आज (दिनांक १३ मे २०२५) अधिक तीव्र करत १४ बांधकामे निष्कासित करण्यात आली. यापैकी ३ बांधकामे एरंगल परिसरातील असून त्यांचे क्षेत्रफळ अनुक्रमे १९००, १७०० आणि ६५० चौरस फूट आहे. उर्वरित ११ बांधकामे वलनाई गावातील असून त्यांचे क्षेत्रफळ प्रत्येकी २०० ते ३०० चौरस फूट इतके आहे.
तीन जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने सदर अनधिकृत बांधकामांचे पाडकाम करण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे १० अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता. दरम्यान, बनावट नकाशा प्रकरणातील एकूण १०१ अनधिकृत बांधकामे मे अखेरपर्यंत निष्कासित करण्यात येतील. तोपर्यंत ही मोहीम सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
बोरिवलीतील २० हजार चौ.फू.क्षेत्रफळावरील अनधिकृत मंगल कार्यालयावर महापालिकेचा हातोडा
बोरिवली (पश्चिम) जोड मार्गावरील, एस.के. रिसॉर्ट जवळील एका खासगी अनधिकृत मंगल कार्यालयाचे आज दिनांक १० मे २०२५ रोजी निष्कासन करण्यात आले. सुमारे २० हजार चौरस फूट क्षेत्रफळावर वसलेल्या या मंगल कार्यालयावर आर मध्य विभागाने निष्कासन कार्यवाही केली. बोरिवली पश्चिम जोड मार्गावर 'के. डिव्हाईन लॉन्स अँड कन्व्हेन्शन' हे मंगल कार्यालय सुमारे २० हजार चौरस फूट क्षेत्रफळावर वसले आहे.
मात्र ते अनधिकृत असल्याने आर मध्य विभागाने तोडक कार्यवाहीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. निष्कासन कार्यवाही आज १० मे सकाळी ८.१५ वाजता सुरू करण्यात आली. २ पोकलेन, ५ जेसीबी, १ अग्निशामक बंब तसेच १५ अभियंते, ५० कामगार व स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही तोडक कार्यवाही दुपारी ११.४५ वाजता पूर्ण करण्यात आली. उप आयुक्त (परिमंडळ-७) संजय कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही तोडक कार्यवाही करण्यात आली.
0 टिप्पण्या