ठाणे जिल्ह्याने मागील काही वर्षांत विकासाची मोठी झेप घेतलेली दिसत आहे. अगदी दळणवळण, रस्ते, वाहतूक, हॉस्पिटल्स आदी विभागात चौफेर कामं सुरू आहेत. ठाणे शहराचे पाहाल तर 25 वर्षांपूर्वीचे ठाणे आणि आजचे ठाणे यात जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. ठाण्यात दोन नाट्यगृह आहेत, तिसरा कळव्यातील नाट्यगृहाची तयारी चालू आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियमने कात टाकली आहे. याठिकाणी फाइव्ह स्टार हॉटेलच्या कामाच्या निविदा प्रक्रिया सुरु आहे. घोडबंदरात बोरीवडेत नव्या स्पोर्ट क्लबची जमवाजमव सुरू झाली आहे. इतके सगळे असले तरी एका सशक्त शहराची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी किमान एका साहित्य, वास्तू, वस्तू संग्रहालयाची गरज असते.
ठाण्यासारख्या शहराला, जिल्ह्याला की ज्या शहराला प्राचीन वारसा लाभलेला आहे, जाज्वल्य इतिहास लाभलेला आहे आणि सागरी, नागरी, डोंगरी असा भूगोल देखील लाभलेला आहे. इथली आदिम संस्कृती, इथली प्राचीन धार्मिक स्थळे, इथल्या नद्या, धरणं आणि अती उच्च कोटीचं लाभलेलं जंगल, खाडी किनारे, भिवंडीच्या लोनाड शिवालय, खिडकाळेश्र्वर, अंबरनाथचे शिवमंदिर, कोपिनेश्वर मंदिर, आगरी कोळी संस्कृती, शिलाहार, बिंब काळातील प्रतिकं, शिवकाळातील इतिहास, स्वातंत्र्य काळातील इतिहास अशी भली मोठी यादी या शहराला, या जिल्ह्याला जोडलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा ऊहापोह होईल असे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संग्रहालयाची गरज आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या धर्तीवर ठाण्यात देखील छानसे संग्रहालय उभे राहू शकते. यासाठी लागणाऱ्या गोष्टी ठाण्यात उपलब्ध देखील आहेत.नाही म्हणायला ठाण्यातील हाजूरी येथे डॉ. विजय बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राच्य विद्या अभ्यास संस्थेचे काम चालू आहे. याठिकाणी भारतीय संस्कृती, इतिहास, भाषा, विविध लिपी यांचा अभ्यास आणि संशोधन केले जाते. या संस्थेकडून कधी कधी प्रदर्शने देखील भरवली जातात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी अनेक दुर्मिळ, प्राचीन मूर्ती, शिलालेख, वस्तू आहेत. जवळपास 30 हजार संदर्भ ग्रंथ आणि साडे तीन हजार पोथ्या आणि दुर्मिळ हस्तलिखिते असा मौल्यवान ऐवज आहे. मात्र हे ना ठाणेकरांना माहीत आहे ना पर्यटकांना. याच प्राच्य विद्या अभ्यास संस्थेला सोबत घेऊन ठाण्यात एक मोठं आंतरराष्ट्रीय संग्रहालयाची निर्मिती व्हायला हवी. ठाण्यातील प्राचीन सिद्धेश्वर तलावात सापडलेल्या मूर्ती, टाऊन हॉल येथे असलेली सामुग्री, पावणे दोनशे वर्षांपूर्वीचे ठाणे नगर वाचन मंदिर, मराठी ग्रंथ वाचनालय यांची देखील मदत होईल.या संग्रहालयामुळे केवळ ठाण्याचे पर्यटन बहरणार नाही तर ठाण्याचे नाव जगाच्या नकाशावर अधिक प्रभावी ठरेल.
जयदास मोरे
0 टिप्पण्या