Top Post Ad

निकृष्ट दर्जाचे काम.., दुय्यम अभियंता निलंबित तर कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड

रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे अत्युच्च गुणवत्तेची व्हावीत, यासाठी महानगरपालिका प्रशासन आग्रही भूमिका घेत आहे. तसेच निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या किंवा कामात हलगर्जीपणा करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. या अनुषंगाने, एच (पश्चिम) विभागात एका रस्ते कामात 'सब बेस लेयर' म्हणून वापरल्या जाणाऱ्या ड्राय लीन काँक्रिट (DLC) मिश्रणात गुणवत्तेचा अभाव आढळून आल्यावर संबंधित दुय्यम अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, रस्ते कंत्राटदाराला ५० लाख रुपये आणि गुणवत्ता नियंत्रण संस्थेस २५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, निकृष्ट दर्जाचे काम त्वरित काढून टाकून पुन्हा दर्जेदार पद्धतीने काम करण्याचे निर्देश देखील कंत्राटदारास देण्यात आले आहेत.


   महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ही सक्त कारवाई करण्यात आली आहे. रस्ते कॉंक्रिटीकरण कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा अथवा त्रुटी खपवून घेतली जाणार नाही. जिथे दोषपूर्ण प्रकार आढळतील तिथे सर्व संबंधित जबाबदार व्यक्ती अथवा संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका आयुक्तांनी दिला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. दिनांक ३१ मे २०२५ पूर्वी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्णत्वास जावे, यासाठी सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करण्यात आले आहे. प्रत्येक रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निश्चित तारीख ठरविण्यात आली आहे. तसेच, रस्त्यांची कामे सुरू असताना अभियंत्यांनी उपस्थित रहावे व कार्यस्थळी आकस्मिक भेट (सरप्राईज व्हिजिट) द्यावी, कामे अधिक वेगाने पार पाडताना गुणवत्तेवरही भर द्यावा, निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरोधात कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. रस्ते कॉंक्रिटीकरण कामांवर देखरेख आणि निरीक्षण करण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  बांगर हे नियमितपणे विविध प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन रस्ते कामांची पाहणी करत आहेत. 

याच अनुषंगाने, श्री. बांगर यांनी दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी पश्चिम उपनगरातील एच (पश्चिम) विभागातील रस्ते कामांना आकस्मिक भेट दिली. ड्राय लीन काँक्रिटचे (DLC) निरीक्षण केले असता ग्रेडेशन, मिक्स डिझाईन, कॉम्पक्शन इत्यादी बाबतीत गुणवत्तेचा अभाव आढळून आला. पृष्ठभागावर उंच सखलता व असमानता या त्रुटी आढळून आल्या. याची गंभीर दखल घेत, महानगरपालिकेचे दुय्यम अभियंता, कंत्राटदार आणि गुणवत्ता नियंत्रण संस्था (Quality Monitoring Agency) यांना 'कारणे दाखवा नोटीस' बजावण्यात आली. 

ड्राय लीन काँक्रिटचा क्युरिंग कालावधी कमीत कमी सात दिवसांचा आवश्यक आहे. प्रत्यक्ष कार्यस्थळी विचारणा केली असता संबंधितांनी ड्राय लीन काँक्रिट होऊन सात दिवस पूर्ण झाल्याचे सांगितले. तथापि, प्रत्यक्षात तीनच दिवस पूर्ण झाल्याचे कंत्राटदाराने लेखी खुलासापत्रात मान्य केले. तसेच, तांत्रिक तपशिलांनुसार आवश्यक असलेली फील्ड ड्राय डेन्सिटी (Field Dry Density - FDD) ही चाचणी आकुंचनाच्या (compaction) वेळेस करण्यात आली नसल्याचे देखील स्पष्ट झाले.या सर्व प्रकारची गंभीर दखल घेत निष्काळजीपणा आणि दुर्लक्षितपणा केल्याबद्दल दुय्यम अभियंता, कंत्राटदार आणि गुणवत्ता देखरेख संस्था यांना कारणे दाखवा (Show Cause) नोटीस बजावण्यात आली. तसेच खुलासा मागविण्यात आला.

तथापि, संबंधितांकडून प्राप्त खुलासा असमाधानकारक असल्याने तो अमान्य करण्यात आला. यामुळे, संबंधित दुय्यम अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर, रस्ते कंत्राटदाराला ५० लाख रुपये आणि गुणवत्ता नियंत्रण संस्थेस २५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, निकृष्ट दर्जाचे काम त्वरित काढून टाकून पुन्हा ते काम दर्जेदार पद्धतीने करण्याचेदेखील निर्देश कंत्राटदारास देण्यात आले आहेत

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर म्‍हणाले की, रस्ते कामात गुणवत्ता राखण्याची जबाबदारी कंत्राटदार, गुणवत्ता नियंत्रण संस्था आणि संबंधित अभियंता या सर्वांची आहे. सदर कामामध्ये त्रुटी आढळल्यास सर्व सबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, अशी समज आधीच देण्यात आली आहे. काम करताना अजाणतेपणे चूक झाली असेल तर ती चूक क्षम्य राहील. मात्र काम टाळण्याच्या उद्देशाने किंवा कामात मुद्दाम दुर्लक्ष केल्यास किंवा चुकीच्या उद्देशाने काम केल्यामुळे गुणवत्तेमध्ये काही त्रुटी आढळली तर मात्र सक्त कारवाई केली जाईल, असा इशाराही  बांगर यांनी दिला आहे.  

जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्प हाती घेतले जाते तेव्हा ती कामे अत्युच्च गुणवत्ता राखणारी असावीत, असा महानगरपालिकेचा आग्रह राहिलेला आहे. या आग्रहावर महानगरपालिका ठाम असून त्यादृष्टीनेच कंत्राटदार, गुणवत्ता नियंत्रण संस्था आणि अभियंता यांनी चोख कामे करावीत अन्यथा महानगरपालिका प्रशासन संबंधितावर कठोर कारवाई करण्यात हयगय करणार नाही, असेही श्री. बांगर यांनी स्पष्ट केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com