सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या शक्तिपीठ विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांना कोल्हापूर महानगरपालिकेने निलंबित केलं आहे. गिरीश फोंडे हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागात सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते. पण याचबरोबर गिरीश फोंडे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून चळवळीमध्ये सहभाग होता. सध्या शक्तिपीठ विरोधी कृती समितीचे 12 जिल्ह्यातील समन्वय म्हणून देखील फोंडे काम पाहत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असताना गिरीश फोंडे यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्याला विरोध केला होता. त्याचबरोबर हा दौरा शक्तीपीठ विरोधी कृती समिती हाणून पाडेल असा इशारा देखील फोंडे यांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई कोणतीही नोटीस न देता करण्यात आल्याने आता फोंडेंनी न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी केली आहे.
- > गिरीश फोंडे हे पुरोगामी डाव्या चळवळीमध्ये एन. डी. पाटील, गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत चळवळ करत वाढलेले नेतृत्व आहे.
- > गिरीश फोंडे यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठापासून ते जगातील कानाकोपऱ्यात विद्यार्थी युवक चळवळीचे नेतृत्व केले आहे.
- > पन्नासहून अधिक गावांमध्ये गिरीश फोंडेंनी दारूबंदी केली आहे.
- > शाळा वाचवण्यासाठी व विद्यार्थी शिक्षकांच्या हक्कासाठी गिरीश फोंडे अग्रेसर राहिले आहेत.
- > पर्यावरण चळवळीत गिरीश फोंडेंचा सक्रिय सहभाग आहे.
- > जातीअंतासाठी गिरीश फोंडेंनी आंतरजातीय चळवळ उभी केली आहे.
- > संविधानाचे प्रबोधन करत गिरीश फोंडेंनी ते चळवळीच्या घराघरात पोहोचवले.
- > छत्रपती शिवाजी महाराजांचे व शाहू महाराजांचे विचार गिरीश फोंडे विविध कार्यक्रमा व परिषदांच्या माध्यमातून देशभर पोहोचवण्याचे काम करत आहेत.
- > गिरीश फोंडेंनी जगभर व्याख्याने दिली आहेत. तसेच अनेक लेख लिहिले आहेत.
- > बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गावर विरोधात गिरीश फोंडेंनी सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोट बांधून एक वर्ष आंदोलन उभं केलं आहे.
> उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करून त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचे कारण पुढे करत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 कलम 5 (1) मधील तरतुदीचा भंग झाल्याने त्यांच्यावर उपायुक्त पंडित पाटील यांनी ही कारवाई केलीआहे.
> यापूर्वी फोंडे यांनी शिक्षणसेवक या पदावर असताना प्राथमिक शिक्षण मंडळ, नगरसेवक व सभापती यांनी शिक्षकांकडे बेकायदेशीरपणे पैशांची मागणी केली होती. त्या विरोधात त्यांनी निवेदन महापौरांना दिल्यामुळे नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात सूडबुद्धीने कारवाई करून निलंबित केले होते.
> यावेळी गिरीश फोंडे यांना माफी मागण्यास सांगितले होते पण त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम नकार दिला होता. शेवटी कोर्टाच्या आदेशाने त्यांची पुनर्नियुक्ती झाली होती.
> तेव्हा 13 सप्टेंबर 2004 चे आदेशाने त्यांची सेवा समाप्ती करण्यात आली होती. त्यानंतर अध्यक्ष, ग्रीव्हेन्स कमिटी, मुंबई यांचे आदेशानुसार दि.17 फेब्रुवारी 2005 रोजी त्यांना पुनश्चः सेवेत हजर करून घेण्यात आले होते.
0 टिप्पण्या