Top Post Ad

नालेसफाईचे उद्दिष्ट्य केवळ गाळ उपसा करणे नसून, पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थिती रोखणे हे आहे

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  अभिजीत बांगर यांनी आज घाटकोपर (पूर्व) येथे छेडा नगर जंक्शनजवळ सोमय्या नाला, कुर्ला स्थित माहूल खाडी नाला, शिवडी-चेंबूर रस्त्यावर माहूल खाडी नाला, वडाळा येथे रावळी निम्नस्तर नाला, कुर्ला (पूर्व) येथील नेहरूनगर नाला, धारावी टी जंक्शन येथे दादर-धारावी नाला इत्यादी ठिकाणी  बांगर यांनी पाहणी दौरा केला. नालेसफाईचे उद्दिष्ट्य केवळ गाळ उपसा करणे नसून, पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थिती रोखणे हे आहे, त्यानुसार कार्यपद्धतीत सुधारणा करावी. सर्व नालेनिहाय व दिवसनिहाय गाळ उपश्याचे नियोजन करावे. गाळ उपसा कामांशी सर्व संबंधित अभियंत्यांनी फक्त कार्यालयात थांबून कामांचा आढावा घेऊ नये, तर गाळ काढण्याच्या कालावधीत प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहून कामांवर योग्य देखरेख करणे अनिवार्य आहे. नाल्यांमध्ये घनकचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक तिथे नाल्याच्या दोन्ही बाजूला जाळी लावण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  अभिजीत बांगर यांनी दिले. 

मुंबई महानगरात पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नदी-नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे दरवर्षाप्रमाणे सुरू आहेत. तथापि, गाळ उपश्याच्या पलीकडे जाऊन पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती रोखणे, हा नाले स्वच्छता करण्याचा प्राधान्याने उद्देश असला पाहिजे. ही बाब लक्षात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीमध्ये योग्य ती सुधारणा करावी. सर्व प्रमुख नाल्यांच्या बाबतीत गाळ उपसा करण्याचे नालेनिहाय आणि दिवसनिहाय नियोजन करावे. सर्व संबंधित अभियंत्यांनी फक्त कार्यालयात आढावा न घेता, प्रत्यक्ष कार्यस्थळी दररोज उपस्थित राहून गाळ उपसा कामांवर योग्य देखरेख करावी, अशा स्पष्ट सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत. तसेच नाल्यांमध्ये नागरिकांना घनकचरा फेकण्यापासून अटकाव करण्यासाठी आवश्यक त्या-त्या ठिकाणी नाल्याच्या दोन्ही बाजूला जाळी लावण्याची कार्यवाही सत्वर करावी, असे निर्देश देखील बांगर यांनी दिले आहेत.  

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून प्रमुख नाल्यांमधून गाळ उपसा करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. या अनुषंगाने पूर्व उपनगरांमधील प्रमुख नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची तसेच मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी १० एप्रिल रोजी पाहणी केली. या दौऱ्याप्रसंगी उप आयुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या)  श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते. या दौऱ्यात घाटकोपर (पूर्व) येथे छेडा नगर जंक्शनजवळ सोमय्या नाला, कुर्ला स्थित माहूल खाडी नाला, शिवडी-चेंबूर रस्त्यावर माहूल खाडी नाला, वडाळा येथे रावळी निम्नस्तर नाला, कुर्ला (पूर्व) येथील नेहरूनगर नाला, धारावी टी जंक्शन येथे दादर-धारावी नाला इत्यादी ठिकाणी  बांगर यांनी भेट दिली. तसेच वांद्रे कुर्ला संकूल परिसरात भेट देवून मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली. प्रत्येक नाल्याच्या वरील आणि खालच्या बाजूस असलेले प्रवाह, नाल्यांच्या परिसरात जोरदार पावसाप्रसंगी पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे, त्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना, या सर्व बाबींची सविस्तर माहिती घेऊन बांगर यांनी आवश्यक ते निर्देश दिले.

सोमय्या नाला येथील माहिती देताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, जॉली जीमखाना येथे सध्याचे ०.९ मीटर रुंद रस्त्यालगतच्या बॉक्स ड्रेनची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने १.२ मीटर रुंद नवीन बॉक्स ड्रेन बांधण्याचे प्रस्तावित आहे. तसेच मेघराज जंक्शन येथे सध्याच्या १.२ मीटर रुंद मोरी पेटिकेच्या (बॉक्स ड्रेन) जागी नवीन २ मीटर रुंद मोरी पेटिका (बॉक्स ड्रेन) बांधण्यात येणार आहे. याच ठिकाणी रस्त्यालगतची पर्जन्य जलवाहिनी देखील बांधण्यात येणार आहे. सध्याच्या ०.६ मीटर रुंद पर्जन्य जल वाहिनीच्या तुलनेत नवीन पर्जन्य जल वाहिनी ०.९ मीटर रुंद असेल. त्यामुळे पाण्याचा निचरा वेगाने होवू शकेल, अशी माहिती अभियंत्यांनी दिली. या दोन्ही कामांच्या प्रशासकीय प्रक्रियेला गती द्यावी. मंजुरीसह कामे तातडीने हाती घेवून पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील असे पहावे, अशा सूचना बांगर यांनी केल्या. 

कुर्ला स्थित माहूल खाडी नाला संदर्भात माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, माहूल खाडी नाल्यास परिसरातील इतर काही नाले जोडले गेले आहेत. त्यामध्ये विनय मंदिर, भारती नगर, कामगार नगर, टिळक नगर, नेहरू नगर, एटीआय, राहूल नगर इत्यादी नाल्यांचा समावेश आहे. सुमारे २ किलोमीटर लांबीच्या या नाल्यास अवघा १ मीटर उतार आहे. या कारणांनी सदर नाल्यातून पाणी संथगतीने बाहेर पडते. परिणामी, अतिवृष्टीप्रसंगी पुराची शक्यता वाढते, असे अभियंत्यांनी स्पष्ट केले.  या संदर्भात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त  बांगर यांनी सूचना केली की,  ब्राह्मणवाडी कल्व्हर्ट येथे रोबोटिक संयंत्राच्या सहाय्याने सुनियोजित स्वच्छता (सिस्टीमॅटिक क्लिनिंग) दिनांक १५ मे २०२५पूर्वी पूर्ण करावी. तसेच कुर्ला पश्चिम येथे मोरेश्वर पाटणकर मार्ग भागातील प्रस्तावित पावसाळी पाणी साठवण टाकी (होल्डिंग पॉण्ड) व पर्जन्य जल उपसा यंत्रणा उभारण्या संदर्भात अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय प्रस्ताव सादर करावा. तसेच यंदाच्या पावसाळ्यात पाणी निचरा वेगाने होण्यासाठी  त्या ठिकाणी अतिरिक्त उदंचन यंत्रणा (पंप) स्थापन करावी, असे त्यांनी निर्देश दिले.  

शिवडी-चेंबूर रस्त्यावर माहूल खाडी नाला येथे पाहणीनंतर श्री. बांगर यांनी सूचना केल्या की, आरसीएफ प्रकल्पाची संरक्षक भिंत नाल्यालगत कोसळल्यामुळे व तेथील झुडपांमुळे नाल्याच्या प्रवाहाला अवरोध होतो आहे. त्यामुळे पुराची शक्यता वाढते. हे लक्षात घेवून आरसीएफ भिंतीलगतची सर्व झुडपे गाळ उपसा करण्याच्या कामांसोबतच काढावीत. चंद्रोदय सोसायटी येथे मेट्रोची कामे सुरू असताना लहान पर्जन्य वाहिनीमध्ये खांब टाकण्यात आले. त्यामुळे निर्माण झालेली बाधा लक्षात घेता मेट्रोकडून जुन्या वाहिनीला समांतर अशी नवीन पर्जन्य जल वाहिनी बांधून घेण्यात आली आहे. तसेच टेंभे पुलाच्या परिसरातील पर्जन्य जल वाहिन्या कमी रुंदीच्या असल्याने त्यांची क्षमतावृद्धी करण्याचा प्रशासकीय प्रस्ताव मान्यता स्तरावर आहे. या प्रस्तावाची कार्यवाही वेगाने करावी. यंदाच्या पावसाळ्यासाठी तेथे अतिरिक्त पंप व्यवस्था करावी. जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवली तर ती अतिरिक्त व्यवस्थेसह योग्यरित्या हाताळावी, असे निर्देश बांगर यांनी दिले.  

वडाळा येथे रावळी निम्नस्तर नाल्याची पाहणी केल्यानंतर श्री. बांगर म्हणाले की, वडाळा ट्रक टर्मिनस ट्रांन्झिट कॅम्प सारख्या दाटीवाटीच्या वस्तीतून नाल्यांमध्ये घरगुती घनकचरा मोठ्या प्रमाणावर टाकल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. त्यामुळे या नाल्याची सातत्याने स्वच्छता करावी. तरंगत्या कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळा येवू नये याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यात व्हेईकल मॉउंटेड पंप आवश्यकतेनुसार उपलब्ध करून द्यावेत आणि पाण्याचा निचरा होईल, याची तजवीज करावी, असे त्यांनी सांगितले.   कुर्ला (पूर्व) येथील नेहरूनगर नाल्यातील पाण्याचा प्रवाह पाहता असे आढळले की, भरतीच्या परिणामामुळे नाल्यात पाणी अधिक आढळते. गतवर्षी पावसाळ्यात हा नाला काठोकाठ भरून वाहिला होता. अतिवृष्टी व सोबत भरती असेल तर या नाला परिसरात पाणी साचते. असे असले तरी त्याचा तुलनेने निचरा देखील लवकर होतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

धारावी टी जंक्शन येथे दादर-धारावी नाला पाहणीप्रसंगी आढळले की, नाल्याच्या एका बाजूला दुमजली घरे, दुकाने व आस्थापना आहेत. तेथून घरगुती, वाणिज्यिक कचरा नाल्यात फेकला जातो. ही बाब लक्षात घेता हा नाला एकदा स्वच्छ करून कार्यवाही पूर्ण होवू शकत नाही. एकापेक्षा अधिक वेळा नाला स्वच्छ करावा. गाळ तसेच तरंगता कचरा वारंवार काढावा. नाल्याच्या बाजूला घरांमधून कचरा फेकल्या जाण्याची समस्या आहे, अशा ठिकाणी जाळी बसवावी, अशी सूचना बांगर यांनी केली.  सर्व प्रमुख नाल्यांच्या बाबतीत गाळ उपसा करण्याचे नालेनिहाय आणि दिवसनिहाय नियोजन करावे, विभाग कार्यालये व संबंधित यंत्रणांशी समन्वय राखावा. लहान नाले व मोठे नाले यांचे प्रवाह परस्परांवर परिणाम करतात. त्यामुळे प्रसंगी आपल्या कार्यक्षेत्रा पलीकडे जावून सर्व नाले स्वच्छ झाले आहेत, याची खातरजमा करावी, अशा सूचनाही बांगर यांनी केल्या.

प्रमुख नाल्यांसह, मिठी नदीतून गाळ उपसा करण्याच्या कामाची देखील वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात भेट देवून श्री. बांगर यांनी पाहणी केली. एमएमआरडीए कार्यालय आणि धीरूभाई अंबानी शाळालगत अशा दोन ठिकाणी जावून  बांगर यांनी संपूर्ण पाहणी केली.  सुमारे १७ किलोमीटर लांबीच्या मिठी नदीतून गाळ काढण्याचे एकूण उद्दिष्ट्य, त्यासाठी आवश्यक संयंत्रे, कालावधी आदींबाबत  बांगर यांनी अधिकारी व अभियंते यांच्याशी सविस्तर चर्चा केली. प्रत्येक टप्प्यात किती गाळ काढणे अपेक्षित आहे, प्रत्येक टप्पा किती कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित आहे, याचे सूक्ष्म नियोजन करावे. सर्व कामे विहित वेळेत व पारदर्शकतेसह पूर्ण करावीत. जिथे गाळ मोजला जातो त्या वजनकाट्यांच्या ठिकाणी पुरेशा संख्येने सीसीटीव्ही लावावेत. त्यांचा पुरेसा बॅकअप असावा. गाळ काढण्याच्या प्रत्येक सत्राचा अभिलेख (रेकॉर्ड) चोखपणे नोंदवावा. येत्या ५१ दिवसांत म्हणजे दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत गाळ काढण्याचे काम पूर्ण होण्यासाठी अतिशय दक्ष राहून पर्यवेक्षण करावे, कामाची गुणवत्ता व पारदर्शकता राहण्यासाठी गाळ उपसा कामांशी सर्व संबंधित अभियंत्यांनी फक्त कार्यालयात थांबून कामांचा आढावा घेऊ नये, तर गाळ काढण्याच्या कालावधीत प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहून कामांवर योग्य देखरेख करणे अनिवार्य असेल. रात्री काम सुरू राहणार असेल तर त्यावेळी देखील अभियंत्यांनी उपस्थित रहावे, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले. त्याचप्रमाणे वन विभागाच्या हद्दीतून वाहणाऱ्या मिठी नदी प्रवाहाच्या ठिकाणी गाळ काढताना वन विभागासोबत योग्य समन्वय राखावा, अशी सूचनाही त्यांनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com