सामाजिक समता आज लोप पावत चाललेला विचार याला उजाळा देण्यासाठी सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसात कायम मांडत राहावे लागतील, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र जाधव यांनी केले. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा भाग असलेले एलफिस्टन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आंबेडकर जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानाच्या निमित्ताने ते बोलत होते.
शाहू फुले यांचा समतेचा विचार आणि संत गाडगे महाराजांचा अध्यात्मिक एकात्मतेचा विचार यांना एकत्र करून बाबासाहेबांनी केलेली वाटचाल पाहता आज केवळ संविधान बळकट आहे म्हणून आपला देश हा प्रगत झाला आहे, आपल्या देशाबरोबर ज्यांना स्वातंत्र्य मिळाले त्या देशाची अवस्था आज काय झाली आहे ते आपण पाहतोच आहोत हे ही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सौमित्रा सावंत आबिटकर, प्राचार्य एल्फिन्स्टन महाविद्यालय यांनी केले. डॉ. प्रा. रजनीश कामत, कुलगुरू, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आजच्या संगणकाच्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगातही संविधानासारखी मुद्देसुद मांडणी करणे हे खूप महत्त्वाचे असल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिभेकडे एका कुतूहलाने सारे विश्व पाहते, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ अकॅडमीचे प्रा. हेमंत सुधाकर सामंत, रूपारेल महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रा. प्रदीप जानकर, यशस्वी उद्योजक राजेंद्र भोसले, विपणन तज्ञ विक्रांत जाधव, स्टेट फॉरेन्सिक इन्स्टिट्यूटच्या प्रा. वंदना कांबळे आणि इतर मान्यवर प्राध्यापक गण उपस्थित होते. गेले आठवडाभर पु. ल. देशपांडे महाराष्ट्र राज्य कला अकॅडमी येथे आयोजित केलेल्या भव्य प्रदर्शनीसाठी एलफिस्टन महाविद्यालयात १९५२ साली अतिथी म्हणून आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जी खुर्ची जतन केलेली आहे ती समस्त जनतेला या प्रदर्शनात उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रदर्शनाचे आयोजक विनोद कांबळे यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे आभार मानले. डॉ. पराग मसराम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 टिप्पण्या