हरीकृष्ण गोस्वामी ते ‘भारत’ कुमार व्हाया मनोज कुमार....
भारत का रहने वाला हूं... भारत की बात सुनता हूं...' या गाण्याने देशभरात आणि जगभर प्रसिद्धी मिळवणारे अभिनेता मनोज कुमार आता या जगात नाहीत. त्यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी कोकिलाबेन रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी शशी गोस्वामी आणि मुलगा कुणाल गोस्वामी आहेत. 70 च्या दशकात देशभक्तीनं प्रेरणा घेत मनोज कुमार यांनी कलेच्या अर्थात चित्रपटांच्या प्रभावी माध्यमातून देशातील नागरिकांच्या मनावर देशाभिमान जागवतील असे एकाहून एक दर्जेदार चित्रपट साकारले. एक सच्चा देशभक्त कलाकार अशी त्यांची ओळख करून देण्यात कोणतीही अतिशयोक्तीय वाटायला नको. सहकलाकार जिथं विनोदी, साहसपट अशा माध्यामातून लोकप्रियता मिळवत होते तिथंच मनोज कुमार यांनी मात्र देशप्रेमाच्या भावनेला कलेची जोड देत एक यशस्वी वाटचाल केली. मनोज कुमार यांचा जन्म मुळचा पाकिस्तानचा. हरिकृष्ण गिरि गोस्वामी अशी त्यांची खरी ओळख. मात्र हिंदी कलाजगतामध्ये त्यांनी मनोज कुमार याच नावानं कमालीची लोकप्रियता मिळवली आणि प्रेक्षकांसाठी ते ठरले 'भारत कुमार'.
मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ मध्ये पाकिस्तानात झाला होता. त्यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी होते. मनोज कुमार एबटाबाद (आताचे पाकिस्तान) येथे जन्मले होते. देशाची फाळणी झाली तेव्हा त्यांचे कुटुंब दिल्लीत आले होते. लहानपणापासूनच त्यांना सिनेमांची आवड होती. त्यांना सिनेमे पाहायला आवडत असे. त्यांनी दिलीप कुमार यांचा सिनेमा शबनम वरून त्यांचे मनोज कुमार हे नाव ठेवले होते. देशभक्तीपर सिनेमांमुळे 'भारत कुमार' अशी ओळख निर्माण करणाऱ्या आणि जनमानसात कमालीची लोकप्रिय असणाऱ्या या अभिनेत्याला पद्मश्री, दादासाहेब फाळके या आणि अशा इतरही अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. 60 च्या दशकात त्यांनी हिंदी कलाविश्वामध्ये पदार्पण केलं आणि 70-80 च्या दशकात त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. मनोज कुमार यांच्या लोकप्रिय कलाकृतींमध्ये 'हरियाली और रास्ता', 'वो कौन थी...', 'हिमालय की गोद मे', 'दो बदन', , 'अनिता', 'आदमी' 'उपकार', 'पत्थर के सनम', 'नील कमल', 'पूरब और पश्चिम','रोटी कपडा और मकान', 'क्रांती' 'संतोष', 'बे-इमान', 'कलयुग और रामायण'यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.वडील मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कुणाल गोस्वामी म्हणाला, दुर्दैवाने, माझे वडील मनोज कुमार जी यांचं आज पहाटे ३:३० वाजता कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झालं.' 'ते बराच काळ आजारी होते पण त्यांनी मोठ्या धैर्याने सर्व गोष्टींचा सामना केला आणि ही देवाची कृपा आहे, शिर्डीच्या साई बाबांची कृपा आहे की ते या जगातून शांतपणे निघून गेले. उद्या सकाळी त्यांचे अंत्यसंस्कार होतील. साई राम.' मनोज कुमार अनेक वर्षांपासून आजाराने ग्रस्त होते. 'दोन महिन्यांत ते ८८ वर्षांचा होणार होते. आणि आता त्यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं. ते सर्वांशी बोलत असत. विशेषतः त्यांच्या नातवंडांसोबत आणि त्याच्या धाकट्या नातूसोबत... ते सर्वांसोबत असंच वागायचे आणि ते खूप आनंदी होते. वयानुसार आजारी असल्यामुळे ते वेदना सहन करत होते'
हिंदी कलाविश्वास असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी याच कलेच्या बळावर लोकप्रियता मिळवत प्रचंड श्रीमंतीसुद्धा कमवली. मात्र मनोज कुमार हे एक असं नाव होतं ज्या कलाकारानं संपत्तीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेमच अधिक प्रमाणात कमवलं. देशभक्तीपुढं या कलाकारानं कधीच पैशांना महत्त्वं दिलं नाही असं म्हटलं जातं. किंबहुना हे त्यांच्या आचरणातूनच अनेकदा स्पष्ट झाल्याचंही अनेकांचं मत आहे. हिंदी सिनेजगतात मोलाचं योगदान देणाऱ्या या अभिनेत्याच्या एकूण संपत्तीचा आकडा कधीच जाहीरपणे समोर आला नाही. मात्र सेलिब्रिटी नेटवर्थच्या माहितीनुसार मनोज कुमार यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये 20 मिलियन डॉलर अर्थात 170 कोटी रुपये इतरी कमाई केली.
0 टिप्पण्या