मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस नामकरण करण्यासाठी १६ एप्रिलला मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्ये ठिय्या आंदोलन
1996 मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेट टर्मिनस नामकरणाची मागणी सातत्याने होत आहे. मात्र येणारे प्रत्येक सरकार प्रस्ताव विचाराधीन आहे, एवढेच उत्तर देत आहे. आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी सातत्याने याविषयी सभागृहात प्रश्न उपस्थित करीत आहेत. अगदी तारांकित प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले. मात्र प्रस्ताव विचाराधीन आहे या पलीकडे कोणतेही उत्तर मिळत नाही. यावरून सरकारची नामांतर बाबत उदासीन भूमिका स्पष्ट होत आहे. विद्यमान सरकारला पुन्हा एकदा जागे करण्यासाठी 16 एप्रिल रोजी रेल्वे दिनी मुंबई सेंट्रल येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नामांतर संघर्ष समितीने दिला. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघात प्रसिद्धी माध्यमांची संवाद साधण्यात आला. माजी आमदार रवींद्र मिरलेकर, डॉक्टर गजानन रत्नपारखी, एड. मनमोहन चोनकर,, सुरेंद्र शंकर शेठ, दिनकर नातकरीकर, चंद्रशेखर दाभोळकर यांच्यासह नाना शंकर शेठ मुंबई टर्मिनस नामकरण संघर्ष समितीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
भारतीय रेल्वेचे जनक, मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार (जगन्नाथ) नाना शंकरशेट यांच्या अथक प्रयत्नांमुळे दि. १६ एप्रिल १८५३ रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे सुरू झाली. त्या गाडीत बसण्याचा त्यांना बहुमान मिळाला, तोच दिवस रेल्वे दिन म्हणून रेल्वे मंत्रालय साजरा करते. त्यासाठी नाना शंकरशेट यांचा सिंहाचा वाटा आणि अनमोल योगदान होते. रेल्वे सुरु करण्यासाठी त्याच्या नियोजनासाठी आपल्या वाड्यात रेल्वेच्या कार्यालयाला जागा दिली. या सर्व कार्याचा यथोचित सन्मान म्हणून मध्य रेल्वेच्या इमारतीच्या दर्शनी भागावर बसविलेला नाना शंकरशेट यांचा कोरीव पुतळा त्याची साथ देत आहे. इंग्रजांनी आपल्या काळात नाना शंकर शेठ यांचा यथोचित सन्मान केला. मात्र सध्याचे सरकारची नाना शकर शेठ यांच्याबाबत उपेक्षित भूमिका दिसून येत आहे.
स्वातंत्र्यानंतर १९९६ रोजी व्हिक्टोरिया टर्मिनसला नामदार जगन्नाथ नाना शंकरशेट नामकरण करण्यासाठी पुढाकार शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला. त्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी तसा नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करुन केंद्र सरकारकडे पाठवला, परंतु तो प्रस्ताव मंजुरीसाठी लोकसभेत मांडण्यात आला तेव्हा त्या नावाऐवजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नामकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यावेळेपासून आम्ही नानाप्रेमी मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेट टर्मिनस नामकरणाची मागणी सातत्याने करत आहोत. मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे प्रत्येक वेळी या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे एड. मनमोहन चोनकर यांनी स्पष्ट केले.
या नामकरणासाठी तत्कालीन पंतप्रधान, रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना पत्राद्वारे सातत्याने मागणी करणारे निवेदने दिली आहेत, तो सर्व पत्रव्यवहार आमच्या कडे आहे. त्यानंतर दि.१२ मार्च २०२० रोजी तत्कालीन मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस नामकरणाचा प्रस्ताव बिनविरोध मंजूर झाला आणि तो प्रस्ताव दि. २७जुलै २०२० रोजी केंद्र सरकारकडे पुढील अंतिम मंजुरीसाठी पाठवला त्याला सुद्धा पाच वर्षे झाली. त्या नामकरणाला महाराष्ट्रातील पंधरा खासदारांनी शिफारस पत्रे दिली आहेत.
लोकसभेत प्रत्येक अधिवेशनात स्थानिक खासदार. अरविंद सावंत सातत्याने मागणी करत आहेत, तसेच सर्वश्री राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, कपिल पाटील यांनी सुध्दा लोकसभेत सरकारकडे नामकरण लवकर करा अशी मागणी केली आहे. या नामकरणासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री. नित्यानंद राय यांनी सुध्दा शिफारस केली आहे. रेल्वे बोर्डानेही ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. असे असताना पाच वर्षे नामकरण प्रलंबित का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
दरवर्षी दि.१६ एप्रिल रेल्वे दिनाचे औचित्य साधून नाना चौक, मुंबई सेंट्रल टर्मिनस येथे मूक निदर्शने, मोर्चा काढून केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी करत असतो. परंतु आमची मागणी मान्य होत नाही. याबाबत आमच्या मनात शंका येते. याच सरकारच्या काळात उत्तर प्रदेशातील अनेक रेल्वे स्टेशनची नामकरण झालीत. ज्यांचा रेल्वे योगदानात सहयोग नाही तरीही त्यांची नांवे टर्मिनसला दिली जातात याचे दुःख वाटते. ज्या व्यक्तिमत्त्वाने रेल्वेची जडणघडण केली. त्या नाना शंकरशेट यांचे नांव देण्यासाठी सरकार दिरंगाई कां करत आहे. या मागें कोणत्या राजकीय शक्तीचा हात आहे. याला जर कोणता राजकीय पक्ष विरोध करत असेल तर आम्ही त्याचा प्रयत्न हाणून पाडू असेही चोनकर म्हणाले. दि. १६ एप्रिलला रेल्वे दिनाच्या दिवशी मुंबई सेंट्रल टर्मिनसच्या नामकरणाची घोषणा करावी आणि ३१ जुलैला नाना शंकरशेट यांच्या पुण्यतिथी दिवशी नामकरण सोहळा संपन्न करावा अशी मागणी जाहीर निवेदनाद्वारे मा. महाप्रबंधक (पश्चिम रेल्वे) यांच्याकडे पुन्हा एकदा करण्यात आली आहे. तसेच यावेळी जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले
0 टिप्पण्या