Top Post Ad

'मराठी सिनेमाची चित्रपताका घेऊन अटकेपार जाणारा मावळा

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या पत्रकार परिषदेत महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार- मुख्य लेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू रावराणे,  पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, तसेच महोत्सवाचे संचालक ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे उपस्थित होते.  'मराठी सिनेमाची चित्रपताका घेऊन अटकेपार जाणारा मावळा या अर्थाने राज्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाचे नाव 'चित्रपताका' असे ठेवण्यात आले आहे. त्याचेच प्रतिकात्मक रूप बोधचिन्हात उमटले असून घोड्यावर बसलेला, हातात पताका आणि रिळ स्वरूपातील ढाल घेऊन पुढे चाललेला मराठी चित्रपटकर्मी मावळा या बोधचिन्हात आहे' अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मंगळवारी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

 


  २१ ते २४ एप्रिल दरम्यान पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे ' चित्रपताका ' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 'मराठी चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करणारी एक झळाळती पताका म्हणजेच ‘चित्रपताका’ ही संकल्पना या महोत्सवामागे आहे. प्रेक्षक आणि मराठी सिनेमा घडवणारे  लेखक, दिग्दर्शक, निर्माते,सर्व चित्रकर्मी अशा घटकांचा हा महोत्सव असणार आहे' असे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.  या चार दिवसांच्या चित्रपट महोत्सवात एकूण ४१ दर्जेदार मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. या चित्रपटांमध्ये पूर्ण लांबीचे सामाजिक, ग्रामीण, ऐतिहासिक, पर्यावरण विषयक, स्त्री जीवना विषयक प्रश्न मांडणारे चित्रपट, बालचित्रपट, विनोदी अशा विविध जॉनरच्या चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपटांची निवड करण्यासाठी डॉ.संतोष पाठारे, सुकन्या कुलकर्णी, समीर आठल्ये आणि पुरुषोत्तम बेर्डे या तज्ज्ञांची निवड समिती नेमण्यात आली होती. या महोत्सवात चित्रपट क्षेत्रातील विविध विषयांवर पाच परिसंवाद, दोन मुलाखती आणि दोन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.

सिने पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तसेच, मराठी चित्रपटांविषयीचे प्रदर्शनही या महोत्सवात असणार आहे.  पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, महेश कोठारे, वर्षा उसगावकर, सुबोध भावे, अलका कुबल यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक  मान्यवर महोत्सवास उपस्थित राहणार आहेत, नवे आणि जुने चित्रकर्मी, उत्तम प्रेक्षक यांना एकत्र आणणारा, मराठी चित्रसृष्टीचा हा चार दिवसांचा सोहळा असणार आहे.‘चित्रपताका’च्या माध्यमातून मराठी सिनेमा साता समुद्रपार पोहोचावा, आणि ही घौडदौड यापुढेही अशीच सुरू राहावी, हीच या महोत्सवामागील प्रेरणा आहे. हा महोत्सव विनामूल्य असून ऑनलाईन वा प्रत्यक्ष कला अकादमी येथे येऊन महोत्सवासाठी नावनोंद करणे गरजेचे आहे. सर्व मराठी चित्रपट रसिकांना या महोत्सवाला हजेरी लावण्याचे आवाहन ह्या वेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com