आज मौर्य सम्राट अशोक यांचा जयंती महोत्सव साजरा करताना आपण केवळ एका सम्राटाचा गौरव करत नाही, तर एका महान बौद्ध प्रचारक, धर्मशील शासक आणि मानवतावादी विचारवंताला आदरांजली अर्पण करत आहोत. या निमित्ताने, सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्मातील योगदानाचा अभ्यास करणे आणि आजच्या बौद्ध समाजाने त्यांचा आदर्श कसा घ्यावा हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सम्राट अशोक यांचे राजकीय व बौद्ध धम्मातील योगदान- सम्राट अशोक हे मौर्य वंशाचे महान सम्राट होते. त्यांच्या नेतृत्वात मौर्य साम्राज्याने आपल्या उत्कर्षाची परिसीमा गाठली. मात्र कलिंग युद्धात झालेला अमानुष संहार आणि हिंसाचार पाहून अशोकांच्या मनात खोल परिवर्तन घडून आले. त्यांनी युद्धाचा मार्ग सोडून बौद्ध धम्माचा स्वीकार केला. बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर सम्राट अशोकांनी धम्म नैतिकता, करुणा, आणि अहिंसेच्या आधारे शासन चालवले. त्यांनी संपूर्ण साम्राज्यभर धम्म लेख, स्तंभलेख, शिलालेख कोरून बौद्ध धम्माचा प्रचार केला. त्यांनी धम्ममहामात्त नेमून नैतिकतेची शिकवण जनतेपर्यंत पोहोचवली. ते केवळ भारतातच नव्हे, तर श्रीलंका, म्यानमार, थायलंड, अफगाणिस्तान, इराण, आणि ग्रीसपर्यंत बौद्ध धम्माचे दूत पाठवून एक जागतिक बौद्ध चळवळ निर्माण केली.आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना धम्मदुत बनवुन बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार भारताबाहेर केला .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध धम्मातील योगदान- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारतातील बौद्ध नवजागरणाचे शिल्पकार होते. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या जातिव्यवस्था, अस्पृश्यता आणि सामाजिक शोषणाच्या विरोधात त्यांनी बौद्ध धम्माला मुक्तीचा मार्ग म्हणून स्वीकारले. १९५६ साली नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारून त्यांनी भारतात पुन्हा एकवार बौद्ध धम्माची सुरुवात केली. त्यांच्या दृष्टीने बौद्ध धम्म हा केवळ एक धार्मिक पर्याय नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा क्रांतिकारी मार्ग होता. डॉ. आंबेडकर यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हे महान ग्रंथ लिहून बुद्धाच्या विचारांचा वैज्ञानिक, सामाजिक व आधुनिक दृष्टिकोनातून पुनरुच्चार केला. त्यांनी बौद्ध धम्माला एका आधुनिक, बौद्धिक आणि व्यवहार्य संहितेचे स्वरूप दिले .
जर सम्राट अशोक आज असते तर…- सम्राट अशोक जर आजच्या काळात असते, तर त्यांनी आधुनिक माध्यमांचा वापर करून बौद्ध धम्माची जागतिक चळवळ उभारली असती.
• सोशल मीडिया, डिजिटल शिक्षण, युट्युब, ऑनलाईन कोर्सेस, मोबाईल अॅप्स यांच्या साहाय्याने त्यांनी धम्मचक्र पुन्हा फिरवले असते.
• त्यांनी शिक्षण, आरोग्य, आणि सामाजिक समता यावर आधारित योजनांची अंमलबजावणी केली असती.
• दलित, आदिवासी, महिलांना प्राधान्य देऊन समाजात एक नवा मानवतावादी विचार मांडला असता.
• त्यांनी धम्म आधारीत लोकशाही व्यवस्थेचा अवलंब केला असता – जिथे शासन न्याय, करुणा, आणि समतेवर चालते.
आजच्या बौद्ध नेत्यांनी आणि जनतेने सम्राट अशोकांचा आदर्श कसा घ्यावा?
1. धम्माचा प्रचार व आचरण: - फक्त उत्सव साजरे न करता, बुद्ध, अशोक आणि आंबेडकर यांचे विचार आचरणात आणावेत. धम्म हा केवळ पूजा नसून तो एक जगण्याचा शिस्तबद्ध, नैतिक आणि विवेकी मार्ग आहे.
2. शिक्षणावर भर द्यावा:- सम्राट अशोक व डॉ. आंबेडकर यांचा एकच ध्यास होता – ज्ञानदान आणि शिक्षण. आजच्या बौद्ध समाजाने मुक्त पुस्तकालये, अभ्यासवृत्ती, कोचिंग क्लासेस, ऑनलाईन लर्निंग हब्स उभारावीत.
3. सामाजिक एकतेचा विचार करावा:- बौद्ध समाजामध्ये आपापसातील भेदभाव दूर करून एकसंघ संघटना तयार कराव्यात. जात, पंथ, प्रांतापेक्षा धम्म आणि मानवता या आधारावर एकत्र यावं.
4. नवबौद्ध आंदोलनाला चालना द्यावी:- बाबासाहेबांनी सुरू केलेली नवबौद्ध चळवळ आज सामाजिक, शैक्षणिक व राजकीय परिवर्तनाचे प्रभावी साधन ठरू शकते – जर ती वैज्ञानिक आणि विचारशील पद्धतीने पुढे नेली गेली.
5. करुणा, अहिंसा, आणि सत्याचा स्वीकार करावा:- सम्राट अशोकप्रमाणे सर्व धर्मांचा सन्मान, आणि डॉ. आंबेडकरप्रमाणे सत्याचा स्वीकार ही आपली धम्मनीती असली पाहिजे.
सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धम्माचे दोन युगपुरुष होते – एकाने बौद्ध धम्माचा विस्तार केला आणि दुसऱ्याने त्याचा पुनरुत्थान केला. आज आपण त्यांच्याच विचारांना पुढे नेण्याची जबाबदारी घेतली पाहिजे बुद्धांचे विचार, अशोकांचे शासन आणि आंबेडकरांची क्रांती – या त्रिकुटाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, आपण एक सशक्त, सुसंस्कृत आणि समतावादी बौद्ध समाज निर्माण करू शकत“ धम्म ही श्रद्धा नाही, ती कृती आहे – आणि तीच कृती आजच्या भारताला नवी दिशा देऊ शकते .
*प्रा. डॅा. विजय मोरे*
0 टिप्पण्या