भारतीय राज्यघटनेचे निर्माते, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मुंबईत विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील सायन परिसरातही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सायन स्टेशन जवळ प्रबुद्ध समता सोसायटीच्या परीसरात प्रज्ञा प्रतिष्ठान व प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशन यांच्यावतीने धारावी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नेहमीप्रमाणे लाडू वाटप करण्यात आले त्याचबरोबर बोधगया महाविहार मुक्ती आंदोलनची दखल घेऊन या विहाराचा ताबा तात्काळ बौद्धांच्या हातात द्यावा या मागणीसाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला आमदार डॉ. ज्योतीताई गायकवाड, धारावी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर, माजी आमदार बाबुराव माने, शिवसेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झोपडपट्टी महासंघ सुमित वाजले, समाजवादी पक्षाचे मुंबई महासचिव राहुल गायकवाड, धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक राजू कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धारावी तालुका अध्यक्ष उल्लेश गजाकोश, मनसेचे शाखा अध्यक्ष संदीप कदम, संदीप कवडे, जिगर मोरे, शिवसेना धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार, शाखाप्रमुख किरण काळे, आनंद भोसले, धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सर्व मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष आयू अनिल शिवराम कासारे, सरचिटणीस नितीन दिवेकर, कार्याध्यक्ष गौतमी जाधव यांनी केले.
चैत्यभूमीवर जयंतीचा जल्लोष
. दादर स्टेशनपासून ते चैत्यभूमी पर्यंतचा परिसर आंबेडकरी अनुयायांनी गजबजून गेला होता. पावलो पावली बाबासाहेबांची प्रतिमा लावून भोवती आरास करण्यात आली होती. तसेच विविध प्रकारच्या मुर्त्या आणि इतर वस्तूंची विक्रीही जोरात सुरू होती. महानगरपालिकेच्या वतीने दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी' परिसरांमध्ये विविध प्रकारच्या नागरी सेवा–सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे करण्यात आले होते. या प्रदर्शन दालनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासातील दुर्मिळ छायाचित्रे आंबेडकरी अनुयायांना पहायला मिळाली. चैत्यभूमी परिसरामध्ये नियंत्रण कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, शौचालये आदी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यासोबतच सीसीटीव्ही, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी, अग्निशमन दलाचे पथक तैनात करण्यासह अग्निशमन सुविधा सुसज्ज ठेवण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधा करीता महानगरपालिकेतील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने नेमण्यात आले होते. आणीबाणीच्या प्रसंगी तात्काळ मदतीसाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली होती.
0 टिप्पण्या