डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती त्याचबरोबर भारतीय संविधानाचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष असा एकत्र दैदिप्यमान सोहळा आज सर्वत्र साजरी होत आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दर वर्षीप्रमाणे प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांचा जल्लोष त्याची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. मुंबईतील चैत्यभूमीवर देखील याची जोरदार तयारी सुरु आहे. प्रत्येकजण आपआपल्या परीने या महामानवाला अभिवादन करीत आहे. आणि जयंतीचा औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करीत आहे. तर अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी आपआपले शुभेच्छा बॅनर झळकावले आहेत. मात्र या सर्वांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवून डॉक्टर संतोष कटारे यांनी आगळा वेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांच्या प्रती आपला आदरभाव व्यक्त केला. आपल्या रक्ताने विविध महापुरुषांच्या कलाकृती साकारणारे कटारे यांनी चैत्यभूमीवर आपल्या स्वत:च्या रक्ताने बाबासाहेबांची सहीची प्रतिकृती काढली.
ज्या सहीने इथल्या बहुजनांचे जीवन बदलून टाकले. ज्या सहीने इथल्या प्रत्येक भारतीय व्यक्तीला जगण्याचे स्वातंत्र्य बहाल केले. त्याच सहीने मी आज ताठ मानेने जगतो आहे असे म्हणत कटारे यांनी बाबासाहेबांच्या या सहीची प्रतिकृती आपल्या रक्ताने साकार केली. या आधी आपण बाबासाहेबांचे चित्र, तसेच भारतीय संविधान आणि तथागत बुद्ध आणि बाबासाहेब यांचे कलात्मक चित्र स्वत:च्या रक्ताने साकार केले आहे. त्यामुळे या जयंतीनिमित्त आपण बाबासाहेबांची सही स्वत:च्या रक्ताने साकार केली असल्याचेही कटारे यांनी स्पष्ट केले. प्रत्यक्ष चैत्यभूमीच्या परिसरात रक्तांच्या बॉटलसह आपली कलेची साधनं घेऊन सर्व लोकांच्या समक्ष त्यांनी आपल्या कलाकृतीचे प्रदर्शन केले. काही मिनीटातच प्रत्यक्ष लोकांसमोर कटारे यांनी बाबासाहेबांची सही आपल्या कॅनव्हासवर रेखाटली. चैत्यभूमीवर आलेले सर्व लोक याकडे कुतूहलाने पहात होते आणि आश्चर्यचकीत होत होते. आपल्या स्वत:च्या रक्ताने आपली कला लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष दाखविणारा हा अवलिया पाहून अनेकांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या.चित्रकला म्हटलं की डोळ्यासमोर रंग, कुंचला आणि कॅनव्हास उभा राहतो. पण नाशिक जिल्ह्यातील देवळाली तालुक्यातील हाडोळा गावातल्या डॉ. संतोष कटारे यांनी या संकल्पनांनाच छेद दिला आहे. कुंचल्याऐवजी स्वतःच्या रक्ताचा वापर करून त्यांनी थोर महापुरुषांची चित्रे साकारत एक अद्वितीय आणि प्रेरणादायी कलाप्रकार "ब्लड आर्ट " विकसित केला आहे.गेल्या १५ वर्षांत त्यांनी ६० हून अधिक चित्रांची निर्मिती केली असून, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, माता रमाई, शहीद भगतसिंग, मदर टेरेसा यांच्यासारख्या महामानवांना रक्तरंगांतून अमरत्व दिले आहे. एवढेच नव्हे तर भारतीय संविधानाची प्रस्तावना व राष्ट्रगीतही त्यांनी रक्ताच्या माध्यमातून रेखाटले आहे.
एक चित्र साकारण्यासाठी सरासरी एक तास लागतो. या अनोख्या कलेसाठी त्यांना लंडन, फ्रान्स, दुबई आणि दिल्ली येथून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. लंडन येथील सर्वोच्च मान, दुबईतील डिलिट पदवी, फ्रान्सहून पीएच.डी. आणि दिल्लीतील ‘नेल्सन मंडेला पुरस्कार’ यांचा त्यात समावेश आहे. मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे अभिनेता अरबाज खान यांच्या हस्ते त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.त्यांच्या या कार्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठीही शिफारस करण्यात आली आहे. दुबईतील एका भव्य समारंभात शेख अहमद बिन फैसल अल कासिमी यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले.रक्त हे जीवनदायी असते, आणि तेच वापरून समाजप्रबोधनाची मशाल पेटवणारे डॉ. संतोष कटारे केवळ एक कलाकार नाहीत, तर ते समाजात समता, जागृती व प्रेरणेचा संदेश देणारे योध्दा आहेत. त्यांच्या या कार्यातून अनेक युवक प्रेरणा घेत आहेत.
दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त डॉ.संतोष कटारे यांनी स्वतःच्या रक्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सही करून त्यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण केली. हा क्षण उपस्थितांमध्ये विशेष भावनिक आणि प्रेरणादायी ठरला. चैत्यभूमीवर पार पडलेल्या या कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (युवक आघाडी) कोकण प्रदेशाचे उपाध्यक्ष उमेश कदम, राजेश माळोदे, अजय वाहने, गौतम शेंडे, सुरेश शेंडगे, कुलकर्णी सर आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या