Top Post Ad

दान नको, काम हवे,... Work is not charity, Work is worship

 अन्नदानाच्या नावाखाली देवस्थानात अन्नछत्र चालवणे असो की 80 कोटी लोकांना पाच किलो मोफत धान्य देणे असो, हे सर्व प्रकार माणसाला आळशी आणि परोपजीवी बनवणारे आहेत. त्यापेक्षा याच पैशाचा विनियोग रोजगार निर्मिती प्रशिक्षणासाठी केला तर माणसांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग मिळेल. पण याकडे हे दानशूर मुद्दमून काणाडोळा करतात. कारण लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. त्याउलट अन्नदानाच्या निमित्ताने गरजूंना लाचार लाभार्थी बनवून आपले वर्चस्व आबाधित ठेवणे त्यांच्या सोयीचे असते. पुन्हा धार्मिक कार्य केल्याचे पुण्य पदरी पडले आहे अशा आत्ममग्न वृत्तीत राहता येतेच. ही अत्यंत निषेधार्ह आणि गर्हणीय बाब आहे. जर कुणाला दान करायची इतकीच हौस असेल तर त्यांनी ते दरवर्षी अनाथ, गोरगरीब आणि गरजू मुलामुलींना यथाशक्ती शाळेची पुस्तके, गणवेश अथवा पोषण आहाराच्या निमित्ताने अन्नदान करावे. म्हणजे शाळेतील मुलांची गळती कमी होऊन पटसंख्येच्या अभावी शाळा बंद करण्याच्या सरकारी धोरणाला पायबंद बसेल. धार्मिकांच्या दृष्टीने हे खरे पुण्यकर्म नसेल काय?

  अन्नछत्र चालवून धर्माच्या नावाखाली लोकांना आळशी बनवणाऱ्यांच्या या वृत्तीवर सडकून तोंडसुख घेताना महात्मा गांधी एका सायं प्रार्थनेच्या वेळी म्हणाले होते, "आपल्या दानधर्माच्या, पुण्यसंचयाच्या कल्पना साफ चुकीच्या आहेत. त्यामुळेच आपल्या समाजात भिकाऱ्यांचे व बैराग्यांचे तांडेच्या तांडे निःसंकोचपणे फिरताना दिसून येतात. आजारी व अपंग माणसे वगळून कुणालाही, काम न करता अन्नदान करणे हा सामाजिक गुन्हा आहे. म्हणून माझ्या हाती सत्ता आली तर प्रथम मी देशातील सर्व सदावर्ते बंद करून टाकीन." 

प्रत्येकाने श्रम करूनच आपला उदरनिर्वाह केला पाहिजे. Work is not charity, Work is worship, दान नको, काम हवे, ही त्यांची सुभाषिते अत्यंत बोलकी आहेत. त्यावर वेगळे भाष्य करण्याची जरुरी नाही. लोकांना मोफत भाकरी देण्यापेक्षा ती स्वतःच्या श्रमाने मिळवण्याची क्षमता त्यांच्या अंगी आली पाहिजे. त्यासाठी त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. अंग मोडून काम करण्याची त्यांची तयारी असली पाहिजे. गांधीजींना गरिबांविषयी कळवळा होता, पण त्यांनी कधीही गरीबीचे उदात्तीकरण केले नाही. कारण शोषणमुक्त समाजाची निर्मिती हेच त्यांचे ध्येय होते. महात्मा गांधींना प्राप्त:स्मरणीय समजणाऱ्या मोफत अन्नछत्र चालवणाऱ्या तथाकथित धार्मिक महाभागांना हा विचार उमजेल काय?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com