सरकारी तळं.. सर्वांसाठी खुलं.. आम्हाला सोडून सर्व पाणी पितात.. कुत्री .. मांजरी देखिल.. मात्र आम्हाला मज्जाव.. असं का.. आमची आयडेंटिटी काय? हा सवाल करत बाबासाहेबांनी पेटवलं चौदार तळं अन जाळली त्यात मनुस्मृती....भारत सरकार कायदा 1919.. यात काही संवैधानिक सुधारणा करण्याची गरज आहे का हे धुंडाळण्यासाठी 1927 साली सायमनचे कमिशन भारतात आलं.. या समितीत भारतीय लोकं प्रतिनिधी म्हणुन नाहीत यास्तव या समितीवर गांधीच्या पुढाकाराने देशभरातून बहिष्कार टाकण्यात आला.. मात्र या बहिष्काराला फाट्यावर मारत बाबासाहेबांनी सायमन समिती समोर गाऱ्हाणी मांडली ... मुद्दा हाच होता.. देशाच्या वतीनं सायमन कमिशनवर बहिष्कार टाकतांना आम्हाला का गृहीत धरलं गेलं... आमच्याही मागण्या असू शकतात हे का मनाला शिवलं नाही..
प्रश्न तोच..आमची आयडेंटिटी काय..? बाबासाहेबांनी सायमनच्या समितीसमोर गाऱ्हाणी मांडली ज्याची फळं आजही आपण चाखतोय.. इंग्रजांपासून देशमुक्तीसाठी रान पेटलेलं.. अख्खा देश उभा-आडवा धुमसत होता पण त्यात बाबासाहेब नव्हते कारण प्रश्न हा होता की इंग्रजमुक्त भारतात आपलं स्थान काय असणार? *'आधी देशाची मुक्ति होवु द्या मग ठरवता येईल आपसात बसून कोणाचं काय स्थान असणार'* या असल्या बालिश उत्तराला बाबासाहेबांनी धुडकावून लावलं म्हणून आज आपण, *'आपण'* आहोत.
हाच विषय _"आमची आयडेंटिटी काय?"_काळाराम मंदिर सत्याग्रहात.. गोलमेज परिषदेत.. गांधी सोबतच्या हमरीतुमरीत.. संविधान सभेत शिरण्यासाठी.. जातीअंताच्या लढाईत..अन शेवटी..जातिअंत करण्यासाठी केलेल्या ...धर्मांतरात... धम्म दिक्षेच्या वेळी देखिल अस्तित्वात असलेल्या सत्राशेसाठ बौध्द पंथात आपली आयडेंटीटी विरून जावू नये व ती वेगळीच रहावी या उद्देशाने बाबासाहेबांनी _'Hitvada'_ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अगदी स्पष्टपणे मांडलं की,*'धर्मांतरीत बौध्द हे बुद्धाची मूळ शिकवणूक पाळतील. ते स्वतःला बौध्द धम्मातील वज्रयान, महायान सारख्या इत्तर पंथांपासून दूर ठेवतील. त्यांचा धम्म 'नवयान' प्रकाराचा असेल'.*
विकृत हिंदू धर्मानं लादलेल्या अस्पृश्यतेमुळे स्वतःचा चेहराच गमावून बसलेल्या आम्हा गुलामांना या जातरहित नवयान बौध्द धम्माची मजबूत आयडेंटीटी दिली बाबासाहेबांनी. ही आपली आयडेंटीटी उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जावी व कालांतरानं सारा देश बौध्दमय व्हावा ही बाबासाहेबांची इच्छा अन ती कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी स्थापिली ती 'भारतीय बौद्ध महासभा'. झालं मात्र सगळं याच्या विपरीतच... बाबासाहेबांनी आखून दिलेल्या मार्गावर एक इंचही पुढे सरकू न शकलेलो आम्ही, आपली वेगळी आयडेंटीटी जोपासण्याऐवजी, अर्ध्या हळकुंडानं पिवळे बौध्द झालेलो, जन्माचे कर्मदरिद्री आम्ही, सैरभैर होत अगदी कशातही बेधडक रममाण होवू लागलो...
आता हे महाबोधी महाविहार मंदिर मुक्ति आंदोलन..
बाबासाहेबांनी नाकारलेल्या महायानी, वज्रयानी, कालचक्री, तांत्रिक इत्यादि चमत्कारिक बुध्द मानणाऱ्या 'बौध्द पंडितांनी', महाबोधी महाविहार मंदिराच्या 9 सदस्यीय व्यवस्थापन समितीत 100 टक्के सहभाग यासाठी चालविलेलं आंदोलन स्वरूपातील सदर अभियान. 'महाबोधी महाविहार मंदिर' याचं व्यवस्थापन हे, 'बुद्धगया मंदिर अधिनियम 1949 (BT ACT 1949)' अन्वये बिहार राज्यसरकारचा अखत्यारीत आहे. या कायद्यानुसार 9 जणांच्या व्यवस्थापकीय समितीत 1 अध्यक्ष (जिल्हाधिकारी), 4 भारतीय बौध्द व 4 भारतीय हिंदू असायला हवेत. याशिवाय एक सल्लागार समिती असावी ज्यात बहुतांश बौद्ध (भारतीयच असावेत असं नाही) हवेत. याव्यतिरिक्त अत्यंत महत्वाचं म्हणजे या कायद्यानुसार, या कायद्यात किंवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बनविलेल्या नियमांमध्ये काहीही असलंतरी हिंदू व बौद्ध धर्माच्या कुठल्याही पंथाला मंदिरात पुजेसाठी वा मंदिराच्या जमिनीवर पिंडदान करण्यासाठी प्रवेश नाकारला जाणार नाही.
अर्थात... सदर आंदोलनाने BT ACT 1949 जर रद्द झालाच तर जे हशील होणार...ते म्हणजे व्यवस्थापकीय समितीत सगळेच्या सगळे बौध्द असतील...मात्र...ते बौद्ध भारतीय असावेत ही 'अट' राहणार नाही....सध्याच्या घडीला बोधगया मंदिर व्यवस्थापकीय समितीच्या अधिकृत वेबसाईटवर महाबोधी महाविहार परिसरात बहुतांश विदेशी असलेल्या बौद्धांचे 14 'आखाडे' आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानं यातील फक्तं भारतीय बौद्ध असलेल्यांनाच व्यवस्थापकीय समितीवर घेता येतं अन ते ही फक्त 4 जणांना. कायदा रद्द झाल्यावर या 14 च्या 14 जणांची तसंच इत्तर ही अनेक विदेशी बौद्ध 'पंडितांची' महाबोधी महाविहार मंदिराच्या व्यवस्थापनात घुसण्याची सोय होणार आहे....विशेष म्हणजे..यातील एकही आखाडा बाबासाहेबांनी दिलेला 'नवयान बुद्ध' मानणारा नाही...हे आखाडे आत्मा-परमात्मा शाब्दिक अर्थानं नाकारत असले तरी 'आत्मा-परमात्मा-पुनर्जन्म' याचे सगळे चमत्कारिक खेळ हे बौद्ध पंडित स्वतःच्या सोयीसाठी वेगवेगळ्या नावानं बिनदिक्कत चालवतात. आणखीन एक महत्वाचं म्हणजे BT ACT 1949 रद्द झाला तरी महाबोधी मंदिराच्या जमीनीवर चालणारं 'पिंडदान' बंद होणार नाही कारण हे पिंडदान व मंदिरात पूजा करण्यासाठी हिंदूंना प्रवेश या बाबी सदर कायद्यानुसार सुरू झालेल्या नाहीत. उलटपक्षी या कायद्यात काही असलं तरी 'पिंडदान व हिंदूंना मंदिरात प्रवेश' बंद करता येणार नाही असा आशय सदर कायद्यात आहे.
तर अशा या आंदोलनात जिथं आपली काही आयडेंटिटीच नाही तिथं आपण अगदी स्वखुशीनं लुडबुड करु लागलोय... इथं मुद्दा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या बौद्ध आयडेंटिटीचा आहे. महाबोधी महाविहार मंदिर मुक्ति आंदोलनात आपण भाग घेत आहोत त्यात आपली आयडेंटिटी काय आहे? बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या नवयानी बुद्धाला या आंदोलनात काही स्थान तरी आहे का?? हे साधे प्रश्न आपल्याला का पडत नाहीत...??? बुद्धाला ब्राह्मण पंडितांपासून मुक्त करायचं या गोंडस नावानं आपण प्रतिक्रांतिच्या पालखीचे भोई होत आहोत याचं साधं भान देखिल आपल्याला राहिलेलं नाही. बाबासाहेबांनी बुद्ध समजण्यासाठी तीन पुस्तकं लिहित असल्याचं सांगितलं होत. पहिलं 'बुद्ध आणि त्याचा धम्म'. दुसरं 'बुद्ध आणि कार्ल मार्क्स' आणि तिसरं 'प्राचीन भारतातील क्रांति आणि प्रतिक्रांति'. बाबासाहेबांचं पहिलं पुस्तक *'बुद्ध आणि त्याचा धम्म'*, जगभरातील बौद्ध पंडितांनी विशेषकरून महाबोधी महाविहार मंदिर मुक्ति साठी पुढाकार घेतलेल्या बौद्ध पंडितांनी सपशेल नाकारलेलं असं हे पुस्तक.
*'बुद्ध आणि कार्ल मार्क्स'* संदर्भात बाबासाहेब म्हणतात की बुद्ध आणि मार्क्स दोघांचही इस्पित एकच... मार्ग मात्र वेगळे. बुद्धाचा मार्ग अधिक शास्वत. महत्वाचं म्हणजे बाबासाहेब विचारतात बुद्ध हा मार्क्सला उत्तर देवु शकतो का? *निश्चितपणे बाबासाहेबांचा बुद्ध, अफूची गोळी या संदर्भात, मार्क्सला उत्तर देतो.* मात्र, महाबोधी महाविहार मंदिर परिसरात असलेल्या बौद्ध मठांच्या आखाड्यातील बुद्ध, मार्क्सला उत्तर देवू शकत नाहीत कारण बुद्धाला चमत्कारीक, कर्मकांडी बनविणारी ही सगळी 'अफूची दुकानं' आहेत. मार्क्सला उत्तर देण्याऐवजी हे चमत्कारिक बुद्ध, मार्क्सला दुजोराच देतात. आत्मकेंद्री मोक्षप्राप्ती, आत्मा-परमात्मा, जन्म-मृत्यू-पुनर्जन्म, भूतं-खेतं, देव-धर्म याची बतावणी करत माणसा-माणसात द्वेष पेरणाऱ्या ब्राह्मणी धर्माला तोड म्हणून बुद्धाच्या धम्माचा प्रसार ही भारतात आलेली 'क्रांती' तर बौद्ध धम्माचे उच्चाटन करुन ब्राह्मणी धर्माचा विजय म्हणजे 'प्रतिक्रांती' या आशयाचे बाबासाहेबांचं तिसरं पुस्तक. महाबोधी महाविहार मंदिर इथं स्थायिक असलेल्या अन ते मुक्त करण्यास पुढाकार घेतलेल्या कर्मकांडी, चमत्कारी, कालचक्री, महायानी, वज्रयानी, तांत्रिक, पोथीनिष्ठ बुद्ध मानणाऱ्या बौद्ध पंडितांच्या लेखी असं 'क्रांती अन प्रतिक्रांती' काही नाहीच कारण त्यांचा बुद्ध वेगळ्या वातावरणातला.. वेगळ्या कारणांसाठी जन्माला आलेला..
अशारित्या, बुद्ध समजण्यासाठी ज्या तीन विषयांची वाच्यता बाबासाहेबांनी केली अन जे आपल्या 'बौद्ध आयडेंटीटीचा प्रमुख आधार' आहेत, ते तिन्ही विषय महाबोधी महाविहार मंदिर ताब्यात घ्यायला निघालेल्या बौद्ध पंडितांच्या मात्र खिजगणतीतही नाहीत...म्हणूनच...महाबोधी महाविहार मंदिर मुक्तिच्या आंदोलनात आपली आयडेंटीटी काहीच नाही निव्वळ एक भावनिक 'शून्य'. या आंदोलनामुळे मात्र, बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली 'बौद्ध' आयडेंटीटी ठणकावून सांगण्याची सुवर्णसंधी आपल्याला लाभलीय.. महाबोधी महाविहार मंदिराच्या व्यवस्थापन समितीत सध्या धम्माधिरू (प्रेमा भंते), आद. टी ओकोनाजी आणि किरण लामा असे तीन भारतीय बौद्ध आहेत. तसंच या मंदिरात पूजाअर्चा करण्यासाठी आद. भिक्खू चालिंदा, आद. भिक्खू दिनानंद, आद. भिक्खू बुद्ध रत्न, आद. भिक्खू धम्मिका, आद. भिक्खू सासना, आद. भिक्खू धम्मिसारा, आद. भिक्खू कौंडीण्य, आद. नीमा लामा, आद. दिपन भंते असे नऊ (9) देशी-विदेशी बौद्ध भिक्खू आहेत. या 12 बौद्धांनी मिळून महाबोधी महाविहार मंदिर व्यवस्थापनाचे अध्यक्ष गयाचे जिल्हाधिकारी डॉ. थियागराजन एस एम (IAS) यांना लेखी प्रस्ताव द्यायचा की, _'महाबोधी विहाराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर अगदी ठळक अक्षरात 22 प्रतिज्ञा कोरण्यात याव्यात व या प्रतिज्ञा पाळणं हे महाविहार परिसरातील सर्वच भिक्खू-पुजाऱ्यांना बंधनकारक राहील'_.. अशी मागणी आपण करायला हवी. जर ही मागणी मान्य केली गेली अन तसा लेखी प्रस्ताव व्यवस्थापन समितीतील 3 देशी बौद्ध व पूजाअर्चा करणारे 9 देशी-विदेशी बौद्धांनी अध्यक्षांकडे दिला तरच या आंदोलनात सहभागी होण्यास काही अर्थ आहे कारण मग आपली आयडेंटीटी मान्य केली जाईल..अन्यथा नाही.
आणखीन एक मुद्दा, जे लामा आपल्याकडे मदत मागण्यासाठी येतात त्यांना आपण सढळ हस्ते मदत करण्याआधी एक प्रश्न विचारला पाहिजे की, महाबोधी महाविहार परिसरात एका स्तंभावर बुद्धवचन लिहिलंय, यात बुद्ध एका ब्राह्मणाला सांगतो, _'जन्मानं कोणीही ब्राह्मण होत नाही तर कर्मानं होत असतात..'_ अशा स्थितीत मग दलाई लामा कसे जन्मानं धर्मगुरू बनतात?? 22 प्रतिज्ञांचा आपला प्रस्ताव आणि दलाई लामा संदर्भातील आपला प्रश्न, हे सांगून टाळला जाणार, की आधी मुक्ति होवू द्या मग पुढचं पुढं बघू .. अन हे सांगायला आपलेच 'बाटगे' पुढाकार घेतील. पण एक लक्षात ठेवा, महाबोधी महाविहार येथिल बुद्धाला खऱ्या अर्थानं 'पोंगा पंडितांच्या' तावडीतुन मुक्त करायचं असेल तर त्यावर एकमात्र उतारा म्हणजे '22 प्रतिज्ञा' हाच होय... अन हे ठणकावून मांडण्यासाठी कोणाचाही मुलाहिजा ठेवण्याची अजिबात गरज नाही कारण आपल्याला माणूस म्हणून जगण्याची जी आयडेंटीटी मिळालेली आहे ती केवळ अन केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे होय... कोणा दलाई लामा, कोणा सत्यनारायण गोयंका वा मरणोपरांत बाबासाहेबांना देवलोकांत पाहणाऱ्या ताडोबातील कोणा 'महा-थेरां' वगैरेंच्या मुळे नव्हे...
चला वेळीच जागे होवूया.. आपली 'नवयानी बौद्ध' म्हणून स्वतंत्र आयडेंटीटी ओळखुया अन ती जपूया.. कोणाच्याही मागं विनाकारण धावणं बंद करत आपला मार्ग स्वतः प्रशस्त करूया.... महाबोधी महाविहार मंदिर मुक्ती आंदोलनाला या अंगानं पाहणं नितांत आवश्यक व काळाची खरी गरज...!
- मिलिंद भवार _पँथर्स_
- 9833830029
- 27 मार्च 2025
0 टिप्पण्या