मुंबई महानगरपालिकेने कांदिवली (पूर्व) येथील आकुर्ली येथे उभारलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात आज २४ मार्च रोजी बेरोजगार विद्यार्थ्यांचा रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात १४९० उमेदवार नोकरीच्या संधीसाठी आले होते. तसेच २८ व्यावसायिक कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. या रोजगार मेळाव्यात पात्र ठरलेल्या ५४० उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे मुंबई महापालिकेने कळवले आहे. तसेच उपस्थित होतकरू विद्यार्थ्यांना कांदिवली (पूर्व) येथे उभारलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली. .
या रोजगार मेळाव्यात टीम लीस, योमन, जीनीअस, पॉवर पाईंट, अॅक्सिस, पॉलिसी बॉस्, आय करिअर, अदानी अशा २८ व्यावसायिक कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. या ठिकाणी पात्र असलेल्या उमेदवारांना लगेचच स्वीकार पत्र (ऑफर लेटर) देत नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली. या कौशल्य विकास केंद्रात हॉटेल मॅनेजमेंट, विक्री आणि व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, एसी, फ्रीज दुरुस्ती प्रशिक्षण, व्हीएफक्स-अॅनिमेशन प्रशिक्षण, शिवणकामाचे व्यावसायिक प्रशिक्षण, पंचतारांकित हॉटेल्समधील नोकरीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण इत्यादी विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या कांदिवली येथील कौशल्य विकास केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना योग्य शिक्षणानंतर उपलब्ध असलेले व्यावसायिक शिक्षण आणि नोकरीची संधी याबाबत जनजागृती करण्यात येते. तसेच या ठिकाणी अनेक नामांकित कंपन्यांनी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
0 टिप्पण्या