स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यमय महानगरासाठी सदैव तत्पर असलेल्या मुंबई महानगरपालिकेने आज (दिनांक ३ मार्च २०२५) पासून मुंबईत 'विशेष स्वच्छता मोहीम - रूग्णालय' सुरूवात केली आहे. स्वच्छता मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शासकीय, महानगरपालिका आणि खासगी अशा एकूण मिळून ३४ रूग्णालयांच्या परिसरात स्वच्छतेचा जागर करण्यात आला. सकाळी ११ ते दुपारी १ या दोन तासांच्या कालावधीत ३४ रूग्णालयांच्या परिसरातून ४९ मेट्रिक टन राडारोडा, ४३ मेट्रिक टन कचरा आणि २४ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तूंचे संकलन करत विल्हेवाट लावण्यात आली. तब्बल १ हजार ५२३ कर्मचारी - कामगारांनी १३५ संयंत्रांच्या सहाय्याने ही कामगिरी केली.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व रूग्णालयांमध्ये 'विशेष स्वच्छता मोहीम' राबविण्यात येत आहे. या मोहिमेस आज (दिनांक ०३ मार्च २०२५) सर्व प्रशासकीय विभागातील रूग्णालयांमध्ये एकाचवेळी प्रारंभ करण्यात आला. यामध्ये महानगरपालिका कामगार-कर्मचारी, रुग्णालय प्रशासन यांसह स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहनिर्माण सहकारी संस्था आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विशेष स्वच्छता मोहिमेत कामा व आल्बेस रूग्णालय, नागपाडा पोलिस रूग्णालय, महानगरपालिकेचे शीव (सायन) रूग्णालय, राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रूग्णालय, व्ही. एन. देसाई रूग्णालय, एस. के. पाटील रूग्णालय, चोक्सी प्रसूतिगृह, टोपीवाला प्रसूतिगृह, भाभा रूग्णालय (कुर्ला), शताब्दी रूग्णालय, श्रीमती दिवालीबेन मेहता रूग्णालय, राजावाडी रूग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय (टागोर नगर) , के. सी. एल. भन्साळी प्रसूतिगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय यासह साबूसिद्दीक रूग्णालय (चंदनवाडी), सैफी रूग्णालय, लाईफ केअर रूग्णालय, माहीम प्रसूतिगृह, नानावटी रूग्णालय, एस.जे.डी.सी. प्रसूतिगृह, आपला दवाखाना (चारकोप), चारकोप दवाखाना, वाय. आर. तावडे दवाखाना आदी परिसरात व्यापक स्वरूपात स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता आणि कचरा वर्गीकरणाबाबत रुग्णालयातील कर्मचारी व नागरिकांना जागरूक करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेतून ४९ मेट्रिक टन राडारोडा, ४३ मेट्रिक टन कचरा आणि २४ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू संकलित करण्यात आल्या. आजच्या मोहिमेत तब्बल १ हजार ५२३ मनुष्यबळ सहभागी झाले होते. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी १३५ वाहने आणि फायरेक्स मशील, मिस्टींग मशीन इत्यादी अद्ययावत यंत्रणाही दिमतीला होती.
उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर म्हणाले की, विशेष स्वच्छता मोहिमेदरम्यान प्रामुख्याने रुग्णालय अंतर्गत परिसर, बाह्य परिसर, लगतचे पदपथ, वाहनतळ यांची स्वच्छता करण्यात येत आहे. घनकच-यासमवेतच राडारोड्याचेही संकलन केले जात आहे. जैव-वैद्यकीय कच-याच्या (Bio Medical Waste) व्यवस्थापनाची जबाबदारी नियमानुसार रूग्णालय प्रशासनाची आहे.स्वच्छता मोहिमेदरम्यान झाडलोट,सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, बेवारस साहित्याची विल्हेवाट, कचरा संकलन, पाणी फवारणी करून स्वच्छता, अनधिकृत वाहनतळ आणि पार्क केलेल्या वाहनांखालील कच-याची स्वच्छता, वाढलेली झाडेझुडपे, बेकायदेशीर जाहिरात फलक आणि टाकाऊ वस्तू हटविण्यात आल्या आहेत.
दिनांक ३ मार्च २०२५ पासून सुरू झालेली ही मोहीम पुढील १५ दिवस म्हणजेच दिनांक १७ मार्च २०२५ पर्यंत सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये सुरू राहणार आहे. शासकीय, महानगरपालिका रूग्णालयांसह खासगी रुग्णालये आणि सार्वजनिक आरोग्य केंद्र यांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. मुंबईकर नागरिक, स्वयंसेवक आणि विविध स्वयंसेवी संस्था, नागरी संघटनांनी रूग्णालय परिसरांमधील विशेष स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, आरोग्य सेवा केंद्रांनी स्वच्छता मोहिमेचा भाग होण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयांमध्ये सहायक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनदेखील श्री. दिघावकर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या