Top Post Ad

महिलांनी समाजात, कार्यालयात स्त्री म्हणून नव्हे व्यक्ती म्हणून वावरावे

महिलांचे सक्षमीकरण त्यांच्या कौशल्यात असते. त्यामुळे त्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करण्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या महिला कणखर बनल्या पाहिजेत. समाजात, कार्यालयात केवळ स्त्री म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून वावरावे. व्यक्ती म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होय. सशक्त महिला सक्षमपणे जग घडवू शकते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र  प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती मृदुला भाटकर यांनी व्यक्त केले. मुंबई महानगरपालिका महिला लैंगिक अत्याचार प्रतिबंध तक्रार समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ०७ मार्च रोजी महानगरपालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

    अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, उप आयुक्त (परिमंडळ- १) डॉ. (श्रीमती) संगीता हसनाळे, उप आयुक्त (विशेष ) तथा कार्यस्थळी महिला लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रमुख अंतर्गत तक्रार समिती व सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती चंदा जाधव, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शहा, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) श्रीमती रश्मी लोखंडे यांच्यासह महानगरपालिकेतील महिला अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 


श्रीमती मृदुला भाटकर पुढे म्हणाल्या, महिलांचा आर्थिक सक्षम होण्याकडे प्रवास वेगाने सुरू आहे. स्वत: कष्ट करून मिळवलेला मोबदला खर्च करण्याचा अधिकार मिळणे म्हणजे खऱ्या अर्थाने महिला आर्थिक सक्षम होणे होय. सक्षम होण्यासोबतच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक हक्कांसाठीही महिलांनी लढा द्यायला हवा. सध्याच्या काळात महिलांनी कणखर बनणेदेखील तितकेच गरजेचे आहे. शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी मैदानी खेळ खेळण्यास महिलांनी प्राधान्य द्यायला हवे. स्वत:सोबत आपल्या कुटुंबातील अन्य महिला आणि मुलींनाही कणखर बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही श्रीमती भाटकर यांनी यावेळी नमूद केले. 

  अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी म्हणाल्या, महिला सक्षमीकरणासोबतच महिलांना समान वागणूक मिळायला हवी. प्रत्यक्ष जमिनीवर (फिल्ड वर्क) कामकाज असलेल्या क्षेत्रातही महिलांना समान संधी मिळायला हव्यात. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियांत्रिकी विभागामध्ये अशाप्रकारे महिला कार्यरत आहेत, याचा अभिमान आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका महिला लैंगिक अत्याचार प्रतिबंध तक्रार समिती महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, असेही श्रीमती जोशी यांनी नमूद केले.  

उप आयुक्त (विशेष) श्रीमती चंदा जाधव म्हणाल्या, महिलांनी आपल्या प्रत्येक क्षेत्रात मेहनतीने, बुद्धिमत्तेने आणि कष्टाने ओळख निर्माण केली आहे. महिला सक्षम होणे हे तिच्यासह समाजासाठीदेखील अत्यंत गरजेचे असते. कारण महिलांचे अधिकार, हक्क, त्यांचा सन्मान हा त्यांचा वैयक्तिक विकास नसतो, तर तो समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास असतो. कर्तव्याच्या ठिकाणी समानतेसह सुरक्षेचे आणि विश्वासाचे वातावरण असणेही तितकेच आवश्यक असते आणि  बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन यात कोणतीही कसूर ठेवत नाही, हे मी विश्वासाने सांगू शकते. महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २००४ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका सावित्रीबाई बाई फुले स्त्री संसाधन केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राच्या अंतर्गत संपूर्ण मुंबईभर एकूण ९२ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व समित्या त्यांच्या स्तरावर प्राप्त तक्रारींची चौकशी करतात आणि त्यानुसार केंद्रीय समितीच्या वतीने कार्यवाही केली जाते, अशी माहिती श्रीमती चंदा जाधव यांनी यावेळी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com