यंदाच्या उन्हाळ्यात (मार्च ते मे) देशभरात कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता अधिक असेल. संपूर्ण देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.यंदाच्या उन्हाळ्यात म्हणजे मार्च – मे दरम्यान देशभरातील कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. दक्षिण भारत वगळता राज्यासह देशभरात उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा उन्हाळा जास्त तापदायक ठरण्याचा अंदाज आहे. राज्यात उन्हाळी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यामुळे उन्हाळी पावसाने नुकसान होण्याची भीती आहे.प्रशांत महासागरात सध्या सक्रिय असलेला ला निना कमकुवत आहे. तो आणखी कमकुवत होताना दिसत आहे. एप्रिलअखेर ला निना निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे र्नैऋत्य मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशांत महासागरात कोणतीही स्थिती नसेल, याचा पावसाळ्यावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
उष्ण हवामानामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. मागील तीन दिवस तापमानाचा पारा ३८ अंशावर नोंदला जात होता. मात्र, शुक्रवारी तापमानात काहीशी घट झाली आहे. सांताक्रूझ येथे ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, ही घट काही दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. फेब्रुवारी महिना सरासरीपेक्षा उष्ण ठरला आहे. देशात फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान सरासरी २७.५८ अंश सेल्सिअस असते, यंदा ते २९.०७ अंश सेल्सिअस होते. किमान तापमान १३.८२ अंश सेल्सिअस असते, ते १५.०२ अंश सेल्सिअस होते. सरासरीपेक्षा कमाल तापमान १.४९ तर किमान तापमान १.२० अंश सेल्सिअसने जास्त होते. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यंदा फेब्रुवारी दुसऱ्या क्रमांकाचा उष्ण महिना ठरला आहे. २०२३ च्या फेब्रुवारीत २९.४४ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती.ठाणे आणि परिसरात सध्या उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. उष्णतेची ही स्थिती काही काळ राहील, असा हवामान खात्याचा इशारा आहे. त्या पार्श्वभूमीवर, ठाणेकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन ठाणे महापालिका प्रशासनाने केले आहे. उष्माघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे . सर्वसामान्य नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी तहान लागली नसली तरी सतत पाणी प्यावे. प्रवासात पाण्याची बाटली सोबत असावी. Oral Rehydration Solution (ORS) घ्यावे. जसे की, लिंबू पाणी, ताक, कोकम सरबत इ. मिठाचे योग्य प्रमाण वापरावे. ऋतुमानानुसार उपलब्ध असणारी फळे व भाज्या यांचा आहारात उपयोग करावा. शरीर झाकलेले असावे :कॉटनयुक्त सैलसर व सौम्य रंगांचे कपडे वापरावे. उन्हात घराबाहेर असताना टोपी अथवा छत्रीचा वापर करावा. सतर्क रहावे, वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही इ. प्रसारमाध्यमातून दिल्या जाणाऱ्या हवामानाबाबतच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. घरातील हवा थंड व खेळती रहावी. घरात थंडावा राखावा. थेट सूर्यप्रकाशापासून घराचे संरक्षण करावे. दुपारी १२ ते ३ या वेळेत थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे. शक्यतो घरात रहावे , घराबाहेर जाणे आवश्यक असल्यास सकाळी व सायंकाळच्या वेळेचा उपयोग करावा. जोखमीच्या व्यक्तींनी उष्माघात टाळण्यासाठी काय करावे, वयस्कर, आजारी व्यक्ती यांनी घरात एकटे राहू नये.
लहान मुले, गरोदर स्त्रिया, घराबाहेर काम करणारे नागरिक, मानसिक दृष्टया आजारी असलेली व्यक्ती, शारीरिक दृष्टया आजारी असलेले नागरिक आदींनी शारीरिक श्रमाची कामे करू नयेत.· चपला/बुटाशिवाय घराबाहेर जाऊ नये. स्वयंपाक करीत असताना हवा पुरेशी खेळती राहील, याची काळजी घ्यावी.· चहा, कॉफी, मद्य यांचे सेवन करू नये. साखरेचे अधिक प्रमाण असलेली पेये घेऊ नयेत. हाय प्रोटीन आहार व शिळे अन्न खाऊ नये. लहान मुले व पाळीव जनावरे यांना पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये ठेऊ नये.
उष्माघाताचे परिणाम -· शरीराचे तापमान वाढणे.· अति उष्म्यामुळे अंगावर रॅश येणे, हातापायांना सुज येणे, मसल्स क्रॅम्प येणे, बेशुध्द पडणे, इत्यादी.· उष्माघाताने आधीच असलेल्या आजाराची तीव्रता वाढते. ही लक्षणे आढळल्यास त्वरित काळजी घ्यावी, योग्य उपचार घ्यावेत.· चक्कर येणे, बेशुध्द होणे, मळमळ, उलटी, डोकेदुखी होणे.· खूप तहान लागणे.· लघवी अत्यंत पिवळी होणे.· श्वासोच्छवास वेगाने होणे, हृदयाचे ठोके वाढणे जर आपणाला किंवा आजूबाजूच्या कोणाला ही लक्षणे आढळल्यास खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे · अशा व्यक्तीला ताबडतोब हवेशीर जागेत न्यावे.· पाणी पिण्यास द्यावे.· जर मसल क्रॅम्प आला तर वैद्यकीय उपचारासाठी वैद्यकीय तज्ज्ञांना त्वरीत बोलवावे.उष्माघातामुळे होणारी कोणतीही लक्षणे (ताप, ग्लानी, संभ्रमावस्था) आढळली तर, ताबडतोब महापालिकेच्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात किंवा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात संपर्क साधावा. तेथे त्वरित उपचार केले जातील.
0 टिप्पण्या