Top Post Ad

पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाबाबत जनजागृतीसाठी निसर्ग उन्नत मार्ग प्रकल्प आदर्श ठरणार

मलबार हिल परिसरात निर्मित निसर्ग उन्नत मार्गाचे लोकार्पण  श्रीकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज  ३० मार्च रोजी करण्यात आले,  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य)  शरद उघडे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) यतीन दळवी, जल अभियंता  पुरुषोत्तम माळवदे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी आणि सरपटणारे प्राणी न्याहाळण्यास याठिकाणी मिळणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी निसर्गाच्या कुशीतील खजिना पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन  महानगरपालिका प्रशासनाकडून  करण्यात आले.


*ऑनलाईन सशुल्क तिकिट प्रणालीचा वापर करून दररोज पहाटे ५ ते रात्री ९ दरम्यान भेट देता येणार* .....निसर्गाचा समतोल राखत बृहन्मुंबई महानगरपालिकेने अतिशय प्रयत्नपूर्वक मलबार हिल येथे निसर्ग उन्नत मार्ग साकारला आहे. हे ठिकाण मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ ठरेल. हा प्रकल्प पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगानेही जनजागृतीसाठी आदर्श ठरेल. अधिकाधिक मुंबईकरांनी या निसर्ग उन्नत मार्गाला भेट द्यावी आणि निसर्गाचा आनंद घ्यावा, असे आवाहन यावेळी लोढा यांनी केले. 

निसर्ग उन्नत मार्गाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या अनुषंगाने सोयीसुविधांची प्रभावी अंमलबजावणी करावी. सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच पर्यावरणीय दृष्ट्या नियमित स्वच्छतेसाठी प्राधान्य देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. मुंबईत पर्यटकांसाठी हा एक आदर्श प्रकल्प ठरणार आहे, त्यामुळे याठिकाणी परिरक्षणाच्या अनुषंगाने विशेष काळजी घेण्याचेही निर्देश गगराणी यांनी दिले.

सिंगापूर येथे विकसित 'ट्री टॉप वॉक' या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे झाडांमधून मार्गिका विकसित करताना निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहचवता हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. आज दिनांक ३० मार्च २०२५ पासून हा उन्नत मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत पर्यंत हा मार्ग खुला राहणार आहे.  

*ऑनलाईन तिकिट नोंदणी*......निसर्ग उन्नत मार्ग येथे भेट देण्यासाठी https://naturetrail.mcgm.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन सशुल्क ऑनलाईन तिकीट काढण्याचा पर्याय आहे. भारतीय नागरिकांसाठी २५ रुपये तसेच परदेशी नागरिकांना १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. मार्गावर एकाच वेळी जास्त गर्दी होऊ नये, यासाठी एकावेळी २०० व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल. हा मार्ग पाहण्यासाठी प्रत्येकी एका तासाचे खंड (स्लॉट) करण्यात आले आहेत. तसेच ऑनलाईन तिकिट नोंदणीत निर्माण झालेल्या बारकोडच्या सहाय्याने प्रवेश आणि निर्गमसाठीचा पर्याय देण्यात आला आहे. अशा पद्धतीचे नागरिकांची नोंद करण्यात येणार आहे. पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी एक्सेस कंट्रोल सिस्टिम (प्रवेश नियंत्रण प्रणाली) विकसित करण्यात आली आहे. प्रकल्प नियंत्रण कक्षातून संपूर्ण उन्नत मार्गावर देखरेख ठेवणे तसेच भेट देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत विशेष मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com