भाजपला मदत होईल असे काम काहीजण आतून करीत आहेत, अशा लोकांना पक्षातून काढावे लागले तरी बेहत्तर, जे लोक पक्षाच्या विचारधारेविरोधात काम करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. गुजरात काँग्रेसमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक जे पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहेत आणि जनतेची कामे करीत आहेत. दुसऱ्या प्रकारातले लोक भाजपशी हातमिळवणी केलेले आहेत. अशा लोकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. काँग्रेसच्या नावावर काम करायचे आणि विरोधकांशी संधान साधायचे, काही लोक आतून भाजपला मदत होईल, असे काम करत आहेत. अशा लोकांना पक्षातून बाहेर काढावे लागले तरी चालेल, असे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाहीत.असा इशारा राहुल गांधी यांनी दिला. राहुल गांधीनी गुजरातच्या दौऱ्यात पक्ष संघटनेची बैठक घेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले. मात्र या बैठकीत ते पक्षातील नेत्यांवर चांगलेच संतप्त झाल्याचे पाहावयास मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा नक्की विजय होणार. असे सांगताना त्यांनी पक्ष संघटनेतील मरगळ झटकून टाकण्याचे आवाहन केले.
काँग्रेसमध्ये नेत्यांना कमी नाही. परंतु संघटनेला मजबूत करण्याची गरज आहे. पक्ष जर आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर गुजरातचे लोक आपल्याला बळ देणार नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन जनतेची सेवा केली पाहिजे. गुजरात राज्य सध्या अडचणीत असून राज्याला दिशा देण्याची गरज आहे. महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांनी काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी येथेच कष्ट घेतले होते. गुजरातचे युवक, व्यापारी आणि महिलांसाठी आपल्याला लढावे लागेल,
अहमदाबाद येथे आयोजित केलेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, गुजरातमधील व्यापारी, छोटे व्यावसायिक, शेतकरी, मजूर, विद्यार्थी यांना आता पर्याय हवा आहे. त्यांना ‘बी’ टीम नको आहे. पक्षात जे दोन गट पडले आहेत, त्यात विभागणी करणे ही माझी जबाबदारी आहे. पहिले काम म्हणजे दोन गटांना वेगळे करायचे. यासाठी कडक कारवाई करावी लागली, काही लोकांना काढावे लागले तरी आपण त्यांना काढून टाकू. आपला जिल्हाध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष किंवा ज्येष्ठ नेता असो, त्याच्या हृदयात काँग्रेस असायला हवी, विजय किंवा पराभवाची गोष्ट सोडा. काँग्रेसचा कार्यकर्ता असो किंवा नेता, त्याचा हात जर कापला तर त्यातूनही काँग्रेस वाहायला हवी. संघटनेचे नियंत्रण अशा एकनिष्ठ लोकांच्या हातात जायला हवे. आपण जेव्हा हे काम करू तेव्हा गुजरातमधील जनता वादळाप्रमाणे आपल्या संघटनेत सामील होण्याचा प्रयत्न करेल, असेही गांधी म्हणाले.
८ फेब्रुवारी २०२५ ला गुजरात च्या सभेत राहुल गांधी यांनी कबूल केले की कांग्रेसचे लोक कांग्रेस मध्ये राहून भाजपासाठी काम करतात, भाजपाला सत्ताधारी बनवण्यासाठी काम करीत आहेत आणि कांग्रेस ला "बी" टिम बनवले आहे. फार उशीरा राहुल गांधी यांना हा साक्षात्कार झाला आहे, लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्यापुर्वीच एड बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष - वंचित बहुजन आघाडी यांनी अनेकदा या बाबत कांग्रेस नेतृत्वाला जाहिर पणे सावध केले होते. परंतु कांग्रेसने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आज केंद्रात व राज्यात भाजप सत्ताधारी आहे. याच कांग्रेसने संविधानाचे नाव घेऊन वंचितांची दिशाभूल करत मते लुटली, परंतु वंचितांना लोकसभा विधानसभा निवडणुकीत तिकटे दिली नाही, ना मुळ विमुक्त भटक्या जमातीला, ना आलुतेदार बलुतेदार यांना, ना अल्पसंख्याकांना.. मते मात्र घेतली. आणी आज स्वतः राहुल गांधी जाहीर पणे कबूल करत आहे की कांग्रेस मध्ये भाजपा, आर एस एस चे स्लीपर सेल आहेत म्हणून. राहुल गांधी जी आता पश्चात्ताप करून काय उपयोग...
कबीर जी म्हणतात -
अब पछताए क्या होय! जब चिडीया चुग गयी खेत!
साप गेल्यावर खोटं खोटं काठी हातात घेऊन भुई थोपटण्याचा हा प्रकार आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील कांग्रेसच्या वागण्यामुळे, आपल्या पक्षाने वंचित बहुजन आघाडी बाबत जो खोटा व दिशाभूल करणारा प्रचार प्रसार केल्यामुळे वंचितांचे न भरुन येणारे नुकसान आपण व आपल्या पक्षाने केले आहे, राज्यातील जनतेचे व देशाचेही नुकसान या मुळे झाले आहे. हे न विसरता येणारे आहे.
वंचितांनो, शेतकऱ्यांनो, श्रमिकांनो आता तरी जागे व्हा वंचित बहुजन आघाडीलाच या पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मते द्या.
अंबरसिंग चव्हाण
0 टिप्पण्या