Top Post Ad

महानगरपालिका आणि झोमॅटो कंपनी यांचा संयुक्त उपक्रम ‘प्रोजेक्ट आर्या’चा शुभारंभ

 बृहन्मुंबई महानगरपालिका आणि खाद्यपदार्थ पोहोच करणारी ‘झोमॅटो’ कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट आर्या’ हा पथदर्शी उपक्रम आज  ५ मार्च  पासून मुलुंड परिसरात सुरू झाला. या उपक्रमात सहभागी महिलांच्या दुचाकी रॅलीला बृहन्मुंबई आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हिरवा झेंडा दाखवून उपक्रमाचा शुभारंभ केला. ‘झोमॅटो’ सोबत अशाप्रकारचा उपक्रम राबविणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारतातील पहिलीच महानगरपालिका ठरली आहे. मुलुंड (पश्चिम) येथील कालिदास नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमास संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, टी विभागाचे सहायक आयुक्त  अजय पाटणे, 'झोमॅटो'चे मुंबई विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी . दुर्वेश, इतर मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमात सहभागी महिलांना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  गगराणी यांच्या हस्ते उपक्रमाचे किट भेट देण्यात आले. त्यानंतर  भूषण गगराणी आणि संचालक डॉ. प्राची जांभेकर यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमात सहभागी महिलांची दुचाकी रॅली काढण्यात आली. मुलुंड परिसरातील बचत गटातील महिला सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होत्या. श्रीमती वेदिका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 

 बचत गटाच्या महिला लोणची, पापड तयार करतात. काही बचत गट कापडी पिशव्या तयार करतात. मात्र स्पर्धेच्या युगात आता ही पारंपरिक चौकट महिला ओलांडत आहेत. ‘प्रोजेक्ट आर्या’ हा अभिनव उपक्रम त्याचेच उदाहरण आहे. खाद्यपदार्थ वितरण क्षेत्रात आता महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उतरल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आर्थिक सहाय्य केलेल्या बचत गटांच्या महिला आता या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. नवनवीन क्षेत्रे महिलांसाठी खुली होत आहेत. त्यासाठी महिलांनी सज्ज राहायला हवे, असे मनोगत यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांनी व्यक्त केले.  गगराणी पुढे म्हणाले, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महानगरपालिका सतत विविध योजना, उपक्रम राबवित असते. महानगरपालिका नियोजन विभागाच्या माध्यमातून बचत बचत गटांना आर्थिक सहाय्य केले जाते. आता त्याच्याही पुढे जाऊन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अशा प्रकारचे अभिनव उपक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका हाती घेत आहे. कोणतेही काम करताना महिला नियमांचे पालन करतात. सहाजिकच 'झोमॅटो' सोबतच्या उपक्रमात महिला सहभागी असल्याने मुंबईसारख्या अत्यंत वर्दळीच्या महानगरात वाहतूकही सुरळीत राहण्यास मदत होईल, असेही मत यानिमित्ताने  गगराणी यांनी केले. 

प्रास्तविक करताना संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांनी या उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमासाठी एकूण ३० ते ४० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५ महिलांची निवड करण्यात आली आहे. आता या महिला खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे काम करणार आहेत. सध्या मुलुंड परिसरात हा पथदर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानंतर महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येईल, असे डॉ. जांभेकर यांनी नमूद केले.

'झोमॅटो'चे मुंबई विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  दुर्वेश यांनी उपक्रमाचे विविध पैलू मांडले. ‘प्रोजेक्ट आर्या’ मध्ये सहभागी महिलांना नोंदणी प्रक्रिया, प्रशिक्षण, सुरक्षा उपायबाबतच्या योजना आणि विमा सुविधा 'झोमॅटो' कडून प्रदान करण्यात येणार आहेत. या उपक्रमात सहभागी महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती, अपघात विमा, मातृत्व विमा, कुटुंबासाठी विमा, मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांसाठी रजा, नि:शुल्क सुरक्षा साहित्य, कुटुंबासाठी आदी बाबींचा समावेश असल्याचे  दुर्वेश यांनी सांगितले. या पथदर्शी उपक्रमात सध्या मुलुंड आणि भांडुप हे क्षेत्र महिलांसाठी ठरविण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com