ठाणे-मराठी साहित्यात विद्रोही पर्वाचा आरंभ करणारे थोर क्रांतिकारी लेखक कवी बाबुराव बागूल यांचा 26 मार्च हा स्मृतीदिवस.या निमित्त डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशन ,महाराष्ट्र यांच्या वतीने अभिवादन सभा आणि निमंत्रित कवींचे कविसंमेलन,गाळा क्रमांक 52,दादोजी कोंडदेव क्रीडासंकुल, ठाणे आयोजीत करण्यात आले.कवीसंमेलनाचे अध्यक्षस्थान जेष्ठ कवी विवेक मोरे यांनी भूषविले. साहित्यिक बाबुराव बागूल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कवी विवेक मोरे यांनी आबांच्या विद्रोही विचारांनी आंबेडकरी साहित्यात नवी लाट निर्माण झाली,आबांनी जास्त माणसावर लिहीले असे उद्गार काढले.प्रास्ताविक अडव्होकेट नाना आहिरे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर कवी संमेलनास सुरवात झाली.

जेष्ठ साहित्यिक कवी शिवा इंगोले,विवेक मोरे,बबन सरवदे,किरण सोणवने,गजानन गावंडे,सुधाकर सरवदे,अनंत धनसरे,के.पुरुषोत्तम,राजरत्न राजगुरु यांच्यासह भटू जगदेव,समाधान वाघमारे,वसंत हिरे,महादेव जावळे,विकास भंडारे,प्रा.विकास जाधव, प्रभाकर जाधव, रविकिरण मस्के,सुरेखा गायकवाड, सुखदेव कर्डक, किशोर पवार,सुरेश कांबळे,राजेंद्र बनसोडे,बौध्दाचार्य व्ही.जी.सपकाळ गुरुजी,अडव्होकेट भानुदास अवचार,राजा रावळ यांनी कविता सादर केल्या.मुक्तछंद,गेय,गीत,गझल इत्यादी बहारदार कवितांमुळे कार्यक्रमाने वेगळी उंची गाठली.व्वा व्वा,क्या बात है अशी दाद उपस्थितांनी दिल्याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार झाला.दिक्षा आहिरे यांनी आबांच्या 'वेदा आधी तू होतास 'या कविततेचे वाचन केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी सुधाकर सरवदे यांनी बहारदार केले.अडव्होकेट नाना आहिरे यांच्या आभारप्रदर्शनाने अभिवादन सभा आणि कवीसंमेलनाची सांगता झाली.
बाबुराव बागुलांच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही आबांचे (बागुलांचे) वारसदार कवी संध्याकाळी त्या काल्पनिक पात्र असलेल्या कोंडदेव स्टेडियम येथे आबांचे जावई ॲडव्हाकेट नानासाहेब अहिरे यांच्या कार्यालयासमोर जमलो होतो. शिवा इंगोलेंसारखे जेष्ठ साहित्यिक असताना या आंबेडकराईट रायटर्स असोसिएशनने माझ्यासारख्या एका फाटक्या कविला थेट या कविसंमेलनाचे अध्यक्ष बनविले, या त्यांच्या धाडसाबद्दल त्यांचे खरोखरच अभिनंदन! आबांच्या फोटोला हार घालून आम्ही त्यांना वंदन केले. सुधाकर सरवदे या मित्राच्या खुमासदार सूत्रसंचालनाने या कविसंमेलनाला सुरवात झाली. किरण सोनावणे सारख्या मातब्बर कविंमुळे कविसंमेलनाला चार चांद लागले. भटू जगदेव, राजेंद्र बनसोडे, शाहीर कर्डक, विकास भंडारे या सारख्या अनेक कवींनी या कविसंमेलनात आपल्या कवितांचं प्रभावी सादरीकरण केलं. मास्टर राजरत्न राजगुरू यांच्या सनृत्य काव्य सादरीकरणाने कविसंमेलनात नेहमीसारखाच एक अनोखा रंग भरला. या कविसंमेलनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे की, विकास जाधव हा उल्हासनगर येथून भावी नगरसेविका असणाऱ्या आपल्या पत्नीसोबत आला होता आणि त्याने चक्क इंग्लिशमध्ये आपली कविता म्हटली. नानासाहेब अहिरेंच्या मुलीनेही बागुलांची, "देवाआधी तू होता..." ही सुप्रसिद्ध कविता म्हटली.
या कविसंमेलनात उपस्थित असलेली एकमेव कवयित्री सुरेखा गायकवाड हिने आपल्या गोड आवाजात बाबासाहेबांचं सुंदर असं स्वरचित गाणं गाऊन संपूर्ण कविसंमेलन सुंदर करुन टाकलं. एका तरुण कवीनेही आपल्या खणखणीत आवाजात बाबासाहेबांचं गाणं गायलं, त्याचं नाव मात्र मला आता आठवत नाही. पण त्याचं गाणं मात्र जोरदार होतं. सूत्रसंचालन करणाऱ्या सुधाकर सरवदेंनीही आपली एक छान कविता सादर केली. एकंदर पंचवीस एक कवीच्या कवितांचं या कविसंमेलनात सादरीकरण झालं. सगळ्यांची नावे घेणे येथे शक्य नाही. पण सर्वच कविता चांगल्या होत्या. सरते शेवटी शिवा इंगोले, बबन सरवदे आणि माझी कविता होऊन नानासाहेबांच्या भाषणाने या कविसंमेलनाचा समारोप झाला. नानासाहेब भाषण संपविताना माझा व बबनचा उल्लेख करुन, "आज मला आबांचे अर्थात बाबुराव बागुलांचे दोन शिलेदार भेटले!" असे उद्गार काढले. नानासाहेबांचे या उद्गाराने आम्हाला आमचे खरे मानधन प्राप्त झाले. नानासाहेब आम्ही खरोखरच तुमचे ॠणी आहोत. जयभीम! - विवेक मोरे
0 टिप्पण्या