शिंदेसेनेतील नेते संजय निरुपम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना मुंबई काँग्रेसचे नुकसान झाले. ते कोणत्याच पक्षाचे निष्ठावान नाहीत. पक्षाच्या नावावर स्वताचा फायदा करून घेण्याचे काम निरुपम यांनी केले असून राजकीय अपयशामुळे त्यांना नैराश्य आले आहे. निरुपम यांनी काँग्रेसची चिंता करू नये. शिंदेसेनेलाच भाजपामध्ये विलीन व्हावे लागेल, त्यामुळे संजय निरुपम यांनी त्यांची व त्यांच्या पक्षाची काळजी करावी असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिले आहे.
खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाची पावती हा लोकसभेतील मविआचा विजय सांगतो. निरुपम यांच्या पक्षाने मुंबईत एका मतदारसंघात मतांची चोरी करून विजय मिळवला आहे. संजय निरुपम यांच्या काळात काँग्रेस पक्षाची वाताहात झाली. आपल्या अहंकारी स्वभाव व मुजोरीमुळे मुंबई काँग्रेसचे अनेक चांगले कार्यकर्ते पक्षापासून दूर गेले. ज्या शिवसेनेने त्यांना राज्यसभेचे दोनदा खासदार केले त्या पक्षाशी त्यांनी गद्दारी केली बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. काँग्रेस पक्षाने त्यांना विविध पदे दिली पण काँग्रेस पक्षाशीही त्यांनी गद्दारी केली. अशा गद्दारांनी काँग्रेस बद्दल बोलू नये. काँग्रेस संपणारी नाही पण शिंदेसेनेलाच भाजपात विलीन व्हावे लागणार असून त्यांच्या पक्षाचेच अस्तित्व धोक्यात आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. काँग्रेस पक्षाला व खासदार वर्षा गायकवाड यांना बदनाम करण्यासाठी ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. असेही काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या