मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनांना सेवा देण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम सुरक्षा दल चोखपणे बजावत आहे. सुरक्षेसारखी अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडणारे सुरक्षा दल अधिक अद्ययावत अणि बळकट करण्याकरिता तसेच सुरक्षा खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सुदृढ ठेवण्याकरिता महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील राहील,अशी ग्वाही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांनी दिली. महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचा ५९ वा वर्धापन दिन आज १ मार्च रोजी भांडुप संकुल स्थित सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्रात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांच्यासह विविध अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
उप आयुक्त जाधव पुढे म्हणाल्या की, सुरक्षा दलातील अधिकारी, कर्मचारी हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेस कायम तत्पर असतात. विविध बंदोबस्त त्यांनी उत्तम प्रकारे आणि कार्यक्षमतेने पार पाडले आहेत. सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व अत्याधुनिक सुरक्षा उपकरणे प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांकरिता ई- मस्टर (e-muster) प्रणाली देखील लवकरच कार्यान्वित होणार आहे, असे देखील जाधव यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुरक्षा दलामार्फत दिमाखदार आणि शिस्तबद्ध संचलन करण्यात आले. तसेच , शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या, विशेष कामगिरी बजावलेल्या अधिकारी, कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला.
महानगरपालिकेच्या यांत्रिकी आणि विद्युत विभागामार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॅमेरे पथदर्शी प्रकल्प अंतर्गत महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (के. ई. एम.) आणि सेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालय, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय (शीव रुग्णालय), बा. य. ल. नायर धर्मार्थ रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कुपर रुग्णालय या प्रमुख चार रूग्णालयात कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. तसेच प्रसुतिगृह आणि उपनगरीय रूग्णालये याठिकाणीदेखील कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रसुतिगृह आणि रूग्णालय या परिसरात येणाऱ्या व्यक्तींच्या चेहर्याची ओळख संबंधिचा तपशील तसेच परिसरात ये - जा करणार्या वाहनांची माहितीही मिळवणे शक्य होईल. पुढील टप्प्यात विभाग कार्यालये (वॉर्ड) अणि महानगरपालिकेच्या नाट्यगृह व जलतरण तलाव याठिकाणीदेखील अशाच प्रकारचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी दिली.
सुरक्षा दलातील कर्मचारी अणि अधिकारी यांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने तसेच नेतृत्व कौशल्य वाढीस लागावे याकरिता "नेतृत्व गुण आणि त्याची मार्गदर्शक तत्वे" या विषयावर प्रसिद्ध लेखक व प्रशिक्षक डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांच्या मुख्य उपस्थितीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, आपत्कालीन घटना प्रभावीपणे हाताळण्याच्या दृष्टीने सर्व सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक यांना आपत्कालीन व्यवस्थापन विषयक बारा दिवसांचे प्रशिक्षण टप्प्या - टप्प्याने दिले जात आहे. आतापर्यंत एकूण दहा तुकड्यांमध्ये दहा सुरक्षा अधिकारी व एकूण ३८४ सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांना पावसाळ्यात मुंबईतील सहा महत्त्वाच्या समुद्र चौपाट्यांवर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येते, अशी माहितीदेखील प्रमुख सुरक्षा अधिकारी तावडे यांनी दिली.
0 टिप्पण्या