Top Post Ad

होलिका दहन व धुळवड / रंगपंचमी आनंदाने, जबाबदारीने साजरी करावी

होलिका दहन आणि धुळवड/रंगपंचमी हे सण मुंबईकर नागरिकांनी आनंदाने आणि जबाबदारीने साजरे करावेत. होळी सणासाठी नागरिकांनी झाडे अथवा झाडांच्या फांद्या तोडू नयेत. तसेच, रंगांचा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्‍यावी. धूलिवंदन/ रंगपंचमीकरीता पाण्याचा शक्‍यतो वापर टाळावा. मुंबई महानगर स्वच्छ व निरोगी ठेवण्‍यासाठी मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे,असे विनम्र आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक  भूषण गगराणी व अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी केले आहे.गुरूवार, दिनांक १३ मार्च २०२५ रोजी होळी सण साजरा करण्यात येणार आहे. होलीका दहनासाठी कोरड्या लाकडाचा वापर करून होळी दहन पारंपरिक पद्धतीने साजरे करावे. वृक्षतोड करू नये. रासायनिक घटक वापरुन रंगवलेले लाकूड, प्लास्टिक, रबर,टायर आणि अन्य घातक पदार्थ दहन करताना टाळावे. त्यातून निर्माण होणारा धूर आणि प्रदूषण आरोग्यास हानिकारक असतात, हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे. गृहनिर्माण सहकारी संस्‍‍था (सोसायटी) आणि स्‍थानिक समुदायांनी पर्यावरणपूरक पद्धतीने होलिका दहनाचे आयोजन करावे.

होळी दहनाची परंपरा जपताना पर्यावरणाचे संरक्षण करावे. मुंबईत आपल्या अवतीभोवती असलेली निसर्ग संपदा जोपासणे आणि वृद्धिंगत करणे, हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. आपणा सर्वांना प्राणवायू देणाऱया झाडांचे, वृक्षांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्‍यात येत आहे. होळीच्या दुसऱया दिवशी म्हणजेच शुक्रवार, दिनांक १४ मार्च २०२५ रोजी साजरा होणारा ‘धूलिवंदन’हा सण सर्व नागरिकांना एकाच धाग्यात गुंफणारा तसेच नवचैतन्य निर्माण करणारा आहे. मुंबईकर नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासून या दिवशी पाण्याचा अपव्‍यय टाळावा. पर्यावरणपूरक (Eco-Friendly) नैसर्गिक रंगांचा वापर करावा. त्वचेसाठी सुरक्षित असेलेले आणि मुलांसाठीदेखील निरूपद्रवी असेलेले नैसर्गिक व सेंद्रिय रंग वापरावेत. कृत्रिम रंगांमध्ये रसायने आणि जड धातूंचा अंतर्भाव असल्‍याने त्‍यांचा वापर करणे टाळावे. शक्य तितक्या कोरड्या रंगांचा वापर करत पाणी बचत करावी. होलिका दहन आणि धुळवड/रंगपंचमी सणाचा आनंद द्विगुणीत करताना ध्‍वनी प्रदूषण होणार नाही याची विशेष काळजी घ्‍यावी. विशेषतः रुग्णालये, निवासी भाग आणि संवेदनशील ठिकाणी आवाज पातळी मर्यादीत ठेवावी, असे आवाहनदेखील महानगरपालिका प्रशासनाकडून समस्त मुंबईवासियांना  करण्‍यात येत आहे.

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.  गुरूवार दिनांक १३ मार्च २०२५ रोजी होळी सण साजरा करण्यात येणार आहे. या सणाच्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास, सतर्क नागरिकांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना व स्थानिक पोलिस ठाण्यास कळवावे किंवा महानगरपालिकेच्या '१९१६' या 'टोल फ्री' क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन  महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक तथा वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सचिव  जितेंद्र परदेशी यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे. 

 ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’ अंतर्गत कलम २१ अन्वये, वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास / तोडण्यास कारणीभूत होणे, हा अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिला कमीत कमी रुपये १ हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यासह एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा देखील होऊ शकते. 

मुंबईत चोहीकडे हिरवळ दाटलेली असावी, यासाठी प्रत्येक मुंबईकराने प्रयत्न करायला हवेत. आपल्या अवतीभवती असलेली निसर्गसंपदा जोपासणे आणि वृद्धिंगत करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. आपणा सर्वांना प्राणवायू देणाऱ्या झाडांचे, वृक्षांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्यान अधीक्षक  परदेशी यांनी केले आहे. 


१३ मार्च रोजी होळी आणि १४ मार्च रोजी धुलिवंदन सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त मुंबईत शांतता आणि सुरक्षितता राहावी, यासाठी मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत. होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या उत्सवात इतरांना त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांनी काही गोष्टींचे निर्बंध घातले आहेत. १२ मार्च ते १८ मार्च पर्यंत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या दरम्यान रस्त्यावर चालणाऱ्या लोकांवर रंग आणि पाणी फेकता येणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी बीभत्स गाणी वाजवता येणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी बीभत्स गाणी वाजवता येणार नाहीत, तसेच आक्षेपार्ह घोषणा देण्यावर पोलिसांनी बंदी आणली आहे. आक्षेपार्ह चिन्हांचे प्रदर्शन करणे किंवा पुतळे बनविणे, इतरांचा अवमान होईल, असे फोटो, फलक किंवा इतर वस्तूंचे जाहिररित्या प्रदर्शन करण्यास बंदी घातली आहे. पाण्याने भरलेले फुगे, पिशव्या फेकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्सवा दरम्यान फुगे फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ च्या कलम १३५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com