. नामांकित प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. आशा गोयल यांची मुंबई दौऱ्यावर असताना २२ ऑगस्ट २००३ रोजी मुंबईत निर्घृण हत्या करण्यात आली होती. २१ वर्षांचा कालावधी उलटूनही गोयल कुटुंब अद्यापही न्यायासाठी लढत आहे, डीएनए पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि अगदी कबुलीजबाबासह ठोस पुरावे असूनही हा खटला अद्याप सुटलेला नाही. या न्यायालयीन प्रक्रियेच्या विलंबामुळे कुटुंबाला मोठ्या मानसिक यातना सहन कराव्या लागत असून न्याय व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. डेन्व्हर विद्यापीठात गुन्हेगारी कायद्याच्या प्राध्यापक असलेल्या त्यांच्या कन्या रश्मी गोयल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या दीर्घ विलंबाबाबत तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली असल्याची माहिती आज मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
"आम्ही खूप वाट पाहिली आहे, आता आमचा संयम सुटला आहे. माझ्या आईने संपूर्ण आयुष्य इतरांना बरे करण्यासाठी दिले, पण तिच्या निर्घृण हत्येप्रकरणी अजूनही न्याय मिळालेला नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी हस्तक्षेप करून या खटल्याला न्याय मिळवून द्यावा. एवढे ठोस पुरावे असतानाही गुन्हेगार सुटून जात असतील, तर भारताच्या प्रतिमेबाबत जागतिक स्तरावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहतील," असे रश्मी गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ. आशा गोयल या महिलांच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या एक नामांकित डॉक्टर होत्या. १९४० मध्ये मथुरामध्ये जन्मलेल्या डॉ. गोयल यांनी मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेतले आणि त्यानंतर कॅनडाला स्थलांतरित झाल्या. तेथे त्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्राच्या आघाडीच्या तज्ज्ञांपैकी एक झाल्या. त्यांच्या हत्येने भारत आणि कॅनडामध्ये खळबळ उडवली होती, मात्र आजही त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालेली नाही. ही विलंबित न्याय प्रक्रिया केवळ गोयल कुटुंबासाठीच दुःखद नाही, तर भारतीय न्यायव्यवस्थेसमोरील गंभीर समस्या आहे. न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार कुटुंबाने व्यक्त केला असल्याचे रश्मी गोयल म्हणाल्या.
0 टिप्पण्या