*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शिवजयंती उत्सव हर्षोल्हासात संपन्न*
*छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण*
*महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा, गौरवगीतांचे सादरीकरण*
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयोजित ‘शिवजयंती उत्सव’ आज (दिनांक १९ फेब्रुवारी २०२५) हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. दादर येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदान स्थित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा सह पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा; स्थानिक खासदार श्री. अनिल देसाई; स्थानिक आमदार श्री. महेश सावंत; आमदार श्री. सुनील शिंदे यांची या सोहळ्यास उपस्थिती होती.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. किसन जाधव, सरचिटणीस श्री. संजय शेटे, उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. अजितकुमार आंबी, महानगरपालिका सचिव श्रीमती रसिका देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील क्रीडा भवन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव अंतर्गत सोहळा पार पडला. महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीच्या चमूने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा तसेच गौरवपर मराठी गीते सादर केली. ही गौरवगीते ऐकून उपस्थित मंत्रमुग्ध झाले.
*भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन*
भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथे सकाळी श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष तथा स्थानिक आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. किसन जाधव, सरचिटणीस श्री. संजय शेटे, महानगरपालिकेच्या ए विभागाचे सहायक आयुक्त श्री. जयदीप मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
*बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी*
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महानगरपालिका सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास ए विभागाचे सहायक आयुक्त श्री. जयदीप मोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महानगरपालिका उप सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे याप्रसंगी उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या