–छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने ठाणे शहरात आज (19 फेब्रु) 'जय शिवाजी जय भारत' असे घोषवाक्य असलेली 6 कि.मी अंतराची पदयात्रा काढण्यात येणार असून या पदयात्रेत 5 ते 6 हजार युवक सहभागी होणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपायुक्त उमेश बिरारी उपस्थित होते.
भारत सरकार, युवा कार्यक्रम और खेल मंत्रालय, युवा कार्यक्रम विभाग यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्हयांमध्ये 6 कि.मी अंतराची पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, डॉ. जितेंद्र आव्हाड तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. राज्यातील शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी/ कर्मचारी, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, एन.एस.एस, सामाजिक संस्था, ट्रस्टमधील सर्व व्यक्ती सहभागी होणार आहेत.
ठाणे शहरातून सकाळी 7.30 वा. शिवसमर्थ शाळा पटांगण, गडकरी रंगायतनसमोर, ठाणे येथून पदयात्रा बाहेर पडून मारोतराव शिंदे तरणतलाव, दत्त मंदिर घाट, प्रभात सिनेमा सिग्नल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रंगो बापूजी गुप्ते चौक, टेंभीनाका, कोर्टनाका, सेंट्रल मैदान, ठाणे जिल्हा कारागृह, जी.पी.ओ, सिव्हील हॉस्पिटल, सिग्नाँग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, खोपट सिग्नल, अल्मेडा चौक, महापालिका मुख्यालय, पाचपाखाडी प्रशांत कॉर्नर, आराधना टॉकीज चौक, हरिनिवास सर्क, मल्हार सिनेमा सर्कल, गोखले रोड, राम मारुती रोड प्रवेश, पु.ना. गाडगीळ चौक, तलावपाळी येथून पुन्हा शिवसमर्थ शाळा पटांगण येथे समाप्त होणार आहे. पदयात्रेनंतर शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
यावेळी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य केलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार असल्याचेही अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी नमूद केले असून ठाणेकर नागरिकांनी देखील या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
0 टिप्पण्या