कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे शहर शाखेच्या वतीने सूत्रसंचालन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ प्रशिक्षक राजेश तांबडे, प्रसिद्ध निवेदिका वृंदा दाभोळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शहर शाखेच्या ‘समृद्ध मराठी' अनियतकालिकाच्या ‘पर्यावरण' विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर शहर शाखा अध्यक्ष ऍड. मनोज वैद्य, कार्याध्यक्ष साधना ठाकूर, उपाध्यक्ष विनोद पितळे, महिला विभागप्रमुख डॉ. प्रतीक्षा बोर्डे, डॉ. अंजुषा पाटील उपस्थित होते.
कार्यशाळेची सुरुवात करताना ऍड. वैद्य यांनी सांगितले, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मराठी भाषेसाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम करत असतो. हे उपक्रम राबवत समोर कितीजण असतील अशी एक साशंकता आमच्या मनात असते. पण मराठी भाषेसाठी समोर अगदी एकजण जरी असला तरी कार्यक्रम करायचाच असं आम्ही ठरवलं आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून आजची ही कार्यशाळा आम्ही आयोजित केली आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. या भाषेचे आपण अग्रदूत होऊन काम करूया. महाराष्ट्रात इतर भाषांचा द्वेष नको, पण मराठी भाषेसाठी आग्रही राहिलो तरच मराठी भाषा महाराष्ट्रात जीवंत राहील, असे ऍड. वैद्य यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.उपस्थितांना मार्गदर्शन करताना वृंदा दाभोळकर यांनी सूत्रसंचाल, निवेदक आणि मुलाखतकार यांच्यातील फरक सांगितले. सूत्रसंचालकाने किंवा निवेदकाने जागृत राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. हे एक खूप जबाबदारीचं काम असून एखाद्या सराईत चित्रकारासारखं ते काम झालं पाहिजे. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत तो एका सूत्रात बांधण्याचं काम निवेदकाने केलं पाहिजे.पुस्तक प्रकाशन,गाणे, नृत्य, बक्षीस समारंभ, श्रद्धांजली अशा वेगवेगळ्या कार्यक्रमात निवेदकाने काय बोलावे,काय बोलू नये याविषयी वृंदा दाभोळकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक राजेश तांबडे यांनी आवाजाचे महत्त्व सांगितले. आवाज निर्माण कसा होतो, आवाजावर नियंत्रण कसे मिळवावे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देत उपस्थितांना प्रात्यक्षिक करायची संधी दिली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कार्यशाळेत सहभागी असलेले अरुण भोसले यांनी केलेल्या प्रात्यक्षिकातून करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्यवाह पंकज पाडाळे, गणेश गावखडकर, राजश्री डोईफोडे, मेधा भावे यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली.
1 टिप्पण्या
धन्यवाद सर
उत्तर द्याहटवा