दादर इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास लावला जाणारा विलंब, खर्चात होणारी वाढ आणि त्यातून सामाजिक न्याय खात्याच्या कल्याणकारी योजनांना बसणारा फटका.
चैत्यभूमीलगत दादरच्या इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा २००० सालात ऐरणीवर आलेला प्रश्न हा २५ वर्षे इतका जुना आहे. त्यासाठी भूखंड मिळून स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हायला २०१५ साल उजाडावे लागले. अन् त्याचे प्रत्यक्ष काम २०१८ सालात सुरू झाले. आता २०२५ साल सुरू झाले आहे.गेल्या सहा वर्षांत फक्त ५२ टक्के काम झाले असून जवळपास निम्मे काम बाकी आहे. राज्याचे नवे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी त्यासाठी आता मे २०२६ ही नवी तारीख दिली आहे. मात्र स्मारकाच्या कामाची आजवरची ' कासव छाप ' गती पाहता निम्मे काम पुढील १५ महिन्यांत पूर्ण होईलच याची खात्री कुणीही देवू शकत नाही. या स्मारकाच्या उभारणीचे कंत्राट शापुरजी पालनजी या कंपनीला देण्यात आले असून सल्लागार मेसर्स शशी प्रभू अँड असोसिएट हे आहेत. या प्रकल्पाचा खर्च आणि नियोजनाची जबाबदारी राज्य सरकारने मार्च २०१३ मध्ये ' एमएमआरडी ' कडे सोपवली होती. पण प्रत्यक्षात मात्र त्या स्मारकासाठी निधी हा सामाजिक न्याय खात्याचा वापरला जात आहे. अन् त्याकडे सारे निमूटपणे पाहात बसले आहेत.
स्मारकाच्या खर्चात दुपटीने वाढ- सुरुवातीला या स्मारक प्रकल्पाचा खर्च ५९१. २२ कोटी रुपये इतका होता.पण या प्रकल्पातील पुतळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोलादाच्या गुणवत्तेत सुधारणा सुचवल्याने तो खर्च नंतर ६२२.४० कोटीपर्यंत गेला. २०१७ सालात आणखी वाढलेल्या एकूण ७६३. ०५ कोटी रुपये खर्चाला राज्य सरकारने मान्यता दिली होती. त्यानंतर २०२० सालात पुतळ्याची उंची ३५० फुटांवरून ४५० फुटापर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे स्मारकाचा खर्च वाढून तो आता १ हजार ८९ कोटी ९५ लाख इतका झाला आहे.
वाढत्या खर्चाची झळ दलितांनाच !- समारकाच्या कामाला विलंब म्हणजे त्याच्या खर्चात वाढ हे समीकरण आहे. त्याची झळ अनुसूचित जाती, जमातींच्या विकासाच्या योजनांची जबाबदारी शिरावर असलेल्या सामाजिक न्याय खात्यालाच बसत आहे. त्याचा फटका अंतिमतः दलित, बौद्ध, आदिवासी या समाजासाठीच्या योजनांना बसत आहे. मात्र या मुद्द्यावर सगळीकडे सामसूम दिसत आहे. स्मारक पूर्ण होण्यास लागणारा विलंब आणि त्यातून वाढणाऱ्या खर्चाला शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर ' इष्टापत्ती ' तर मानले जात नाही ना, असा प्रश्न पडण्यासारखी एकूण परिस्थिती आहे.
बाबासाहेबांचा पुतळा सदोष - दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा खर्च एक हजार कोटींच्यावर पोहोचला असताना त्यांच्या उत्तुंग पुतळ्याची निर्मिती ही सदोष आहे, हे त्याच्या प्रतिकृतीवरून प्रकर्षाने जाणवत आहे. संकल्पित पुतळ्याचे शिल्पकार अनिल राम सुतार हे असून गाझियाबादच्या कार्यशाळेत या पुतळ्याची २५ फूटाची प्रतिकृती उभी करण्यात आली आहे. मात्र सदोष आणि असमाधानकारक असलेल्या त्या प्रतिकृतीला मंजुरी मिळता कामा नये. पण हा सर्वाधिक महत्वाचा मुद्दा बाजूला सारला जात असल्याचे दिसत असून हे संतापजनक आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बनवण्यात येत असलेला पुतळा सदोष असून त्यामध्ये बदल करण्यात येऊन नवीन पुतळा बनवून तो बसवण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याबाबतची माहिती समितीचे सदस्य समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांनी दिली आहे. ते म्हणाले की, मुंबई दादर येथील यांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंतरराष्ट्रीय स्मारकसाठी नियोजित उतुंग पुतळ्याची २५ फूट उंचीची तयार करण्यात आलेली नमुना प्रतिकृती सदोष ठरवून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तोच पुतळा पूर्णत्वाकडे नेण्याचा आणि लादण्याचा प्रयत्न कधीही खपवून घेतला जाणार नाही असाही इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे
मुंबई येथील फोर्ट भागातील समाजवादी पार्टीच्या संभाग्रहात समितीची बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेशमाने, दलित पँथरचे नेते सुरेश केदारे, जेष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने, ओबीसीचे नेते राजाराम पाटील, लोकशक्ती पार्टीचे नेते रवि गरुड, समाजवादी पार्टीचे महासचिव राहुल गायकवाड, काँग्रेस नेते गणेश कांबळे, मार्क्सवादी काम्युनिष्ट पक्षाचे कॉ. सुबोध मोरे, प्रजासत्ताक जनता परिषदेचे अध्यक्ष प्रबुद्ध साठे, रिपब्लिकन कामगार नेते रमेश जाधव, मुस्लिम ब्रिगेडचे नेते अफिफ दफेदार, ॲड. प्रफुल्ल सरोदे, प्रसेनजित कांबळे, सतिष डोंगरे, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत सोनवणे, पंकज चाळके, गौतम कांबळे, मिथुन कांबळे, विजय कांबळे, प्रकाश मेश्राम, संजय जगताप, विनोद ढोके, आबा मुळीक, अशोक पवार, सचिन गायकवाड, भिकाजी खैरनार, कुणाल लोंढे, सुधीर मकासरे, यांचेसह इतरही असंख्य प्रमुख कात्यकर्ते उपस्थित होते. याच प्रमुख विषयासाठी शुक्रवार दि. १४ रोजी पुढील बैठक पार पडणार असून त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांच्या भेटी बाबत सविस्तर चर्चा होऊन भेटीची तारीख निश्चित करण्यात येणार आहे असेही शेवटी गायकवाड यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या