स्वराज्यासाठी लाविली प्राणाची बाजी |
मानाचा मुजरा त्यांसी ते मालुसरे तान्हाजी -सूर्याजी ||
असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात सुवर्णाक्षराने ज्याची नोंद झाली आहे. त्या सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी मुंबईत एकता नगर सर्व्हिस रोड, ब्रिजवासी स्वीट समोर, न्यू लिंक रोड, महावीर नगर, कांदिवली पश्चिम, येथे ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ वा शौर्यदिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. भारतीय सैन्यदलात मराठा रेजिमेंट, भारतीय लष्कर, भारतीय नौदल व भारतीय वायुदल यामध्ये उच्च पदावर सशस्त्र कामगिरी केलेल्या निवृत्त सैन्याधिकाऱ्यांचा आणि पोलादपूर तालुक्यातील निवृत्त सैनिकांचा हृदय सत्कार करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध लेखिका वीरमाता अनुराधा गोरे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचे "छत्रपती शिवाजी महाराजांचे शूरवीर मावळे ते भारतमातेचे पराक्रमी सुपुत्र" या विषयावर व्याख्यान होणार आहे.
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा आजवरच्या बखरकारांना, इतिहासाच्या अभ्यासकांना, ललित लेखकांना, चित्रपट व नाट्य निर्माता दिग्दर्शकांना आणि अभिनय करणाऱ्या कलाकाराना सतत प्रेरणादायी ठरला आहे, देशातील अनेक जण या अद्वितीय पराक्रमी सामर्थ्यवान पुरुषोत्तमाचे चरित्र अभ्यासून भारावले गेले आहेत, आणि ह्या वीरपुरुषाचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर मांडले आहेत, यापुढेही ते मांडत राहाणार आहेत, कारण शिवचरित्र अखंड 'प्रेरणादायी' तर शिवरायांना जिवाभावाची साथ देणारे प्रसंगी बलिदान देणारे त्यांचे मावळे म्हणजे जगाच्या इतिहासात पहिल्यांदा 'गनिमी कावा' अवलंबणारे पराक्रमाचे आणि धाडसाचे एक एक सोनेरी पान ! छत्रपती शिवाजी राजांच्या चरणी आपली निष्ठा ठेवण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा एक रांगडा तरुण शिवरायांच्या पदरी सामील होतो काय अन त्यांच्याशी इतका समरस होतो काय, की स्वतःच्या मुलाचं लग्न काढलं असताना सिंहगड मोहिमेचा सांगावा आल्यानंतर हा धैर्याचा मेरुपर्वत काळासारखा धावून जातो अन वचनाच्या पूर्ततेसाठी मागे न हटता आपला अमोल देह स्वामीनिष्ठेचरणी अर्पण करीत धारातीर्थी पडतो काय.? आपले भारतीय सैन्य सुद्धा देशाचे संरक्षण करताना याच भावनेतून सीमेवर खडा पहारा देत असते. या कार्यक्रमाचे महत्व ओळखून मुंबईतील शिवप्रेमीसह नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक विजय मालुसरे (शाखाप्रमुख क्र. २०) आणि अनिल ज्ञानोबा मालुसरे (पोलादपूर तालुकाप्रमुख) यांनी केले आहे.
0 टिप्पण्या