मुंबई महानगरपालिकेत ‘मराठी भाषा गौरव दिन’आणि 'मराठी भाषा पंधरवडा' शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न*
‘केवळ कागदांवर किंवा कायदा केल्याने मराठी भाषा जगणार नाही. तसेच कोणतेही सरकारी सोपस्कार किंवा कायदा करून भाषेला जगवता येणार नाही. जोपर्यंत मराठी भाषा ही आपल्या जगण्याचा हिस्सा होणार नाही, तोपर्यंत ती जगणार नाही. मराठीला जगवण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी भाषिकाची आहे’, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले. ‘मुंबईकरांना शुद्ध पाण्यापासून अन्य अनेक नागरी सोयीसुविधा पुरवत बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांचे जीवन व्यापले आहे. या महानगरपालिकेशी माझे ऋणानुबंध आहेत’, अशी भावनाही कांबळे यांनी व्यक्त केली. कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा पंधरवडा’ शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका सभागृहात आज २७ फेब्रुवारी रोजी हा सोहळा संपन्न झाला.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांच्यासह विविध उप आयुक्त, संचालक तसेच विविध विभागांचे खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे व्याख्यानात म्हणाले की, कोणतीही भाषा ही माणूस किंवा समाज जन्माला घालत असतो. त्यामुळे, ती जगवण्याची जबाबदारीसुद्धा तो माणूस किंवा त्या समाजावरच असते. कायदा करून जशी भक्ती किंवा श्रद्धा जन्माला घालता येत नाही त्याचरितीने निव्वळ कायदा करून भाषाही जगवता येणार नाही. कोणतीही निर्मिती केली किंवा नवीन शोध लावला तर त्यासाठी शब्द जन्माला घालावे लागतात. मात्र, आपल्याकडे शब्दांची निर्मिती करण्याऐवजी प्रतिशब्द शोधण्यावर भर दिला जातो. अन्य भाषेच्या प्रभावाखाली मराठीच्या वेशीबाहेर कितीतरी बोलीभाषा वटवाघळासारख्या लोंबकळत आहेत. मराठीमध्ये लाखो शब्द आहेत. पण, बहुतेकांना जेमतेम एक टक्का शब्द अवगत असतात. त्या अल्पशा शब्दावलींमध्येच आयुष्यभर ती व्यक्ती लिहिते, विचार करते आणि जगतेही. त्यामुळे, प्रत्येकाने आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये अधिकाधिक मराठी शब्दांचा वापर करावा. चित्रपटांच्या गाण्यावर थिरकण्यापेक्षा कधीतरी संत जनाबाईंच्या ओवींवरही ठेका धरून पाहावा. त्यातून मिळणारा आनंद अद्वितीय असेल, असेही ते म्हणाले.
कांबळे पुढे म्हणाले, मातृभाषेच्या बाबतीत आपली भूमिका काय आहे, हे आधी आपण निश्चित करायला हवे. कुणीतरी चमत्कार करेल आणि मराठी जगेल, असे शक्य नाही. त्यामुळे, आपणच दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा आग्रह धरायला हवा. प्रशासनाने लोकाभिमुख मराठीचा वापर करावा. मराठीतील शब्द मारून इतर भाषेतील शब्द स्वीकारण्याचा अट्टाहास करू नये. आपण भाषेच्या बाबतीत सृजनशील असावे. जो भाषेला जगण्याचं, विचारांचं साधन बनवतो तो कधीच हरत नाही. त्यामुळे, मराठीप्रती आपुलकी जपावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमादरम्यान, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी म्हणाल्या की, प्रशासनातील टिपण्या १०० टक्के मराठी भाषेतच केल्या पाहिजेत. आपली मुले इंग्रजी शाळांमध्ये शिकत असली तरी पालकांनी घरामध्ये मराठीमध्येच संवाद साधला पाहिजे. दैनंदिन व्यवहारांमध्येही जाणीवपूर्वक मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. महिलांनी दिवाळीमध्ये कपडे खरेदी करण्यासोबतच दिवाळी अंकही खरेदी करुन मराठी भाषेचा गौरव वृद्धिंगत करावा, असे आवाहनदेखील त्यांनी याप्रसंगी केले.
उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांनी प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी. रवींद्र काळे यांनी सूत्रसंचालन केले. महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीच्या चमूने अत्यंत सुमधूर आणि प्रेरणादायी मराठी गौरव गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत आयोजित ‘एकपात्री अभिनय’ स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. शिवानी पेडणेकर (प्रथम), स्वाती शिवशरण (द्वितीय), केतन गायकवाड (तृतीय), फिलोमिना पाटोळे, निवेदिता भोबेकर (उत्तेजनार्थ) यांचा यात समावेश आहे. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या मराठी शब्दकोशाचेही वितरणदेखील यावेळी करण्यात आले. शासकीय कामकाजात नित्याने वापरात असलेले मराठी शब्द या शब्दकोशात समाविष्ट करण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या