मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई जिल्ह्याचे २४ वे तीन दिवसीय अधिवेशन अंधेरी मरोळ नाका येथे सुरू आहे. या अधिवेशनाचे उदघाटन डॉ. अशोक ढवळे यांनी केले. यावेळी शेतकरी नेते डॉ. अजित नवले, प्रा. किशोर ठेकेदत्त, डॉ. तापती मुखोपाध्याय, डॉ. एस. के. रेगे, शैलेंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनाचे उदघाटन करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते व पॉलिटब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे म्हणाले, आज महाराष्ट्र आणि देशात भाजप आणि संघाने जातीय व धर्मांध विष पेरले आहे. भाजप आणि संघाने लोकांमध्ये फूट निर्माण करून राज्यात सत्ता आणली आहे,.राज्यात 'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' अशा विकृत भावना पसरवून भाजपने मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण केली. तसेच दलित व मुस्लिम समाजात दहशत निर्माण केली. तसेच निवडणूक प्रक्रियेत भरपूर गोंधळ माजवून भाजपने महाराष्ट्रात सत्ता आणली अशी टीका डॉ. ढवळे यांनी केली.
फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा स्वीकार केल्यानंतर राज्यात जातीयवादी पडसाद पडले. त्यापैकी संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आणि परभणीत संविधानाचा अवमान प्रकरणातून घडलेल्या आंदोलनात पोलिसांनी दलित वस्तीमध्ये कोंबिंग ऑपरेशन करून लोकांना झोडपून काढले. पोलीस हत्याकांडात अतिमागास तरुण सोमनाथ सूर्यवंशी ठार झाला. दलितांवर होणारे अत्याचार किंवा राज्यात घडत असलेल्या राजकीय गुन्हेगारी घटना हा काही अपघात नाही, तर फडणवीस यांनी सत्तेचा ताबा घेताच या घटना घडत आहेत. यापूर्वीही फडणवीस सरकार असताना भिमा कोरेगाव प्रकरण घडलं. भिमा कोरेगाव घटनेत अनेक निरापराध कार्यकर्त्यांना जेल मध्ये टाकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातजावई विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनाही सोडलं नाही. म्हणून या जातीयवादी, धर्मांध व कॉर्पोरेटधार्जिण्या भाजप, संघ आणि मोदी-फडणवीस सरकारांच्या विरोधात आपल्याला सर्व डाव्या, लोकशाही व धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र करून कायम संघर्ष करून त्यांचा पराभव करावा लागेल, असे आवाहन डॉ. ढवळे यांनी केले.
0 टिप्पण्या