Top Post Ad

२८ फेब्रुवारीला पनवेल मध्ये डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोकण विभागीय पत्रकार अधिवेशन

संपूर्ण कोकण क्षेत्रातील मुंबई, ठाणे, पालघर, नवीमुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील पत्रकारांसाठी वर्षातून किमान एकदा तरी एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने पत्रकार सुरक्षा समिती रायगड नवीमुंबईच्या वतीने "कोकण विभागीय पत्रकार अधिवेशन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.  शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी पनवेल तालुक्यातील धामणी येथील जोशी फार्म येथे हे अधिवेशन संपन्न होणार आहे.  नेत्र विशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने  प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून, मुंबई मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष संदीप चव्हाण, दैनिक पुण्यनगरीचे संपादक शैलेंद्र शिर्के, दैनिक लोकसत्ताचे सहाय्यक संपादक विकास महाडिक आणि पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांची उपस्थिती लाभणार आहे. 

  लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून सर्वसामान्य जनता मोठी अपेक्षा ठेवून न्यायाच्या प्रतीक्षेत असते. आणि खऱ्या अर्थाने पत्रकार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना यांच्या चुका असतील तर दाखवून जनतेला न्याय मिळवून देतात. मात्र आज सर्वत्र विस्तारित झालेल्या मोठ्या शहरांमध्ये मात्र वेगळीच परिस्थिती पहायला मिळत आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे पत्रकारांपर्यंत पोहोचण्याअगोदर सोशल मीडियाचे माध्यम सोबत घेऊन स्वयंघोषित पत्रकार म्हणवून घेणाऱ्या सारथींच्या हाती पोहोचत असते. यातून प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पत्रकारांप्रमाणे विचारपूस करणे, कोणतेही बंधन नसल्यामुळे वादविवाद घालणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रच मुळात बदनाम होत असल्याचे दिसून येत आहे. यावर पत्रकारिता आणि पत्रकारांसमोरील आव्हाने नेमकी काय आहेत ? याबाबत विचार मंथन करण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती रायगड नवी मुंबईच्यावतीने संपूर्ण कोकणातील पत्रकारांसाठी जेष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शन तसेच थोर विचारवंत, वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे विचार समस्त पत्रकारांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याच्या भावनेतून कोकण विभागीय पत्रकार अधिवेशन २०२५ आयोजित करण्यात आले आहे. 

आज पत्रकारिता क्षेत्र काही तुरळक पत्रकारांमुळे बदनाम होत चालले आहे. त्यातच सोशल मीडियाचे सारथी या आपल्या हक्काच्या पत्रकारिता क्षेत्राला बदनाम करण्यात मागे नाहीत. स्वतःला स्वयंघोषित पत्रकार म्हणवून घेत मिरवतात. पण मग अनेक ठिकाणी आपण गेलो की हा त्यातलाच अशी विचारधारणा समोरच्या व्यक्तीची, अधिकाऱ्याची होणे, ही नित्याचीच बाब बनली असली तरी दोष त्या अधिकाऱ्यांचा नसावाही. पण या गंभीर बाबी घडताना आपण का रोखू शकत नाही? यासाठी एकत्र येऊन या विचारांची सांगड घालण्यासाठी आणि लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला आधार देण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरु करण्यात आले आहे. गेली ८ वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात या समितीचे कार्य अलौकिक असे आहे. आता पुन्हा नव्याने रायगड - नवीमुंबई कमिटी निर्माण झाली आहे. या माध्यमातून जनतेचे अनेक प्रश्न या संघटनेमार्फत हाताळले जात असून ते मार्गी देखील लावले जात आहेत. शेवटी प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, पत्रकारांच्या हक्काचे काय ? यावर आवाज कोण उठविणार ? यासाठीच पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने यावर विचारमंथन करण्यासाठी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर अधिवेशनामध्ये ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती, रोटेशन तोडून दिल्या जाणाऱ्या जाहिरातीवर निर्बंध टाकून तसें न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, राज्यातील युट्युब बातमीपत्र व बातम्यांसंदर्भातील पोर्टलला शासकीय मान्यता, राज्यातील अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी करून त्यांच्या पोर्टल तसेंच युट्युब चॅनेलचे रजिस्ट्रेशन करून त्यांना अधिस्वीकृती देणे, राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य योजना, विमा योजना, घरकुल योजना, राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट मिळावी, पत्रकारांवरील राग काढण्यासाठी हेतूपूरस्सर दाखल केलेल्या गंभीर गुन्ह्यांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी करणे, राज्यातील साप्ताहिक / दैनिक वृत्तपत्राच्या जेष्ठ व वयोवृद्ध संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन आदि विषयावर मंथन करण्यासाठी अधिवेशनामार्फत आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे रायगड - नवीमुंबई अध्यक्ष राज भंडारी यांनी केले आहे.

 शुक्रवार दिनांक  २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरु होणाऱ्या या अधिवेशनाला उपस्थितांकरिता सकाळी नाश्ता आणि चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली असून कार्यक्रमादरम्यान भोजन व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमात विचारवंतांचे विचार ऐकण्यासोबत मनोरंजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. हे सर्व करीत असताना पत्रकार मित्रांनी प्रमुख मार्गदर्शकांचे विचार ऐकून आपल्यासमोरील आव्हाने काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, यासाठी आम्ही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार आणि उपाध्यक्ष किरण बाथम यांच्या सहकार्याने हे पाऊल उचलू शकलो आहोत. माझी संपूर्ण कोकणातील पत्रकार बांधवांना विनंती असेल की, आपले स्थानिक पातळीवरील हेवेदावे बाजूला ठेवून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा आणि आपल्यासोबत अधिकाधिक पत्रकारांना याची कल्पना द्या.- राज भंडारी, अध्यक्ष, पत्रकार सुरक्षा समिती रायगड - नवीमुंबई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com