- बृहन्मुंबई महानगरपालिकेत गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ पासून ‘मराठी भाषा गौरव दिन’आणि 'मराठी भाषा पंधरवडा' शुभारंभ.
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती
कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे दरवर्षी ‘मराठी भाषा गौरव दिन आणि पंधरवडा’आयोजित करण्यात येतो. यंदा देखील गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिन व मराठी भाषा पंधरवडा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे दुपारी ३ वाजता महानगरपालिका सभागृहात व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी असतील.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या ठरावानुसार थोर साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सन २०१० पासून ‘मराठी भाषा पंधरवडा’साजरा करण्यात येतो. प्रतिवर्षी दिनांक २७ फेब्रुवारी ते दिनांक १३ मार्चपर्यंत महानगरपालिकेमार्फत विविध कार्यक्रम घेण्यात येतात. महानगरपालिकेच्या सर्व खात्यातील कामकाजाची भाषा मराठी असण्यासह मराठी भाषेचा १०० टक्के वापर व्हावा, यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत असते. तसेच दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी साहित्यातील अभ्यासक, विचारवंत, ज्येष्ठ लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, कादंबरीकार आदींचे महानगरपालिकेकडून व्याख्यान आयोजित केले जाते. यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक श्री. उत्तम कांबळे यांचे गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महानगरपालिका सभागृहात व्याख्यान आयोजित केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार आणि उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषेच्या संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने विविधस्तरिय उपक्रम राबवित असते.
‘एकपात्री अभिनय’स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कर्मचाऱ्यांचा गौरव- मराठी भाषेचा प्रसार अणि प्रचार व्हावा यासाठी महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्यावतीने दरवर्षी भित्तिपत्रके प्रकाशित केली जातात. ही भित्तिपत्रके महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये, शाळांमध्ये प्रदर्शित केली जातात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ‘एकपात्री अभिनय’ स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कर्मचाऱ्यांचा गौरव देखील गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी रोजी आयोजित सोहळ्यात करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या मराठी शब्दकोशाचेही प्रकाशन यानिमित्ताने करण्यात येणार आहे. शासकीय कामकाजात नित्याने वापरात असलेले मराठी शब्द या शब्दकोशात घेण्यात आले आहेत.
मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यास दिग्गजांची उपस्थिती- महानगरपालिकेने सन २०१० मध्ये आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यात कवी प्रवीण दवणे, श्रीमती विजया वाड, सन २०११ मध्ये कवी अशोक नायगावकर, सन २०१२ मध्ये साहित्यिक व माजी कुलगुरू डॉ. यू. म. पठाण, सन २०१३ मध्ये लेखक अरुण साधू, सन २०१४ मध्ये कवयित्री श्रीमती नीरजा, सन २०१५ मध्ये संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. यशवंत पाठक, सन २०१६ मध्ये लेखक शिरीष कणेकर, सन २०१७ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष गंगाराम गवाणकर, सन २०१८ मध्ये अभिनेता प्रशांत दामले, सन २०१९ मध्ये समीक्षक द्वारकानाथ संझगिरी, सन २०२० मध्ये कवी किशोर कदम उर्फ सौमित्र, सन २०२२ मध्ये दिग्दर्शक जब्बार पटेल, सन २०२३ मध्ये ज्येष्ठ साहित्य समंलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे, सन २०२४ मध्ये साहित्य समंलनाचे तत्कालीन अध्यक्ष रवींद्र शोभणे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे.
0 टिप्पण्या