मुंबईतील शासकीय वसाहत वांद्रे येथील प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र, त्रिरत्न बुद्ध विहाराचे वांद्र्यातच पुनर्वसन व्हावे, या प्रमुख मागणीसाठी त्रिरत्न बुद्धविहार बचाव समितीच्या नेतत्वाखाली येथील बौद्ध बांधवांनी शुक्रवारी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. दरम्यान, संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उपनगर जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याचे मोर्चाच्या शिष्टमंडळाचे सांगितले.
वांद्रे ( पूर्व ) शासकीय वसाहतीत गेल्या ६० वर्षापासून प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र, त्रिरत्न बुद्ध विहार कार्यरत आहे. येथील प्रशस्त सभागृह, शासनमान्य नालंदा सार्वजनिक ग्रंथालय, अभ्यासिका, महिलांसाठी शासन योजनेत सुरू असलेले उपक्रम सर्व धर्मियांसाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे उपनगरातील हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, येथील नियोजित न्यायालयाच्या इमारत बांधकामासाठी ही वास्तू इतरत हलविण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून बौद्ध धर्मीयांमध्ये नाराजी आहे.
त्यामुळे त्रिरत्न बुद्धविहार बचाव समितीच्या नेतत्वाखाली येथील बौद्ध बांधवांनी शुक्रवारी ( दि. २८ ) उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत शासनाचे आपल्या मागणीकडे लक्ष वेधले. वांद्रे शासकीय वसाहतीतच प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र, त्रिरत्न बुद्ध विहाराचे पुनर्वसन व्हावे, येथील नागरी राहत्या वस्त्यांचे सुद्धा येथेच पुनर्वसन व्हावे अशा प्रमुख मागणीचे निवेदन माजी वरिष्ठ शासकीय अधिकारी सुरेश गायकवाड, दामोदर गायकवाड, माजी नगरसेवक अनिल त्रिंबककर आणि रोहिणी कांबळे, किसन रोकडे, आनंद कांबळे, विजय जाधव, एस. बी. जाधव,जयवंत सावरकर, नागेश तांबे, रमेश बैले, बाळा वाघमारे, सुमित वांजळे, राजेश जेकटे, प्रकाश जाधव आदी मान्यवरांच्या शिष्टमंडळाने उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची भेट देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी बौद्ध महासभा,महिला आघाडी पंचायत समिती, विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मत्रालय विधिमंडळ, महानगरपालिका तसेच अन्य शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे त्रिरत्न बुद्धविहार, प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र हे धार्मिक स्थळ आहे. तसेच शासनाच्या उपक्रमात सुद्धा त्याचा मोठा हातभार राहतो. त्यामुळे या केंद्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच सर्व विभागाची संयुक्त बैठक घेत सकारात्मक निर्णयासाठी शासन स्तरावर विचार केला जाईल असे आश्वासन उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी मोर्चेकरांना दिले असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
0 टिप्पण्या