मुंबईतील वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीमध्ये उच्च न्यायालयाच्या उभारणीसाठी बांधकामे हटविण्यात येत आहेत. या ठिकाणी त्रिरत्न बुध्द विहार असून या विहाराच्या बचावासाठी स्थानिक रहिवाशी आक्रमक झाले आहेत. बुध्द विहारासाठी शासकीय वसाहतीमध्येच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी येत्या २८ फेब्रुवारी रोजी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. बुध्द विहार बचावासाठी त्रिरत्न बुध्द विहार बचाव कृती समितीने वांद्रे पूर्व,शास्त्रीनगर येथील कुशिनारा बुद्ध विहार येथे स्थानिक बौद्ध समाज बांधव व हितचिंतक यांची एक बैठक आयोजित केली. या बैठकीचे अध्यक्षस्थान एस. बी. जाधव यांनी भूषविले. यावेळी प्रज्ञा सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी शासकीय वसाहतीमधील त्रिरत्न बुध्द विहार वाचविण्याबाबत भूमिका मांडली.
ते म्हणाले की, समता सेवा संघ गृहनिर्माण सोसायटीच्या झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात शासनाने नोटीस बजावली आहे. मात्र अद्याप त्रिरत्न बुद्ध विहारास कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. या संदर्भात वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करण्याचे कार्य सुरू असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. तसेच समाज बांधवांनी त्रिरत्न बुध्द विहार बचावासाठी एकत्र येऊन लढा उभाण्याचे आवाहन केले. या बैठकीमध्ये त्रिरत्न बुद्ध विहार बचाव कृती समिती सह प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत दामोदर गायकवाड, आनंद कांबळे, विजय जाधव, किसन रोकडे, रमेश बैले ,काका मोरे तांबे एल. आर.गोडबोले, चंद्रशेखर सकपाळ सुमित वजाळे यांनी आपले मत मांडले. या बैठकीला वांद्रे विभागातील विविध राजकीय पक्षाचे तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या