मी इतिहासाचा अभ्यास करताना, मला मोडी भाषेतील एक कागद मिळाला आणि त्याचे मराठीतील भाषांतरही मिळाले, त्या कागदात तत्कालीन तासगाव तालुक्यातील आणि आजच्या मिरज कळंबी येथील शिदनाक आणि त्यांच्या वारसांनी सातारचे शाहू महाराज आणि पेशवे यांच्या सैन्यात कामगिरी केल्याबाबतचा एक धागा मिळाला, त्यानंतर मी अनेक दिवस याचा शोध घेत होतो. शेवटी मला शिदनाक यांनी पानिपतच्या लढाईत शौर्य गाजवले, त्यांना वीरमरण आले, याचा उल्लेख असणारी काही कागदपत्रे मिळाली. स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम केलेल्या काळनाक उर्फ शिदनाक-पहिला यांना छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र सातारचे छत्रपती शाहूंनी १७३९ मध्ये कळंबी गाव इनाम दिला होता. त्याचे वडील खंडनाक हेही शूर होते. ते मिरजच्या एका लढाईत धारातीर्थी पडल्यावर, त्याचा मुलगा काळनाक उर्फ शिदनाक यास कळंबी गाव सरंजामाच्या खर्चासाठी इनाम म्हणून लावून दिला. हा काळनाक उर्फ शिदनाक पित्याप्रमाणे शूर होता, त्यांनी मोठी कामगिरी केली. त्यांच्या पराक्रमाची तेव्हा सगळ्या मुलखात चर्चा होती. ते मोठी फौज बाळगून होते. त्यांनी १७३९ ते १७६१ पर्यंत मराठी सत्तेच्या रक्षणासाठी जिवाचे रान केले. तलवार गाजवली.
मला त्यांच्या पराक्रमी मोहिमेचे अनेक कागद मिळाले आहेत. त्यांनी छत्रपती शाहूंच्या वतीने आणि पुढे पेशवे, पटवर्धन सरदार यांच्या वतीने अनेक लढायांत सहभाग घेतलेला आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले, स्वराज्य राखण्यात खंडनाक पहिला, काळनाक उर्फ शिदनाक पहिला, राजनाक पहिला, खंडनाक दुसरा, अशा सलग चार पिढ्यांनी कामगिरी बजावली. लढाईत शिदनाक यांचा सहभाग होताच, पण उदाजी चव्हाण यांच्यासारख्यांचे बंड मोडण्याची जबाबदारी सातारच्या छत्रपतींनी काळनाक उर्फ शिदनाक यांच्यावर सोपवली होती. तेव्हा उदाजी यांचे बंड मोडीत काढत शिदनाक यांनी सातारच्या छत्रपतींची जाहीर शाबासकी मिळवल्याचे कागद आहेत. १७५३ सालच्या पत्रातून या गोष्टी समजतात. पानिपतच्या लढाईला इतिहासात खूप महत्त्व आहे. पानिपतच्या लढाईचे विस्मरण होणे शक्य नाही. या लढाईत झालेल्या पराभवाची आजही चर्चा होते, पण पराभवाची चर्चा करण्यापेक्षा त्या लढाईत काळनाक उर्फ शिदनाक यांच्यासारखे, वीर जिवावर उदार होऊन लढले आहेत. महार समाजातील एका पराक्रमी शूरवीराने स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी एवढ्या दूर जाऊन जो पराक्रम केला, त्याच्या बहादुरीची चर्चा आपण करण्याची गरज आहे. इतिहासातील या अतिशय मोठ्या त्यागाची नोंद इतिहासाने घेतलेली नाही, याची खंत आहे.
सन १७६१ मधील पानिपतच्या घनघोर युद्धात शिदनाक-पहिला, याने आपल्या सैन्यासह सहभाग घेतला होता. लढताना त्याना वीरमरण आल्यानंतर त्याच्याबरोबरच्या सैनिकांनी, त्याचे दहन तिकडेच केले. पण, त्याचे चिलखत व शस्त्रे सैनिकांनी कळंबी गावी परत आणले. आजही त्याचे अवशेष कळंबीतील शिदनाकाच्या वंशजांच्या घरात पहायला मिळतात. शिदनाक-पहिले मरण पावल्यानंतर कळंबी गाव त्यांचे सुपुत्र राजनाक यांच्याकडे इनाम म्हणून पूर्ववत दिले. राजनाकसुद्धा पराक्रमी होते. सांगली-मिरजेचे पटवर्धन यांच्या बरोबर त्यांनी दक्षिण भारतातील हैदर आणि टिपूविरोधातील मोहिमांत भाग घेतला. इतिहासात गाजलेल्या सुप्रसिद्ध खर्ड्याच्या लढाईतही राजनाकने पराक्रम गाजवला. राजनाक यांचा मुलगा खंडनाक सुद्धा योद्धा होते. चिंतामणराव पटवर्धन यांच्याबरोबरीने त्यांनी काही युद्धात सहभाग घेतला. एकंदरीत कळंबी येथील या घराने रणभूमीवर शौर्य गाजवण्याचा वारसा जपला. पण या घराची इतिहासात नोंद घेतलेली नाही. पहिला शिदनाक यांचा पानिपतच्या लढाईतील पराक्रम, तर अंधारात होता, एवढा झुंजार योद्धा पण अप्रकाशित राहिला.’
- मानसिंगराव कुमठेकर
सातारा येथील इतिहासाचे प्राध्यापक गौतम काटकर हा एक गोष्टीवेल्हाळ माणूस आहे. व्यासंगी असलेल्या या माणसाकडे इतिहासातील अनेक गोष्टीचा खजिना आहे. नवं नवं सांगत राहणं, हा त्यांचा छंद आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी पानिपतच्या लढाईबाबत बोलत असताना, त्यांनी एक गोष्ट ऐकवली. म्हणाले, ‘मिरजजवळील कळंबी गावचे शिदनाक सरदार पानिपतच्या लढाईत होते, त्यांनी या लढाईत मोठा पराक्रम केलाय, त्यांना पानिपतच्या लढाईत वीरमरण आलं आहे, पण त्या अनाम शिदनाक विराची नोंद इतिहासात नाही. हा सगळा इतिहास मिरजेच्या मानसिंग कुमठेकर या तरुण इतिहासप्रेमीने हुडकून काढला आहे.’ काटकर यांच्याकडून ही कोठेही न ऐकलेली, वाचलेली माहिती मिळाल्यावर, ही माहिती शोधणाऱ्या मानसिंग कुमठेकर यांना भेटायला गेलो. मानसिंग.. इतिहासाची प्रचंड आवड असणारा तरुण. विद्यार्थी असताना जी इतिहासाची गोडी लागली, ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. इतिहासात रमणाऱ्या या माणसाकडे अगदी शिवकालीन इतिहासापासून ते पत्रीसरकारच्या इतिहासातील अनेक गोष्टी आहेत. अनेक फोटो आणि कागदपत्रे या तरुणाने मिळवली आहेत. त्यांच्याकडून कळंबी येथील वीर शिदनाक यांच्या पानिपतच्या युद्धातील शौर्यगाथा ऐकायला आलो.
पानिपतच्या लढाईत वीरमरण आलेल्या पहिला शिदनाक यांच्याबाबतची माहिती जेव्हा मानसिंगराव कुमठेकर यांना पारसनीसाच्या डायरीत मिळाल्यानंतर, त्यांनी या वीराच्या पराक्रमाची गाथा शोधून काढण्याचा ध्यासच घेतला. ते अनेक ठिकाणी फिरले, एका कागदाची प्रत मिळवायला, दहा-दहा वेळा गेले. त्यांना हा इतिहास शोधायचा होता. सलग दोन वर्षे भटकंती केल्यावर अनेक गोष्टी त्यांना लक्षात आल्या, व त्यांनी केलेले संशोधन मांडले. या काळात त्यांनी जवळजवळ दोनशेच्या वर कागदपत्रे जमा केली आहेत. या कागदपत्रांच्या माध्यमातून त्यांनी एक अनाम योद्धा उजेडात आणला आहे. पहिला शिदनाक यांच्या घराण्याचा लढण्याचा आणि नेतृत्व करण्याचा वारसा बराच काळ टिकून राहिला. पण त्याही अगोदरपासून हे लढणारं घराणं असावं, असं कुमठेकर यांना वाटते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा पत्रव्यवहार करून या ‘कळंबी’च्या शिदनाक घराण्यांचे कौतुक केले होते. पण या वतनदारांची परिषद घेण्याबाबतही पत्रात उल्लेख केला आहे. बाबासाहेबांचे पत्र या घराण्यातील अलीकडचे वारसदार प्रमोद इनामदार यांच्याकडे आहेत. स्वराज्याच्या रक्षणासाठी लढलेले शिदनाक घराणे नंतरच्या काळातही सामाजिक व राजकीय चळवळीत आघाडीवर राहिले आहे. बाबासाहेबांच्या समतेच्या चळवळीत याच घरातील शिदनाक यांचे वंशज दादासाहेब इनामदार यांचा अग्रभागी सहभाग होता. माणगाव परिषदेच्या स्वागत समितीत त्यांचा समावेश होता. एवढंच नाही, तर ‘बहिष्कृत भारत’मध्ये दादासाहेब यांनी लेखही लिहिले आहेत. पण गौरवाची गोष्ट म्हणजे या घराण्यातील महिलाही त्या काळात लिखाण करत होत्या. कलावतीबाई इनामदार यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर लिहिलेला एक लेखही सापडला आहे. युद्धभूमीपासून ते शिक्षण, साहित्य, राजकारण या क्षेत्रांत शिदनाक घराणे आघाडीवर राहिले आहे. या घराण्याची एक वेगळी ओळख छत्रपती शाहू राजे यांच्या काळापासून आजपर्यंत टिकून आहे.
पानिपतमध्ये वीरमरण आलेल्या शिदनाक यांचा इतिहास अंधारात होता, पण आता मानसिंगरावसारख्या इतिहासवेड्याने रात्रीचा दिवस करून या घराण्याचा इतिहास उजेडात आणल्यामुळे या घराण्याची नवी ओळख समोर आलीय. मानसिंगराव म्हणतात, ‘मला जेवढं शक्य होत तेवढं मी शोधलं आहे, पण अगोदरच्या काळातही या शिदनाक यांचा लढाईत सहभाग असावा, तो मी शोधतोय. माझ्या हातात जी अस्सल कागदपत्रे आली, त्यावरून मी एक शूरवीर हुडकला आहे, पण अजूनही या पराक्रमी घराण्याची मुळे शोधून काढण्याचे काम भावी पिढ्यांनी करायला पाहिजे. पानिपतच्या लढाईतील या घराण्यांचे योगदान हा विषय, आता तरुण अभ्यासक आणि वक्त्यांनी सांगण्याची गरज आहे. इतिहास लेखनातील दुजाभावामुळे शिदनाक घराणे झाकोळून गेले होते. आता त्यांचा समग्र इतिहास शोधण्यासाठी अभ्यासकांनी पुढं यावं. पानिपतमधल्या शिदनाक यांची कामगिरी उजेडात, आल्यानंतर दरवर्षी १४ जानेवारी या पानिपत लढाईच्या दिवशी त्याना मानवंदना देण्यासाठी लोक त्यांच्या स्मृतिस्थळाजवळ लोक येतात. एका शूरवीराच्या गावातील माती भाळी लावतात. प्रेरणा घेतात.ज्यांना माहिती आहे ते येतात पण अजूनही विद्यापीठातील इतिहासतज्ज्ञांची पाऊले इकडे पडलेली नाहीत. ते कधी इकडे येतील आणि शिदनाकाचा उपेक्षित इतिहास अभ्यासक्रमात येईल, त्याच दिवशी या दलित शूरवीराच्या कामगिरीला न्याय मिळेल. मानसिंग कुमठेकरसारखे लोक त्या दिवसाची वाट पाहत आहेत.
- - संपत मोरे
- sampatmore21@gmail. com
- संपर्क : ९४२२७४२९२५
0 टिप्पण्या