Top Post Ad

नव्वद विरुद्ध दहा

अलीकडे नव्वद विरुद्ध दहा असे खूप बोलले जाते. देशातील सत्ता, संपत्ती, संधी यावर दहा टक्के लोकांची मालकी झालीय. नव्वद टक्के बहुसंख्यांक या निर्णयप्रक्रियेच्या बाहेर आहेत. हे नव्वद टक्के म्हणजे दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, खुले गरीब व महिला. उरलेले दहा टक्के. अशी ती मांडणी असते.   मांडणी जीवश्च आहे. निदानदेईची ताकद ठेवते. भावणारी आहे. गोळीबंद येते. खळाळून हलवते. पण ती कधीकधी येते. कधीकधीच येते. तिही वरुन येते. खालून येत नाही. लोकांतून उठत नाही. प्रसंगोत्पात ठरते. मग आली कशी व गेली कशी .. असे होत असते. असेच होत असते. मांडणीचे बळ लक्षात यायला हवे. ती सत्ता देऊ शकते. हिंदुत्वाच्या भावनिकतेला पर्याय ठरु शकते. हमखासचा साठा तीत आहे. आर्थिक-सामाजिक संतुलनही आहे. ती प्रासंगिक नाही. देशगरज आहे. ती लोकांची कशी होईल हे कौशल्यात घ्यावे.  

       याअर्थाने विरोधकांत ध्येयनिश्चितीचा अभाव दिसतो. ते खरे दुखणे आहे. दुसरीकडे भाजपने ध्येय स्पष्ट ठेवलेय. त्यावर कष्ट घेतलेय. त्यांना बहुसंख्यांकवादातून सत्ता घ्यायचीय. त्याला हिंदुत्व आधार केलाय. हिंदू जनसंख्या लक्ष्य केली. मुस्लिम कार्ड वापरून ती आक्रमक केली. खुला वर्ग व श्रीमंतांची साथ घेतली. अशी 'व्होट बॅंक' ते पक्की करत गेले. यासाठी १५०० कामगार कायदे रद्द केले. जे कामगार, कोळसा, खनन, समाज कल्याण शी संबंधित होते. त्याऐवजी मालकधार्जिणे कायदे आणले. सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण केले. बऱ्याच पूरक कृती केल्या. शिवाय धार्मिक जागरणाची लाट आणली.हे करीत असतांना हेही केले. ओबीसी एक होणार नाहीत. दलित आपसात भांडत रहावे. आदिवासी हिंदू आहेत. अल्पसंख्याकांनी नमत्यात घ्यावे. हे सारे योजन प्रयोजन कौशल्यपपूर्वक केले. या सर्व समूहातील लाभार्थी, राजकीय लाभार्थी वाढवित गेले. शिवाय हिंदू सत्ता अशी वेगळी भलावण तयार केली.यात पोटापाण्याचे प्रश्न सताड उघडे पडले. अनाथ झाले.

         एक लक्षात घ्यावे. राजकारण केवळ पदे व निवडणुका एव्हढेच नसते. या देशात तरी ती मानसिक प्रक्रिया आहे. बरेच गुंतागुंतीचे आहे. ते ब्राह्मणांपासून शिकावे. ते राजकारण करतात पण पथ्येही पाळतात. आपली 'ब्राम्हण' ही ओळख ठळक होऊ देत नाहीत. आपल्या उन्नतीचे गुणगान सार्वजनिक मांडत नाहीत. ते एकच जपतात. सरसकट हिंदू म्हणून ओळख कशी राहील, एव्हढेच. अर्थात ब्राह्मण म्हणून नव्हे ! हिंदू ओळखीत ब्राह्मण वेगळा दिसणार नाही वा भासणार नाही याची काळजी घेतात. ते खरे दक्ष आहेत. यासाठी ब्राह्मणांचा खरा देव 'परशुराम' याचा सार्वजनिक उल्लेख सुध्दा करीत नाहीत. तो देव चर्चेत येऊच देत नाहीत. तेव्हाच 'श्रीराम' 'जय श्रीराम' ते यशस्वी करू शकले. आज ती मानसिक गुंतवणूक यशस्वीतेच्या उच्चांकावर आहे.

अर्थात प्रयत्न असतो ब्राह्मण ओळख हिंदूत विसर्जित व्हावी. त्याचवेळी दलित, ओबीसी ओळख निर्माण होणार नाही. ती हिंदूही राहील शिवाय तिव्रतेने आपापल्या जात पोटजातीची होईल असे प्रयत्न असतात. असे हे कुटत्व आहे. याचमुळे जात, पोटजात मेळावे थाटात होतात. जात, पोटजात याला अशी नवी पालवी येत आहे. जातपुरुषांचे देव्हारे सजत आहेत. असे असले तरी सरळ लढत उभी करावी लागेल. ती धग 'नव्वद विरुद्ध दहा' या गोळीबंदतेत आहे. या बंदतेत कालची उध्वस्तता व आजची चाणाक्षता याची साद आहे. 'आम्ही भारताचे लोक' हा कोरस आहे. मुद्दा एव्हढाच की तो 'अजेंडा' व्हावा. केवळ भाषणाचा विषय ठरु नये. सत्तेचा नवा जयघोष ठरावा. कारण हा केवळ विषय नाही. ती प्रसूती आहे. योजित नव्या बंदिवासाला खुले आव्हान ठरणारे आहे.   भारतीय राजकारणात मानसिक जडणघडण वा मानसिकता याला महत्वाचे स्थान न देणे ही फार मोठी चूक ठरली. संघाचा कडक विरोध करणारा जेंव्हा स्वतः कट्टर हिंदू असतो तेव्हा संघाचे काही बिघडत नाही.  त्याचे कट्टरत्व हे संघाचे यश असते. ते अदृश्यतेत असते. यात मोकळा श्वास हा लढतीला जगण्याच्या प्रश्नाकडे नेणे हा उरतो. ती साध्यता नव्वद विरुद्ध दहा यात आहे. लढतीला आपल्या धावपट्टीवर आणणे हे केंव्हाही हिताचे आहे.

         जीवनाचे, जगण्याचे अफाट प्रश्न निर्माण होणे ही नवी संधी ठरावी. तीच नव्वद विरुद्ध दहाची खरी ताकद आहे. सर्व काळ सर्व माणसांना फसविणे हे कोणालाही शक्य नाही हे आहेच. यावर केवळ प्रतिक्रिया देऊन होत नाही. ती कितीही चांगली असूदे. चुका सांगून भागत नाही. चांगल्या भाषणांचेही असेच. अखेर ते प्रासंगिक ठरतात. किंचित समाधानाचे निदान कामाचे नसते. योग्य पर्याय द्यावाच द्यावा. तो लोकमुखी यावा. लोकांचा व्हावा. ते ध्येय ठरावे. तोच अजेंडा. तेच चिंतनबिंदू. तात्कालिकतेतील रममाणता कामाची नसते.   अजून वेळ गेलेली नाही. एरवी सारे हातून निसटायचे. पण अद्याप तसे झाले नाही. वेळ आहे. पुरकताही आहे. दु:खाचे सावट वाढत चाललेच चालले. याला ही नव्वदची नवारी नवी उभारी देईल. आधी ८५ व १५ ऐकत होतो.ते तसेच विरले. आता हा नव्वदचा धक्का. एका राष्ट्रीय पक्षाकडून येतोय. त्याचे वरचे नेते वारंवार सांगतात. म्हणून महत्व आलंय. त्यात सातत्य यावं. ध्येयनिश्चिती यावी. एव्हढंच.

अन्यथा .. 
अजीब दास्तां है ये कहां शुरु कहां खतम 
ये मंजिले है कौनसी ना वो समझ सके ना हम .. ! 
.. असे होऊ नये.

 रणजित मेश्राम 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com