नवी दिल्ली येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथनगरीतील ९४ क्रमांकाच्या स्टॉलवर होणारी दर्दी साहित्यरसिकांची गर्दी लक्षवेधी ठरली. पत्रकार संघाने महाराष्ट्राबाहेर प्रथमच सदस्य पत्रकारांच्या पुस्तकांचे प्रदर्शन या खास स्टॉलवर आयोजित केले होते. एका प्रकारे गेल्या कित्येक वर्षातील विविध क्षेत्रांतील स्पंदने टिपणारे हे सामाजिक-सांस्कृतिक संचित, दस्तावेजीकरणच येथे पत्रकार संघाच्या पुढाकाराने साहित्य संमेलनात मांडण्यात आले, अशी प्रशंसा या स्टॉलला भेट देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, सरहद चे संजय नाहर, दर महिन्याला आवर्जून पुस्तकांची खरेदी करणारे नांदेडचे माजी आमदार गंगाधर पटणे, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, प्रवीण बर्दापूरकर, जयदेव डोळे, भाऊ तोरसेकर यांच्यासह अनेक नामवंतांनी केली. पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, या स्टॉलचे नियोजन आस्थेने सांभाळणारे अंतर्गत हिशोब तपासनीस हेमंत सामंत आणि सदस्य राजेंद्र साळसकर यांनी स्टॉलला सदिच्छा भेट देणाऱ्या नामवंतांचे स्वागत केले. या वेळी पाहुण्यांना पत्रकार संघाकडून पसायदान कोरलेली काष्ठपत्रांची मालिका भेट देण्यात आली.
0 टिप्पण्या