*मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे प्रगतिपथावर आहेत. शहर विभाग, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे कार्यक्षेत्रात काँक्रिटीकरण कामांना चालना मिळाली आहे. पूर्व उपनगरे विभागात सुरू असलेल्या काँक्रिटीकरण अंतर्गत रस्त्याच्या पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट (PQC) कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी काल (दिनांक १८ फेब्रुवारी २०२५) रात्री पाहणी केली. मुंबई स्थित भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (IIT) प्राध्यापक, रेडिमिक्स काँक्रिट (RMC) प्रकल्पाचे अभियंते, गुणवत्ता व्यवस्थापन व संनियंत्रण संस्थेचे (QMA) प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत श्री. बांगर यांनी कामकाजाचा आढावा घेतला. तसेच आवश्यक ते निर्देश दिले.
मुंबई महानगरातील सुमारे १ हजार ३३३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण दोन टप्प्यात सुरू आहे. यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने पूर्ण झालीच पाहिजेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले आहेत. या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर हे काँक्रिटीकरण कामांची आकस्मिक पाहणी करत आहेत.
पूर्व उपनगरातील एम पूर्व विभागात आगरवाडी गावठाण मार्ग, कै. सरदार गुरूबच्चन सिंह बल मार्ग येथील काँक्रिटीकरणाची श्री. बांगर यांनी काल (दिनांक १८ फेब्रुवारी २०२५) रात्री पाहणी केली. प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) श्री. गिरीश निकम, उप प्रमुख अभियंता (पूर्व उपनगरे) श्री. संजय सोनवणे यांच्यासह भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी) प्रा. सोलोमन, प्रा.वेदगिरी, गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.सिमेंट काँक्रिटचे चौकोनी तुकडे (क्यूब), रेडिमिक्स काँक्रिटच्या पावत्या आणि तांत्रिक अहवाल यांची यावेळी तपासणी करण्यात आली. काँक्रिटचे तापमान, स्लम्प चाचणी, फ्लेक्यजूरल बीम सॅम्पल कास्टिंग आदी तांत्रिक चाचण्याही यावेळी करण्यात आल्या.
कॉंक्रिटीकरण प्रकल्प ठिकाणी येणाऱ्या विविध आव्हानात्मक विषयांच्या अनुषंगाने यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. पुढील टप्प्यातील सिमेंट कॉंक्रिटीकरण कामांमध्ये अधिक काळजी घेण्याच्या अनुषंगानेही सूचना देण्यात आल्या. काँक्रिटीकरण सुरू असताना घ्यावयाच्या चाचण्या, प्रत्यक्ष हवामानातील बदल आणि तापमानानुसार प्रत्यक्षस्थळी करावयाच्या उपाययोजना याबाबतची माहिती व सूचना यावेळी करण्यात आल्या.
काँक्रिटीकरण झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना, आठ ते बारा तासांमध्ये काँक्रिट ग्रुव्ह कटिंगची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, कॉंक्रिटीकरण सुरु असताना हवेतील आर्द्रता व वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग याचा अभ्यास करण्यासाठी मोबाईल ॲपचा सुयोग्य वापर करावा अशा विविध सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त(प्रकल्प) श्री. बांगर यांनी केल्या. काँक्रिट क्यूरींग पद्धतीमध्ये कशा पद्धतीने सुधारणा करता येईल, पृष्ठभागावरील ब्रूमिंग कशाप्रकारे करावे यासह प्रत्यक्ष कार्यस्थळी येणाऱ्या अडचणी, आव्हाने यासाठी 'आयआयटी'ने महानगरपालिका अभियंते, कंत्राटदार, गुणवत्ता व्यवस्थापन व संनियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करावी,अशी सूचनादेखील श्री. बांगर यांनी केली
0 टिप्पण्या