पहचान' या संस्थेने मुंबईतील ५० बेघर नागरिकांची निवड केली आणि त्यांना कॅमेरे देऊन, त्यांच्या दृष्टिकोनातून मुंबईची छायाचित्रे टिपण्याची संधी दिली. या ५० जणांनी मिळून टिपलेल्या एकूण १ हजार १०७ छायाचित्रांपैकी निवडक सुमारे ४० छायाचित्रांचे प्रदर्शन बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाजवळ स्थित मुंबई प्रेस क्लब येथे भरविण्यात आले आहे. या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशास. भूषण गगराणी यांच्या हस्ते आज (दिनांक १२ फेब्रुवारी २०२५) करण्यात आले. बेघर निवारा राज्य संनियंत्रण समितीचे अध्यक्ष उज्वल उके, माहिती अधिकार कार्यकर्ते. अनिल गलगली, ज्येष्ठ छायाचित्रकार. प्रशांत नाकवे, 'पहचान' संस्थेचे ब्रिजेश आर्य, सार्थक बॅनर्जीपुरी, सुभाष रोकडे आदी यावेळी उपस्थित होते.
परिस्थितीमुळे जे स्वत: बेघर आहेत, अशांनी मुंबईची टिपलेली छायाचित्रे अचंबित करणारी आहेत. समाजात दुर्लक्षित बेघरांच्या नजरेतून मुंबईचे ख-या अर्थाने दर्शन होते, असे गौरवोद्गार यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक. भूषण गगराणी यांनी काढले. गगराणी पुढे म्हणाले की, बेघर नागरिकांच्या जीवनातील अनुभव आणि त्यांच्या दृष्टिकोनातून मुंबईचे विविध पैलू या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून समोर आले आहेत. ही संकल्पना खरोखर अभिनव आहे. त्यामुळे मुंबई शहराच्या सामाजिक वास्तवाचे दर्शन घडले आहे. समाजाकडून दुर्लक्षित घटकांची कला समाजासमोर आणून, त्याद्वारे समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी 'पहचान' संस्थेने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मुंबईतील बेघर नागरिकांना निवारा मिळावा, त्यांना मूलभूत नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका सदैव कार्यरत आहे, असेदेखील गगराणी यांनी नमूद केले.
0 टिप्पण्या