Top Post Ad

सुरेश धस यांच्यावर तत्काळ ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा

सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ परभणी ते मुंबईपर्यंत लॉन्ग मार्च काढण्यात आला होता. शासनाच्या दडपशाही व नाकर्तेपणाच्या निषेधार्थ परभणी आणि इतर मराठवाड्यातील दलित आणि पुरोगामी कार्यकर्ते न्याय हक्कासाठी १७ जानेवारीपासून मुंबई च्या दिशेने मोर्चा घेऊन निघाले. ते १६-१७ फेब्रुवारीला मुंबईला पोचतील अशी शक्यता वर्तवण्यात आली. याकरिता  मुंबईतील सर्व दलित आणि इतर पुरोगामी संघटनां तसेच डावे पक्षांनी एकत्र येऊन परभणीहून निघालेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत जनजागृती मोहीम सुरु केली होती.  

 मुंबईसह उपनगरात या मोहिमेला वाढता प्रतिसाद मिळत असलेला पाहून सरकारने आश्वासनावर बोळवण करून हा मोर्चा नाशिकलाच स्थगित केला.  भाजप आमदार सुरेश धस आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी याकामी मध्यस्थी केली. सर्व मागण्या पुर्ण करण्यात येतील या आश्वासनानंतर लॉन्ग मार्च नाशिक येथे स्थगित करण्यात आला. मात्र त्यानंतर सुरेश धस यांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही, असे म्हटले. यावरून आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. विरोधकांनी सुरेश धस यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी वक्तव्य केले की, सोमनाथ सूर्यवंशी यांना ज्या पोलिसांना मारले, त्यांना एक संधी द्या, त्यांना माफ करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू नका. या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. , या आमदाराने आमचा लॉन्ग मार्च चिरडण्याचं काम केलं आहे, एक षड्यंत्र केलेले आहे. यामुळे आमच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांच्यावर तत्काळ ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा. सुरेश धस महाराष्ट्राची जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र फिरू देणार नाही.

------------------------------------------------------------

परभणी मधील शहिद भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणात सत्ताधारी वेगवेगळ्या युक्त्या आणि कलृप्त्या करुन सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत....!! सोमनाथ सुर्यवंशी यांची झालेली हत्या ही पोलीसी अत्याचाराचा प्रकार आहे हे पोस्ट मॉर्डम रिपोर्ट ने सिद्ध केले आहे. तरीही मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलून त्या हत्येसंदर्भात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोस्ट मॉर्डम रिपोर्ट मुळे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या न्यायालयीन लढ्यासाठी ठोस पुरावा उपलब्ध झाला ही दक्षता आदरणीय एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली म्हणून आता न्याय मिळविण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे....!! मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्यात रस्त्यावरची संवैधानिक लढाई लढणाऱ्या आक्रमक आंबेडकरी समूहाला नामोहरम करण्यासाठी तेव्हाच्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने अधिकार नसतांनाही पोलीस खात्यामार्फत कोम्बींग अॉपरेशन च्या नावाखाली मराठवाड्यातील आंबेडकरी तरुणाईला बेदम मारहाण करुन पोलीसी अत्याचाराचा जीवघेणा खुनशी प्रकार सुरू केला. त्याचाच पुढिल अंक मनोहर जोशी सरकारने रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडात वापरला.आणि आता फडणवीस सरकार चालवित आहे...!!

पोलिसांना कोम्बींग अॉपरेशन करण्याचे अधिकार नसतांनाही आंबेडकरी वस्तीतच कोम्बींग अॉपरेशन का केले जाते.?? कारण एकच आंबेडकरी समुहाच्या आक्रमकतेला पोलीस खात्याच्या वर्दी आडून चिरडण्याचा खुनशी प्रयत्न करणे. पोलिसांच्या मदतीने आंबेडकरी ताकद गारद करणे आणि आंदोलन मोडीत काढणे....!! आंबेडकरी चळवळीने जे जे काही मिळविले ते रस्त्यावरच्या लढाईतून मिळविले हे सत्य आहे. मात्र आताची ही लढाई जशी रस्त्यावरची आहे तशीच ती न्यायालयीन लढाई सुद्धा आहे....!! रस्त्यावरच्या लढाईत मनुष्यबळाची दिशाभूल करुन किंवा दलाल प्रवृत्तीच्या लोकांचे बेगडी नेतृत्व ऊभे करुन त्यांच्या माध्यमातून आंदोलन हायजॅक करुन सत्ताधारी न्याय नाकारतं आहेत....!! 
परभणी मधील सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणात परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. त्या लॉंग मार्च ला आंबेडकरी समुहा कडून योग्य प्रतिसाद सुद्धा मिळतं गेला. मात्र नाशिक येथे लॉंग मार्च पोहचल्या नंतर तो लॉंग मार्च गुंडाळण्यात का आला.??लॉंग मार्च च्या स्टेजवर निळी टोपी आणि गळ्यात निळे ऊपरणे घालून भाजपच्या मंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजप आमदार सुरेश धस सामिल कसे झाले.? भाजपच्या मंत्री आणि आमदाराला लॉंग मार्च मध्ये घुसण्याची संधी कुणी दिली.?? भाजपच्या मंत्री आणि आमदारा सोबतं वाटाघाटी कुणी केल्या.?? वाटाघाटी करण्याचे कारण काय.??लॉंग मार्च च्या माध्यमातून सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळाला का.??

वरील प्रश्नांची उत्तरे समाजाने शोधली पाहिजे. तरच मनुवादी व्यवस्थेशी मजबुतीने लढता येईल. अन्यथा आम्ही विषारी झाडाच्या फांद्या तोडतं बसु. विष संपणार नाही. विषारी झाडं संपवायचं असेल तर मुळावर घाव घालावा लागेल. विषारी झाडं मुळापासून उपटून फेकावे लागेल...!! 
गेल्या दोन दिवसा पासून आंबेडकरी समुह प्रचंड आक्रमक होऊन भाजपा आमदार सुरेश धस यांना प्रश्न विचारतो आहे.तो चुकीचे बोलला, तो जातीयवादी आहे असे त्याला दुषणे लावीत आहेत...!!
सुरेश धस हे प्यादं आहे. त्याचा "आका" सांगेल तसे तो बोलतोय. तो सत्ताधारी पक्षाचा आहे त्याचा सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या दाबण्यासाठी वापर केला जातो आहे.ही एक बाजू झाली मात्र दुसरी बाजू अशी आहे की, सुरेश धस आणि मेघना बोर्डीकर यांना लॉंग मार्च च्या स्टेजवर कुणी बोलावले. कुणी भाषण करु दिले.? लॉंग मार्च का आणि कुणी गुंडाळला.??
घरका भेदी लंका ढाए. ही म्हण इथं चपलख बसतेय...!!
आंबेडकरी समुहाची जी ताकद आहे ती रस्त्यावरच्या लढाईत नेहमीच दिसून आली आहे. ती ताकद संपवण्यासाठी मनुवादी व्यवस्थेने काही दलाल तयार केले आहेत. तेच लोभी, लोचट लोक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्ये मध्ये मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न करीत आहेत ही अतिशय दुर्दैवी बाब आहे...!!

जसा सुरेश धस दोषी आहे तसेच हे घरभेदी सुद्धा दोषी आहेत. म्हणून आम्ही अशा घरभेदी वृत्तीच्या लोकांना थारा देऊ नये ही सुद्धा दक्षता घ्यावी लागेल तरच मुळावर घाव घालता येईल आणि विषारी झाडं तोडता येईल....!!
लॉंग मार्च संपवून रस्त्यावरच्या लढाईला विकण्याचं पाप काही घरभेदी लोकांनी केल्याचं ऊघडं होतं आहे....!!
अजून न्यायालयीन लढाई मात्र बाकी आहे आणि आपल्या कडे एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखे सक्षम नेतृत्व आहे. न्यायालयीन लढाई लढणा-या निस्वार्थी वकीलांची टिम आहे. पोस्ट मॉर्डम रिपोर्ट सारखा ठोस पुरावा आहे. मनुवादी सरकारचे १० लाख रुपये नाकारणारी स्वाभिमानी सोमनाथ सुर्यवंशी यांची आई आणि कुटुंब ठाम आहे.एवढ्या संसाधनांच्या बळावर निश्चितच न्यायालयीन लढाई जिंकता येईल,न्याय मिळवता येईल.नाऊमेद होण्याचे काही कारण नाही. मात्र आंबेडकरी पांघरूण घेतलेल्या विकाऊ लोकांना ओळखून पुढे जावे लागेल. घरभेदी संपवावे लागतील....!!

@.. भास्कर भोजने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com