श्रीगणेश उत्सव हा भारतीय समाजाचा विशेष करून मराठी माणसाचा आस्थेचा विषय आहे. केवळ आस्थेचाच नव्हे तर यावर लाखो लोकांचा उदरनिर्वाह होत आहे. मात्र मागील काही वर्षापासून सरकारचे मराठी विरोधी धोरण अधिक प्रबळ होत असून सरकारच्या माध्यमातून इथले भांडवलदार हा उद्योग देखील आपल्या हातात घेण्याचे प्रयोजन करत आहेत. केवळ पर्यावरणाचे कारण पुढे करून भारतीय पारंपारिक कलां कौशल्यावर अवलंबून असलेल्या एका मोठ्या उदयोगाचे नियंत्रण भांडवलदारांच्या हातात सुपूर्त करून पारंपारिक श्रीगणेश मूर्तिकाराचा आणि त्याच्या कला, कौशल्याचा अंत करण्याचे कारस्थान सरकारच्या माध्यमातून होत आहे. वैभवशाली परंपरा असणाऱ्या या श्रीगणेश उत्सवाचे नियंत्रण परंपरागत मूर्तिकला जोपासणाऱ्या श्रीगणेश मूर्तिकारांच्या हातातून काढून धनदांडग्यांच्या हातात देण्याचे षडयंत्र सुरू असून, मराठी माणसाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याच्या कटकारस्थानातील हा एक भाग असल्याचे निदर्शनास येत आहे. श्रीगणेश मुर्तीकारांचा समूळनाश करायची योजना सरकारच्या माध्यमातून बडे उद्योगपती करीत असल्याचा आरोप श्रीगणेश मुर्तीकार कामगार संघटना, आणि त्यांच्या शेकडो संलग्न संघटनांनी केला आहे. श्रीगणेश उत्सव बाबत होत असलेल्या अन्यायकारक बाबींबद्दल आज संघटनेच्या वतीने मुंबईत प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी प्रशांत देसाई, हितेश जाधव, संतोष कांबली, सिद्धेश डिगोले यांच्यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भारतात शतकानुशतके श्रीगणेश उत्सव श्रद्धेने साजरा केला जातो. गणेश रूपातली मूर्ती घरी येताना आपल्या घरात प्रत्यक्ष ईश्वरच ५, ७ १० दिवस राहायला येणार आहेत या भावनेने गणेश मूर्ती मिरवीत घरात आणून तिची प्राणप्रतिष्ठा करायची पद्धत आहे. तसेच विसर्जनाच्या दिवशी उत्तर पूजेच्या माध्यमातून गणेशमूर्ती मधील प्राण काढून घेवून मूर्तीचे पार्थिव स्वरूपच विसर्जन केले जाते. या कारणाने सरकारने कुठल्या प्रकारच्या सामुग्री पासून मूर्ती बनवली गेली पाहिजे, ती पर्यावरणाला हानिकारक नाही ना याचा विचार करताना गणेश विसर्जनाचा पण विचार करणे आवश्यक आहे. गणपतीची स्थापना विविध रुपात आणि आकारात करायची असेल आणि एका विशिष्ठ कालावधी मध्ये त्याचे विसर्जन करायचे असेल तर पाण्यात जलद विघटन होईल अशी सामुग्री वापरणे आवश्यक आहे. जुन्या काळी माती म्हणजे शाडूची माती प्रामुख्याने वापरात होती कारण ती सहज उपलब्ध होती. सरकार मुंबई पुण्या सारख्या मोठ्या प्रमाणावर कॉक्रिटिकरण झालेल्या शहरात अशा प्रकारची माती उपलब्ध करून देवू शकेल का? तसेच मूर्तीची उंची वाढली असता मूर्ती निर्मिती साठी शाडूची माती मोठ्या प्रमाणावर आवश्यक असते तसेच ह्या कारणाने मूर्तीचे वजन देखील वाढते. मातीला उन्हात तडे जाण्याचा अथवा माती ठिसूळ होण्याचा संभव असतो ह्या बाबींचा विचार सरकारने केला आहे का? नदीतली माती पुन्हा नदीत वितरण करण्याची व्यवस्था सरकार करणार आहे का? कारण नदीतली सुपीक माती, शाडूची विशिष्ठ माती हि समुद्रात, खाडीत, किंवा ओढे नाल्यात विसर्जित करणे हे देखील पर्यावर्णाला हानी कारक नाही का? असा सवाल यावेळी करण्यात आलाकाही वर्ष झाली भाद्रपद चतुर्थी प्रमाणेच आता माघी चतुर्थीला देखील श्रीगणेशची प्रतिष्ठापना करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. थोडक्यात आता वार्षिक दोन वेळेला श्रीगणेश उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या श्रीगणेश उत्सवाचा प्रमुख घटक आहे पारंपारिक गणेश मुर्तीकार, या घटकाचा विचार सरकार कधी करणार आहे का? विविध आकाराच्या, विविध रूपातल्या, श्रीगणेश प्रतिमा तयार करणे हेच तर श्रीगणेश मुर्तीकारचे कसब आहे. प्रत्येक घरातील श्रीगणेशाची प्रतिमा त्यांच्या घरातील परंपरे प्रमाणे, आस्थे प्रमाणे घडविण्याची परंपरा आजही अस्थित्वात आहे. पण हे कार्य केवळ श्री. गणेशमुर्ती कारच्या कसब आणि कौशल्यावर अवलंबून आहे. श्रीगणेश मुर्तीकार कामगार संघटनेच्या माध्यमातून गणांक २०२३ सारखे श्रीगणेश मूर्तिकलेला समर्पित प्रदर्शन ठाणे शहरात भरविण्यात आले होते. महाराष्ट्राचे तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे उदघाटन केले होते. माजी मंत्री नरेद्र पाटील यांनी देखील प्रदर्शनाला भेट देवून श्रीगणेश मूर्तीच्या निर्मितीचा आनंद घेतला होता.
पारंपारिक भारतीय कला टिकाव्यात, त्याचे संवर्धन व्हावे, जतन व्हावे, कलाकार सक्षम व्हावा, मूतींकलेच्या कौशल्यात वृद्धी व्हावी या साठी म्हणून केंद्र सरकार PM विश्वकर्मा सारख्या योजना राबवीत आहे. श्रीगणेश मुर्तीकार कामगार संघटना PM विश्वकर्मा योजनेत श्रीगणेश मुर्तीकारांचा सन्मानपूर्वक समावेश करण्यात यावा साठी प्रयत्नशील आहे. आणि एकीकडे सरकार वैभवशाली परंपरा असणाऱ्या या श्रीगणेश उत्सवाचे नियंत्रण परंपरागत मूर्तिकला जोपासणाऱ्या श्रीगणेश मूर्तिकारांच्या हातातून काढून धनदांडग्यांच्या हातात देवू पाहत आहे. श्रीगणेश मुर्तीकारांचा समूळनाश करायची हि योजना आहे. केवळ पर्यावरणाचे कारण पुढे करून भारतीय पारंपारिक कलां कौशल्यावर वर अवलंबून असलेल्या एका मोठ्या उदयोगाचे नियंत्रण भांडवलदारांच्या हातात सुपूर्त करून पारंपारिक श्रीगणेश मूर्तिकाराचा आणि त्याच्या कला, कौशल्याचा अंत करण्याचे कारस्थान सरकार करीत आहे.
सरकारने अशा प्रकारचा घातकी निर्णय घेण्या अगोदर श्रीगणेश मूर्तिकार कामगार संघटने सारख्या नोंदणीकृत संघटनेसोबत विचार विनिमय करून श्रीगणेश मूर्ती निर्मिती आणि त्या मूर्तीचे योग्य प्रकारे विसर्जन कसे करता येईल याचा आराखडा तयार करणे आवश्यक आहे. श्रीगणेश मूर्तिकार कामगार संघटनेकडे या विषयातील तज्ञ आणि अनुभवी व्यक्ती आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा निश्चित फायदा करून घेता येईल. सरकारने कला आणि कौशल्याचा ऱ्हास करणाऱ्या निर्णयांचा पुनः विचार करणे आवश्यक आहे. केवळ काही एनजीओनी विरोध केला म्हणून एकतर्फी निर्णय न घेता सरकारने सामंजस्याने यावर तोडगा काढावा अन्यथा ज्याप्रमाणे मतदानाच्या माध्यमातून सरकार निवडून दिले आहे. त्याच प्रकारे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत यांना त्यांची जागा दाखवू. एकीकडे हिन्दुत्ववादी सरकार म्हणून स्वतःची पाठ थोपवून घेत असतानाच हिन्दुच्यांच सणावर ऐन कैन प्रकारे बंदी घालण्याचे काम हे सरकार करीत आहे. यावर सरकारने गांभीर्याने विचार करून श्रीगणेश उत्सवाचे पावित्र्य आणि परंपरा जपावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
0 टिप्पण्या